No edit permissions for मराठी

TEXTS 8-12

amānitvam adambhitvam
ahiṁsā kṣāntir ārjavam
ācāryopāsanaṁ śaucaṁ
sthairyam ātma-vinigrahaḥ

indriyārtheṣu vairāgyam
anahaṅkāra eva ca
janma-mṛtyu-jarā-vyādhi-
duḥkha-doṣānudarśanam

asaktir anabhiṣvaṅgaḥ
putra-dāra-gṛhādiṣu
nityaṁ ca sama-cittatvam
iṣṭāniṣṭopapattiṣu

mayi cānanya-yogena
bhaktir avyabhicāriṇī
vivikta-deśa-sevitvam
aratir jana-saṁsadi

adhyātma-jñāna-nityatvaṁ
tattva-jñānārtha-darśanam
etaj jñānam iti proktam
ajñānaṁ yad ato ’nyathā

अमानित्वम्-विनम्रता; अदम्भित्वम्-अदांभिकता; अहिंसा—अहिंसा; क्षान्तिः-सहनशीलता, सहिष्णुता; आर्जवम्-सरळपणा; आचार्य-उपासनम्-प्रमाणित आध्यात्मिक गुरूकडे जाणे; शौचम्-शुची, पावित्र्य; स्थैर्यम्-स्थिरता; त्म-विनिग्रहः-आत्मसंयम; इन्द्रिय-अर्थेषु— इंद्रियांच्या बाबतीत; वैराग्यम्-वैराग्य; अनहङ्कांरः-निरहंकार; एव-निश्चितपणे; -सुद्धा; जन्म-जन्माचा; मृत्यु-मृत्यू; जरा-वार्धक्य; व्याधि-व्याधी; दु:ख-दुःखाचा; दोष-दोष; अनुदर्शनम्-पाहून; असक्तिः-आसक्तीरहित; अनभिष्वङ्गः-संगाविना; पुत्र-पुत्र; दार-पत्नी; गृह-आदिषु-घर इत्यादी.; नित्यम्-नेहमी; -सुद्धाः सम-चित्तत्वम्-संतुलन; इष्ट-इच्छित; अनिष्ट—अनिष्ट; उपपत्तिषु—प्राप्त करून; मयि—मला; —सुद्धा; अनन्य-योगेन-अनन्य भक्तियोगाने; भक्ति:-भक्ती; अव्यभिचारिणी-अखंड; विवित्त-एकांत; देश-स्थळ; सेवित्वम्-आकांक्षा करणे; अरतिः-अनासक्ती; जन-संसदि-सामान्य जनांना; अध्यात्म-अध्यात्माबद्दल; ज्ञान-ज्ञानामध्ये; नित्यत्वम्-नित्यत्व; तत्त्व-ज्ञान-तत्त्वज्ञानाचे; अर्थ-हेतूसाठी; दर्शनम्-तत्त्वज्ञान; एतत्-हे सर्व; ज्ञानम्-ज्ञान; इति-याप्रमाणे; प्रोक्तम्-महटले आहे; अज्ञानम्-अज्ञान; यत्-जे; अतः-यापासून; अन्यथा-अन्य.

नम्रता, निरहंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, आध्यात्मिक गुरुला शरण जाणे, पावित्र्य, स्थैर्य, आत्म-संयमन, इंद्रियविषयांचा त्याग, मिथ्या अहंकाररहित, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी इत्यादींमधील दुःखदोष जाणणे, अनासक्ती, घरदार, पत्नी, मुलेबाळे इत्यादींपासून अनासक्ती, इष्ट आणि अनिष्ट गोष्टींमध्येही समचित्त राहणे, सामान्य लोकांपासून अलग होणे, आत्मसाक्षात्काराच्या महत्त्वाचा स्वीकार करणे आणि परम सत्याचा तत्त्वज्ञानात्मक शोध, हे सर्व ज्ञान आहे असे मी घोषित करतो. याव्यतिरिक्त जे काही आहे ते सारे अज्ञानच आहे.

तात्पर्य: कधी कधी अल्पज्ञ लोकांना ही ज्ञानपद्धती म्हणजे क्षेत्रांचा विकार आहे असे वाटते, परंतु हा त्यांचा गैरसमज आहे. हीच वास्तविक ज्ञानपद्धती आहे. जर मनुष्याने या ज्ञानमार्गाचा स्वीकार केला तरच त्याच्यासाठी परम सत्याची प्राप्ती शक्य होते. पूर्वी सांगितलेल्या चोवीस तत्वांचे हे विकार नाहीत. वास्तविकपणे त्या तत्वांच्या जंजाळातून बाहेर पडण्याचे हे एक माध्यम आहे. देहधारी जीव हा देहाने बद्ध झालेला असतो व हा देह चोवीस तत्त्वांनी बनलेला असतो आणि या ठिकाणी वर्णन केलेली ज्ञानप्रक्रिया म्हणजे शरीरातून मुक्त होण्याचे साधन आहे. ज्ञानमार्गाच्या सर्व वर्णनातील महत्त्वाचा मुद्दा अकराव्या श्लोकातील प्रथम पंक्तीमध्ये वर्णिला आहे, मयि चानन्यायोगेन भक्तिरव्यभिचारिणी -'ज्ञानाची परिणती अनन्य भगवद्भक्तीमध्ये होते.'जर मनुष्याने दिव्य भगवत्सेवेचा स्वीकार केला नाही किंवा करण्यास पात्र नसेल तर इतर एकोणीस साधनांना विशिष्ट महत्त्व नाही. परंतु जर मनुष्याने पूर्णपणे कृष्णभावनामय होऊन भक्तीचा स्वीकार केला तर इतर एकोणीस साधने आपोआपच त्याच्या ठायी विकसित होतात. श्रीमद्भागवतात (५.१८.१२) सांगितल्याप्रमाणे यस्यास्ति भक्तिर्भगवत्यकिञ्चना सर्वैगुणैस्तत्र समासते सुरा:-ज्याने भक्ती प्राप्त केली आहे त्याच्या ठायी ज्ञानाचे सर्व सद्गुण विकसित होतात. आठव्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे आध्यात्मिक गुरूचा स्वीकार करणे आवश्यक आहे. जो भक्तीचा स्वीकार करतो त्याच्यासाठीसुद्धा, आध्यात्मिक गुरूचा स्वीकार करणे अतिशय महत्वपूर्ण आहे. प्रमाणित आध्यात्मिक गुरूचा स्वीकार केल्यावर दिव्य जीवनाचा प्रारंभ होतो. भगवंत या श्लोकामध्ये स्पष्टपणे सांगतात की, हा ज्ञानमार्ग म्हणजेच वास्तविक मार्ग आहे. याव्यतिरित जे काही तर्क इत्यादी आहेत ते सर्व निरर्थक आहेत.

          या ठिकाणी प्रस्तुत केलेल्या ज्ञानाच्या मार्गामधील साधनांचे विश्लेषण पुढीलप्रमाणे करता येईल. अमानित्व म्हणजे मनुष्याने लोकांकडून मान प्राप्त करण्यास उत्सुक असू नये. देहाशी तादात्म्य केल्यामुळे आपण इतरांकडून मान प्राप्त करण्यास अतिशय उत्सुक असतो. परंतु मी म्हणजे शरीर नाही हे जाणणा-या परिपूर्ण ज्ञानी मनुष्याच्या दृष्टीने शरीराशी संबंधित मानापमान हा निरर्थक आहे. मनुष्याने या भौतिक फसवणुकीच्या मागे लागू नये. लोक आपल्या धर्मनिष्ठेबद्दल प्रसिद्ध होण्यास अतिशय उत्सुक असतात आणि म्हणून काही वेळा आढळते की, लोक धर्मतत्त्वांचे ज्ञान नसतानाही तथाकथित धर्मामध्ये प्रवेश करतात आणि स्वत:ला धर्मोपदेशक म्हणून प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. आध्यात्मिक विज्ञानात आपली प्रगती किती झाली हे पाहण्याकरिता काही तरी कसोटी असणे आवश्यक आहे. या साधनांद्वारे मनुष्य स्वपरीक्षा करू शकती.

          अहिंसा शब्दाचा अर्थ सामान्यपणे शरीराची हत्या न करणे असा घेतला जातो; परंतु वास्तविकपणे इतरांना दु:खात न टाकणे म्हणजेच अहिंसा आहे. अज्ञानामुळे एकंदर लोक देहात्मबुद्धीमध्ये फसलेले असतात आणि म्हणून ते निरंतर सांसारिक दु:खे भोगत असतात. म्हणून मनुष्य, आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीच्या स्तराप्रत उन्नत होत नाही तोपर्यंत तो हिंसाच करीत असतो. वास्तविक ज्ञानाचा लोकांना प्रसार करण्यासाठी मनुष्याने आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे, जेणेकरून ते प्रबुद्ध होतील आणि भवबंधनातून मुक्त होतील. हीच खरी अहिंसा आहे.

     क्षान्ति: म्हणजे मनुष्याने इतरांकडून होणारा अपमान सहन करण्यास शिकले हिजे. जेव्हा तो आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती करण्यात संलग्न होतो तेव्हा इतरांकडून भरपूर अपमान होतो. हे अपेक्षितच आहे, कारण भौतिक प्रकृतीची रचनाच अशा पद्धतीने करण्यात आली आहे. प्रह्मदांसारखे केवळ पाच वर्षांचे बालकही जेव्हा आध्यात्मिक ज्ञानाच्या अनुशीलनामध्ये संलग्न होते, तेव्हा त्याच्या पित्याने भक्तीला विरोध केल्यामुळे, त्याला अनेक यातना भोगाव्या लागल्या. त्याचा वध करण्याचा पित्याने पुष्कळ प्रकारे प्रयत्न केला; परंतु प्रह्लादाने सर्व काही सहन केले. म्हणून आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती करण्याच्या मार्गात अनेक अडथळे येतील तरीही आपण सहनशील असले पाहिजे. दृढ़ निश्चयाने प्रगतिपथावर अग्रेसर झाले पाहिजे.

          आर्जवम्‌ म्हणजे मनुष्याने निष्कपट आणि इतके प्रांजळ असावे की, एखाद्या शत्रूलाही तो वास्तविक सत्य काय आहे हे सांगू शकेल. आचार्योपासनम् अर्थात, आध्यात्मिक गुरूचा स्वीकार करण्याबाबत सांगावयाचे तर प्रमाणित आध्यात्मिक गुरू स्वीकारणे अत्यावश्यक आहे, कारण त्यांच्या मार्गदर्शनावाचून आध्यात्मिक विज्ञानामध्ये प्रगती करणे अशक्य आहे. मनुष्याने पूर्ण विनम्रतेने आध्यात्मिक गुरूला शरण जावे आणि त्याची सेवा करावी, जेणेकरून आपल्या शिष्यावर कृपावर्षाव करण्यासाठी गुरू प्रसन्न होतील. प्रमाणित आध्यात्मिक गुरूहा श्रीकृष्णांचा प्रतिनिधी असल्यामुळे जर त्याने आपल्या शिष्यावर कृपावर्षाव केला तर, शिष्याने जरी नियामक तत्वांचे पालन केले नाही तरी त्याची तात्काळ प्रगती होते किंवा जो हातचे राखून न ठेवता गुरूची सेवा करतो त्याच्यासाठी नियामक तत्त्वांचे पालन करणे सहजसुलभ होते.

          शौचम्‌ आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्याकरिता शुची अत्यंत आवश्यक आहे. शुचीचे आंतरिक आणि बाह्य असे दोन प्रकार आहेत. बाह्य शुची म्हणजे स्नान करणे इत्यादी होय. परंतु आंतरिक शुचीसाठी सदैव कृष्णचिंतन केले पाहिजे आणि हरेकृष्ण हरेकृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे/हरे राम हरे राम राम राम हरे हरे या महामंत्राचा जप केला पाहिजे. या पद्धतीमुळे मनावर साचलेली पूर्वकर्माची धूळ निघून जाते.

          स्थैर्यम् मनुष्याने आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी अत्यंत दृढनिश्चयी असले पाहिजे. अशा दृढ निश्चयाविना आध्यात्मिक जीवनामध्ये प्रत्यक्ष प्रगती होऊ शकत नाही. आत्मविनिग्रह म्हणजे आध्यात्मिक प्रगतीकरिता जे काही हानिकारक आहे त्याचा स्वीकार न करणे होय. मनुष्याने या गोष्टींची सवय लावून घेतली पाहिजे आणि आध्यात्मिक प्रगतीस बाधक अशा सर्व गोष्टींचा त्याग केला पाहिजे. हेच खरे वैराग्य आहे. इंद्रिये इतकी प्रबळ आहेत की, इंद्रियोपभोग करण्यासाठी ती सदैव उत्सुक असतात. मनुष्याने अशा अनावश्यक मागण्या पुरवू नयेत. शरीर सुस्थितीत ठेवण्याइतकीच इंद्रियतृप्ती करावी, जेणेकरून मनुष्य आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्याचे कर्तव्यपालन करू शकेल. सर्वांत महत्वपूर्ण आणि अनियंत्रित इंद्रिय म्हणजे जिह्वा होय. जर मनुष्य जिह्वा नियंत्रण करू शकला तर तो इतर इंद्रियांना संयमित करू शकतो. जिह्वेची दोन कार्ये असतात, चव घेणे आणि बोलणे. म्हणून नित्यनेमाने जिहेला कृष्णप्रसादाचे सेवन करण्यामध्ये आणि हरे कृष्ण कीर्तन करण्यामध्ये संलग्न केले पाहिजे. नेत्रांच्या बाबतीत सांगावयाचे तर श्रीकृष्णांच्या सुंदर विलोभनीय रूपाव्यतिरित मनुष्याने इतर काही पाहू नये. यामुळे नेत्रांचे संयमन होईल. त्याचप्रमाणे कानाद्वारे कृष्णकथा श्रवण करावी आणि नासिकाद्वारे श्रीकृष्णांना अर्पण केलेल्या फुलांचा सुवास घ्यावा. हाच भक्तिमार्ग आहे आणि या ठिकाणी आपण जाणू शकतो की, भगवद्गीता ही केवळ भक्तिविज्ञानाचे प्रतिपादन करीत आहे. भक्तियोग हेच एकमेव उद्दिष्ट आहे. भगवद्गीतेवरील अज्ञानी भाष्यकार वाचकांचे मन इतर विषयांकडे वळविण्याचा प्रयत्न करतात; परंतु भगवद्गीतेमध्ये भक्तियोगाव्यतिरिक्त इतर कोणताही प्रमुख विषय नाही.

          मिथ्या अहंकार म्हणजे आपण स्वत: देह आहोत असे मानणे होय. अर्थात आपण हा देह नसून आत्मा आहोत, हे जाणणे म्हणजेच वास्तविक अहंकार होय. अहंकार हा नेहमी असतोच.  मिथ्या अहंकार हा निंद्य आहे, परंतु खरा अहंकार निंद्य नाही. वेदामध्ये (बृहदारण्यक उपनिषद् १.४.१०) म्हटले आहे की, अहं ब्रह्मस्मि-मी ब्रह्म आहे. हा अहम् भाव आत्मसाक्षात्काराच्या मुक्तावस्थेमध्येही असतोच. हा अहंभाव म्हणजेच अहंकार आहे. परंतु हाच अहंभाव नश्वर शरीराच्या संदर्भात योजिला जातो तेव्हा तो मिथ्या अहंकार समजला जातो. जेव्हा हा अहंभाव सत्यत्वाच्या संदर्भात योजिला जातो तेव्हा तो वास्तविक अहंकार होय. काही तत्वज्ञानी म्हणतात की, आपण अहंकाराचा त्याग करावा; परंतु आपण अहंकार त्यागू शकत नाही. कारण अहंकार म्हणजेच स्वरुप होय. अर्थात, आपण देहात्मबुद्धीचा त्याग केलाच पाहिजे.

     मनुष्याने जन्म-मृत्यू -जरा-व्याधी यांपासून होणारे दु:ख जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वेदामध्ये जन्माचे विस्तृत वर्णन अनेक ठिकाणी आढळते. श्रीमद्भागवतात जन्मापूर्वीची अवस्था, मातेच्या गर्भातील बालकाचा निवास, त्याला भोगावे लागणारे दु:ख इत्यादींचे हुबेहूब वर्णन करण्यात आले आहे. जन्म हा दुःखमय असल्याचे आपण पूर्णपणे जाणून घेतले पाहिजे. मातेच्या गर्भामध्ये आपण किती दुःख भोगले आहे याची आपल्याला विस्मृती झाल्यामुळे आपण जन्म-मृत्यूच्या चक्रातून सुटण्याचा मार्ग जाणण्याचा प्रयत्न करीत नाही. त्याचप्रमाणे मृत्यूसमयीदेखील सर्व प्रकारची दु:खे भोगावी लागतात आणि याचे सुद्धा शास्त्रामध्ये वर्णन करण्यात आले आहे. यावर अवश्य विचार केला पाहिजे. जरा आणि व्याधींबद्दल सांगावयाचे तर प्रत्येकाला याचा प्रत्यक्षच अनुभव येतो. कोणालाच व्याधिग्रस्त व्हावयाची इच्छा नसते जरा आणि व्याधीच्या चक्रामुळे होणा-या दु:खाचा विचार केल्यावरही जोपर्यंत मनुष्य भौतिक जीवनाविषयी निराश होत नाही तोपर्यंत आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्यासाठी प्रेरणा मिळत नाही.

          आसक्तिरनाभिष्वंग:  पुत्रदारगृहादिषु म्हणजे पुत्र, पत्नी, घर, द्रव्यादिकांविषयी अनासक्ती होय. यावरून असे समजू नये की, मनुष्याला त्यांच्याविषयी भावना, प्रेम असू नये. हे सर्व आपल्या स्वाभाविक प्रीतीचे विषय आहेत, परंतु ते आध्यात्मिक प्रगतीसाठी अनुकूल नसतील तेव्हा मनुष्याने त्यांच्यावर आसक्त असू नये. घर सुखी बनविण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कृष्णभावना होय. जर मनुष्य पूर्णपणे कृष्णभावनाभावित असेल तर तो आपले घर सुखी बनवू शकतो. कारण कृष्णभावनेचा मार्ग हा अत्यंत सुगम आहे. मनुष्याने केवळ हरेकृष्ण हरेकृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे/हरे राम हरे राम राम राम हरे हरे/या महामंत्राचा जप करावा, कृष्णप्रसाद ग्रहण करावा, श्रीमद्भगवद्गीता आणि श्रीमद्भागवतासारख्या ग्रंथांवर चर्चा करावी आणि अर्चाविग्रहाची आराधना करावी. या चार गोष्टींमुळे मनुष्य सुखी होईल. मनुष्याने आपल्या कुटुंबियांना अशा प्रकारे प्रशिक्षण द्यावे की कुटुंबीयांनी सकाळ, सायंकाळ एकत्र बसावे आणि हरेकृष्ण हरेकृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे/हरे राम हरे राम राम राम हरे हरे/ या महामंत्राचे संकीर्तन करावे. जर कृष्णभावनेचा विकास करण्यासाठी या चार तत्त्वांचे आचरण करीत आपल्या कौटुंबिक जीवनाची घडी मनुष्य अशा प्रकारे बसवू शकला तर त्याने कौटुंबीक जीवनाचा त्याग करून संन्यासाश्रम स्वीकारण्याची आवश्यकता नाही, परंतु कौटुंबीक जीवन जर आध्यात्मिक जीवनाकरिता अनुकूल नसेल तर गृहस्थ जीवनाचा त्याग करावा. अर्जुनाप्रमाणे श्रीकृष्णांचा साक्षात्कार होण्यासाठी अथवा त्यांची सेवा करण्यासाठी मनुष्याने सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे. अर्जुनाला स्वजनांना मारण्याची इच्छा नव्हती, परंतु जेव्हा त्याने जाणले की, आपले कुटुंबीय हे आपल्या भगवद्साक्षात्कारामध्ये अडसर आहेत तेव्हा त्याने श्रीकृष्णांच्या कौटुंबिक आदेशांचा स्वीकार केला आणि युद्ध करून स्वजनांची हत्या केली. सर्वच परिस्थितीत मनुष्याने जीवनाच्या सुख आणि दु:खापासून अनासक्त असले पाहिजे, कारण या जगतामध्ये मनुष्य पूर्णपणे सुखी अथवा पूर्णपणे दुःखी असू शकत नाही.

          सुख आणि दुःख हे भौतिक जीवनाचे आनुषंगिक घटक आहेत आणि भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे मनुष्याने ते सहन करण्यास शिकले पाहिजे. सुखदुःखांच्या येण्याजाण्याला मनुष्य कधीही प्रतिबंध करू शकत नाही, म्हणून त्याने सांसारिक जीवनापासून अनासक्त राहिले पाहिजे आणि दोन्ही बाबतीत आपोआपच समभाव राखला पाहिजे. सामान्यपणे, इच्छित वस्तू प्राप्त होते तेव्हा आपण अत्यंत सुखी होतो आणि जेव्हा आपल्याला अनिष्ट गोष्ट प्राप्त होते तेव्हा दुःखी होतो. परंतु जर आपण वास्तविकपणे आध्यात्मिक स्वरूपात स्थित असलो तर या गोष्टींमुळे आपण विचलित होत नाही. या स्तराची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला अखंड भक्तियोगाचे आचरण केले पाहिजे. अढळ कृष्णभक्ती म्हणजे नवव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात वर्णिल्याप्रमाणे कीर्तन, श्रवण, पूजन, वंदन इत्यादी नवविधा भक्तीमध्ये संलग्न होणे होय. याच भक्तियोगाचे अनुसरण केले पाहिजे.

          स्वाभाविकपणेच जेव्हा मनुष्य, आध्यात्मिक जीवनामध्ये रुळला जातो तेव्हा त्याला विषयी-लोकांच्या संगतीमध्ये राहणे आवडत नाही, कारण त्यांच्या संगतीत राहणे हे त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे. कुसंगाशिवाय आपला एकांतात राहण्याकडे किती कल आहे, यावरून मनुष्याने स्वत:ची स्वतः कसोटी पाहावी. साहजिकच भक्ताला अनावश्यक खेळ, चित्रपट पाहणे किंवा सार्वजनिक उत्सव, समारंभ साजरा करणे इत्यादींमध्ये स्वारस्य नसते, कारण तो जाणतो की, हे सर्व करणे म्हणजे केवळ कालापव्ययच होय. लैंगिक जीवन आणि इतर विषयांचा अभ्यास करणारे अनेक विद्वान संशोधक आणि तत्वज्ञानी आहेत; परंतु भगवद्गीतेनुसार असे संशोधन आणि तर्कशास्त्र हे अर्थहीन आहे. या गोष्टी सामान्यतः निरर्थकच आहेत. भगवद्‌गीतेनुसार दार्शनिक विवेकाच्या द्वारे आत्मस्वरुपाचे संशोधन केले पाहिजे. मनुष्याने आत्मज्ञान प्राप्ती करण्यासाठी संशोधन करावे असे या ठिकाणी सांगण्यात आले आहे.

          आत्मसाक्षात्काराविषयी सांगावयाचे तर, या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, भक्तियोग हा विशेषकरून व्यवहार्य आहे. जेव्हा भक्तीचा विचार केला जातो तेव्हा मनुष्याने आत्मा आणि परमात्मा यांच्या संबंधांचा विचार केला पाहिजे. जीव आणि परमात्मा हे एकच असू शकत नाहीत, निदान भक्तियोगाच्या बाबतीत तरी नाही. या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे जीवात्म्याने परमात्म्याची करावयाची सेवा ही शाश्वत नित्यम् आहे. म्हणून भक्तियोगही शाश्वत आहे. मनुष्याने या तत्वामध्ये दृढनिश्चयी असले पाहिजे.

          श्रीमद्भागवतात (१.२.११) म्हटले आहे की, वदन्ति तत्तत्वविदस्तत्वं यञ्जानमद्वयम्‌- — 'जे तत्ववेत्ते आहेत ते जाणतात की, परम सत्याचा ब्रह्म, परमात्मा आणि भगवान या तीन निरनिराळ्या स्वरूपांमध्ये साक्षात्कार होतो.' परम सत्याच्या साक्षात्कारातील भगवान साक्षात्कार ही अंतिम पायरी आहे, यास्तव मनुष्याने भगवत्ज्ञानाप्रत उन्नती करावी आणि भगवद्भक्तीमध्ये संलग्न व्हावे, हीच ज्ञानाची परमावधी आहे.

          विनम्रतेपासून ते परम सत्याच्या भगवान स्वरूपाच्या साक्षात्कारापर्यंतचा हा मार्ग, तळमजल्यावरून ते थेट सर्वांत वरच्या मजल्यापर्यंत जाण्याकरिता केलेल्या विद्युत उद्वाहकाप्रमाणे (लिफ्ट) आहे. आता असे अनेक लोक आहेत, जे या उद्वाहकावरून जाताना पहिल्या, दुसर्या किंवा तिसर्या मजल्यापर्यंत चढलेले आहेत.  परंतु जोपर्यंत मनुष्य कृष्णतत्त्वरूपी सर्वांत वरच्या मजल्यापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत तो ज्ञानाच्या खालच्या पायरीवरच असतो. जर मनुष्याला परमेश्वराची बरोबरी करावयाची असेल आणि त्याचबरोबर आध्यात्मिक जीवनातही प्रगती करावयाची असेल तर तो निश्चितपणे वैफल्यग्रस्त होईल. या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे की, नम्रतेविना वास्तविक तत्व जाणणे शक्य नाही. स्वत:ला जरी नेहमी लताप्रहार मिळत असेल तरी अज्ञानामुळे तो स्वतःला परमेश्वर म्हणवितो. म्हणून ज्ञानाचा प्रारंभ हा अमानित्व किंवा विनम्रतेपासून होतो. मनुष्याने विनम्र असले पाहिजे आणि आपण भगवंतांच्या अधीन आहोत हे जाणले पाहिजे. भगवंतांशी विद्रोह केल्याने मनुष्य मायेच्या अधीन होतो. त्याने हे सत्य जाणून त्यावर दृढ विश्वास ठेवला पाहिजे.

« Previous Next »