No edit permissions for मराठी

TEXT 37

kasmāc ca te na nameran mahātman
garīyase brahmaṇo ’py ādi-kartre
ananta deveśa jagan-nivāsa
tvam akṣaraṁ sad-asat tat paraṁ yat

कस्मात्-का बरे; -सुद्धा; ते-तुम्हाला; -नाही; नमेरन्-त्यांनी नमस्कार केला पाहिजे; महा-आत्मन्-हे महात्मन्; गरीयसे-श्रेष्ठ; ब्रह्मण:-ब्रह्मदेवांपेक्षाही; अपि-जरी; आदि-कत्रंआदिसृष्टिकर्ता; अनन्त-हे अनंत; देव-ईश-हे देवाधिदेव; जगत्-निवास-हे जगताचे आश्रय; त्वम्-तुम्ही आहात; अक्षरम्-अक्षर किंवा अविनाशी; सत्-असत्-कारण आणि कार्य; तत् परम्-परम; यत्—कारण.

हे महात्मन्! ब्रह्मदेवांपेक्षाही श्रेष्ठ असे आदिसृष्टिकर्ते तुम्ही आहात. तर मग त्यांनी तुम्हाला का बरे आदरपूर्वक नमस्कार करू नये? हे अनंता, हे देवाधिदेव, हे जगत्रिवास! या भौतिक सृष्टीच्या पलीकडे असणारे तुम्ही परम अविनाशी, सर्व कारणांचे कारण आहात.

तात्पर्य: श्रीकृष्णांना प्रणाम करून अर्जुन दर्शवितो की, श्रीकृष्ण हे सर्वांसाठीच आराध्य आहेत. ते सर्वव्यापी आणि प्रत्येक आत्म्याचेही आत्मा आहेत. या श्लोकात अर्जुन श्रीकृष्णांना महात्मा असे संबोधित आहे, याचा अर्थ असा आहे की, ते सर्वाधिक उदार आणि अनंत आहेत, अनंत शब्द दर्शवितो की, भगवंतांनी आपल्या प्रभावाने आणि शक्तीने न व्यापलेली अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही आणि दीवे म्हणजे ते सर्व देवदेवतांचे नियंत्रण करतात आणि त्या सर्वांहून ते श्रेष्ठ आहेत. संपूर्ण सृष्टीचे ते आश्रयस्थान आहेत. अर्जुनाला हेही वाटले की, सर्व सिद्धपुरुषांनी आणि शक्तिशाली देवतांनी श्रीकृष्णांना प्रणाम करणे योग्यच आहे. कारण त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही. या श्लोकात अर्जुन विशेषरूपाने उल्लेख करतो की, श्रीकृष्ण हे ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ आहेत. कारण ब्रह्मालाही त्यांनीच जन्म दिला. श्रीकृष्णांचे विस्तारित रूप असणा-या गभौंदकशायी विष्णूंच्या नाभीकमलातून ब्रह्मदेवांचा जन्म झाला, म्हणून ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवांपासून उत्पन्न झालेल्या शंकरांनी, इतर देवदेवतांनी श्रीकृष्णांना सादर प्रणाम केलाच पाहिजे. श्रीमद्भागवतात सांगितले आहे की, ब्रह्मदेव, शंकरांसहित इतर सर्व देवदेवता भगवान श्रीकृष्णांचा आदर करतात. अक्षरम् हा शब्द महत्वपूर्ण आहे, कारण हे प्राकृत जगत विनाशाधीन आहे; परंतु भगवंत या प्राकृत जगताच्या पलीकडे आहेत. सर्व कारणांचे कारण भगवंत या भौतिक प्रकृतीतील तसेच संपूर्ण प्राकृतिक सृष्टीतील बद्ध जीवांपेक्षाही श्रेष्ठ आहेत. म्हणून ते सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहेत.

« Previous Next »