No edit permissions for मराठी

TEXT 36

arjuna uvāca
sthāne hṛṣīkeśa tava prakīrtyā
jagat prahṛṣyaty anurajyate ca
rakṣāṁsi bhītāni diśo dravanti
sarve namasyanti ca siddha-saṅghāḥ

अर्जुनः उवाच-अर्जुन म्हणाला; स्थाने-योग्यच; हृषीक-ईश-इंद्रियांचे स्वामी, हृषीकेश; तव-तुमचे; प्रकीर्त्या-कीर्तीने; जगत्-संपूर्ण जगत; प्रहुष्यति-आनंदित झाले आहे; अनुरज्यते - अनुरक्त होत आहे; -आणि; रक्षांसि-राक्षस; भीतानि-भीतीने; दिशः-दिशांकडे; द्रवन्ति-पलायन करीत आहेत; सर्वे-सर्व; नमस्यन्ति-नमस्कार करीत आहेत; -सुद्धा; सिद्ध-सङ्कः-सिद्धपुरुष.

अर्जुन म्हणाला, हे हृषीकेश! तुमच्या नामश्रवणाने संपूर्ण जगत हर्षोल्हासित होते आणि सर्व लोक तुमच्यावर अनुरक्त होतात. सिद्ध पुरुष जरी तुम्हाला नमस्कार करीत असले तरी राक्षस भयभीत होऊन इतस्ततः पळत आहेत. हे सर्व योग्यच घडत आहे.

तात्पर्य: कुरुक्षेत्रावरील युद्धाचा काय परिणाम होणार आहे हे श्रीकृष्णांकडून ऐकल्यावर अर्जुन हर्षोल्हासित झाला. भगवंतांचा महान भक्त आणि मित्र या नात्याने तो म्हणाला की, श्रीकृष्णांनी केलेले सर्व काही योग्यच आहे. श्रीकृष्ण हे भक्तांचे पालनकर्ता आणि अनिष्टांचा नाश करणारे आहेत. या गोष्टीला त्याने दुजोरा दिला. त्यांच्या कृती सर्वांसाठीच हितकारक असतात. या ठिकाणी अर्जुनाला समजले की, जेव्हा कुरुक्षेत्रावरील युद्ध सुरू होते तेव्हा आकाशामध्ये अनेक देवदेवता, सिद्धगण आणि उच्चतर लोकांतील बुद्धिमान लोक उपस्थित होते आणि युद्धभूमीवर श्रीकृष्ण उपस्थित असल्यामुळे ते सुद्धा युद्धाचे निरीक्षण करीत होते. अर्जुनाने जेव्हा विश्वरूप पाहिले तेव्हा सर्व देवता आनंदित झाल्या; परंतु इतर राक्षस आणि नास्तिक इत्यादी भगवंतांची स्तुती ऐकू शकले नाहीत. भगवंतांच्या प्रलयंकारी रूपामुळे साहजिकच भयभीत होऊन ते इकडेतिकडे पळू लागले. श्रीकृष्णांनी, भक्त आणि राक्षसांना दिलेल्या वागणुकीची अर्जुनाने स्तुती केली आहे. भगवंतांची कार्ये कल्याणकारी असतात हे जाणून भक्त त्यांची स्तुती करतो.

« Previous Next »