TEXT 15
rajasi pralayaṁ gatvā
karma-saṅgiṣu jāyate
tathā pralīnas tamasi
mūḍha-yoniṣu jāyate
रजसि—रजोगुणामध्ये; प्रलयम्—प्रलय, गत्वा—प्राप्त करून, कर्म-सङ्गिषु—सकाम कर्मामध्ये संलग्न झालेल्यांच्या संगामध्ये; जायते-जन्म घेतो; तथा-त्याप्रमाणे; प्रलीनः-प्रलय झाल्यावर; तमसि-तमोगुणामध्ये; मूढ-योनिषु-पशू योनीमध्ये; जायते-जन्म घेतो.
जेव्हा मनुष्याचा रजोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो सकाम कर्मामध्ये संलग्न झालेल्या मनुष्यात जन्म घेतो आणि जेव्हा तमोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो पशू योनीमध्ये जन्म धेतो.
तात्पर्य: आत्म्याला मनुष्य जन्म प्राप्त झाला की, त्याचे पुन्हा कधीच अध:पतन होत नाही अशी काही लोकांची धारणा असते. परंतु ही धारणा चुकीची आहे. या श्लोकानुसार जर मनुष्याने तमोगुण विकसित केला तर मृत्यूनंतर त्याचे पशुयोनीत अध:पतन होते. तेथून पुन्हा मनुष्य-जन्म प्राप्त करण्यासाठी त्याला उत्क्रांती गमनाने स्वत:ची उन्नती करावी लागते. म्हणून जे खरोखर मनुष्यजीवनाचे गांभीर्य जाणतात त्यांनी सत्त्वगुणाचा विकास केला पाहिजे आणि सत्संगाद्वारे त्रिगुणातीत होऊन कृष्णभावनेमध्ये स्थित झाले पाहिजे. हेच मनुष्यजीवनाचे ध्येय आहे. अन्यथा मनुष्याला पुन्हा मनुष्ययोनीच प्राप्त होईल याची हमी देता येत नाही.