TEXT 15
arjuna uvāca
paśyāmi devāṁs tava deva dehe
sarvāṁs tathā bhūta-viśeṣa-saṅghān
brahmāṇam īśaṁ kamalāsana-stham
ṛṣīṁś ca sarvān uragāṁś ca divyān
अर्जुनः उवाच-अर्जुन म्हणाला; पश्यामि-मी पाहतो; देवान्-सर्व देवता; तव-तुमच्या; देव-हे भगवन्; देहे—देहामध्ये; सर्वान्—सर्व, तथा—सुद्धा; भूत-जीव; विशेष-सङ्घान्-विशेषरूपाने; ब्रह्माणम्-ब्रह्मदेवांना; ईशम्—भगवान शंकरांना; कमल-आसन-स्थम्-कमलासनावर; ऋषीन्-महान ऋषी; च-सुद्धा; सर्वान्-सर्व; उरगान -सर्प, च-सुद्धा; दिव्यान्-दिव्य.
अर्जुन म्हणाला, हे भगवन्! हे कृष्ण! मी तुमच्या शरीरात एकत्रित झालेल्या सर्व देवतांना आणि इतर विविध जीवांना पाहतो. कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवांना तसेच भगवान शंकर, सर्व ऋषी आणि अलौकिक सपांना मी तुमच्या देहामध्ये पाहतो.
तात्पर्य: ब्रह्मांडातील सर्व काही अर्जुन पाहात आहे म्हणून तो ब्रह्मांडामधील आदिजीव ब्रह्मदेवांना पाहतो आणि ब्रह्मांडाच्या अधोप्रदेशात, ज्यावर गर्भादकशायी विष्णू पहुडतात त्या दिव्य सर्पालाही तो पाहतो. या सर्पशय्येला वासुकी म्हटले जाते. वासुकी नावाचे इतरही सर्प आहेत. गर्भोदकशायी विष्णूंपासून ते ब्रह्मांडातील अत्युच्च लोकापर्यंत, ज्या ठिकाणी कमलासनस्थ ब्रह्मदेव वास करतात, सर्व काही अर्जुन पाहू शकत होता. याचा अर्थ असा आहे की, एकाच जागी रथावर बसलेला अर्जुन प्रारंभापासून ते अंतापर्यंत सर्व काही पाहू शकत होता. भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने तो हे सर्व पाहू शकला.