No edit permissions for मराठी

TEXT 14

tataḥ sa vismayāviṣṭo
hṛṣṭa-romā dhanañ-jayaḥ
praṇamya śirasā devaṁ
kṛtāñjalir abhāṣata

ततः-त्यानंतर; स:-तो; विस्मय-आविष्टः-आश्चर्याने भारावून; हृष्ट-रोमा-रोमांचित होऊन; धनञ्जयः-अर्जुन; प्रणम्य-प्रणाम करून; शिरसा-मस्तकाने; देवम्-भगवंतांना; कृतअञ्जलिः-हात जोडून; अभाषत-म्हणाला.

त्यानंतर, भ्रमित अणि आश्चर्यचकित होऊन अंगावर रोमांच उभारलेला अर्जुन प्रणाम करण्यासाठी नतमस्तक झाला आणि हात जोडून त्याने भगवंतांची प्रार्थना करण्यास प्रारंभ केला.

तात्पर्य: दिव्य विश्वरूप प्रकट होताच श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या एकमेकांतील संबंधात लगेच बदल झाला. पूर्वी श्रीकृष्ण आणि अर्जुनामध्ये मित्रत्वाचे नाते होते; परंतु आता विश्वरूपदर्शन झाल्यावर अर्जुन अत्यंत आदराने प्रणाम करीत आहे आणि हात जोडून तो श्रीकृष्णांची प्रार्थना करीत आहे. तो विश्वरूपाचे स्तवन करीत आहे. या प्रकारे अर्जुन आणि श्रीकृष्णांचा संबंध मित्रत्वाचा न राहता आश्चर्ययुक्त आदराचा होतो. महान भक्त श्रीकृष्णांना सर्व रसांचे आगर मानतात. शास्त्रांमध्ये बारा संबंधांचा किंवा रसांचा उल्लेख करण्यात आला आहे. हे सर्व रस श्रीकृष्णांमध्ये आहेत. दोन जीवांमध्ये, देवतांमध्ये किंवा भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये आदानप्रदान होणा-या सर्व रसांचे भगवान श्रीकृष्ण हे आगर आहेत.

          या ठिकाणी सुद्धा अर्जुन अद्भुत रसामुळे प्रेरित झाला आणि स्वभावतःच तो जरी धीर, शांत आणि गंभीर असला तरी रोमांचित झाला आणि हात जोडून तो भगवंतांना प्रणाम करू लागला. अर्थातच तो भयभीत झाला नव्हता तर भगवंतांच्या अद्भुत रूपामुळे प्रभावित झाला होता. विश्वरूप पाहिल्यावर लगेच तो आश्चर्यचकित झाला आणि म्हणून त्याच्या स्वाभाविक मित्रत्वाच्या संबंधावर, साख्य रसावर, अर्थात, अद्‌भुत रसाचे वर्चस्व झाले आणि त्याने उपर्युक्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

« Previous Next »