No edit permissions for मराठी

TEXT 19

nānyaṁ guṇebhyaḥ kartāraṁ
yadā draṣṭānupaśyati
guṇebhyaś ca paraṁ vetti
mad-bhāvaṁ so ’dhigacchati

—नाही; अन्यम्—इतर, गुणेभ्यः—गुणाखेरीज, कर्तारम्—कर्ता; यदा-जेव्हा; द्रष्टा–दृष्टा; अनुपश्यति-योग्य रीतीने पाहतो; गुणेभ्यः-प्राकृतिक गुणांपासून; -आणि; परम्-दिव्य; वेत्ति-जाणतो; मत्-भावम्-माझ्या आध्यात्मिक स्वभावाला; सः-तो; अधिगच्छति-प्राप्त होतो

जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो की, सर्व कर्माचा प्राकृतिक गुणांखेरीज इतर कोणीही कर्ता नाही आणि जो या सर्व गुणांच्या पलीकडे असणा-या परमपुरुषाला जाणतो तो माझ्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त होतो,

तात्पर्य: योग्य महात्म्यांकडून प्राकृतिक गुणांना यथार्थ रूपात जाणून मनुष्य प्राकृतिक गुणांच्या सर्व कर्माच्या पलीकडे जाऊ शकतो. श्रीकृष्ण हे आद्य गुरू आहेत आणि ते अर्जुनाला आध्यात्मिक ज्ञान प्रदान करीत आहेत. त्याचप्रमाणे जे पूर्णपणे कृष्णभावनाभावित आहेत त्यांच्याकडून मनुष्याने प्राकृतिक गुणांच्या कर्माचे विज्ञान जाणून प्रशिक्षण घेतले पाहिजे. अन्यथा मनुष्यजीवनाची वाटचाल चुकू शकते. प्रमाणित आध्यात्मिक गुरूच्या उपदेशांद्वारे जीव स्वतःचे आध्यात्मिक स्वरूप, आपले भौतिक शरीर व इंद्रिये, आपण कसे बद्ध झालो आहोत आणि आपण कसे त्रिगुणांच्या प्रभावाखाली आहोत हे जाणू शकतो. त्रिगुणांच्या पकडीमध्ये सापडल्यामुळे तो असाहाय्य असतो. परंतु आपली मूळ स्वरूपस्थिती जाणल्यावर आध्यात्मिक जीवनाला वाव असणा-या दिव्य स्तराला तो प्राप्त होऊ शकतो. वस्तुतः जीव हा विविध कर्माचा कर्ता नसतोच. विशिष्ट गुणांद्वारे संचालित विशिष्ट प्रकारच्या शरीरामध्ये तो स्थित असल्यामुळे त्याला कर्म करणे भाग पडते. आध्यात्मिक गुरूच्या साहाय्याविना आपण कोणत्या स्थितीमध्ये आहोत ते मनुष्य जाणू शकत नाही. अधिकृत आध्यात्मिक गुरूच्या संगाद्वारे तो आपले वास्तविक स्वरूप जाणू शकतो आणि अशा स्वरूपस्थितीच्या ज्ञानाद्वारे तो पूर्णपणे कृष्णभावनेमध्ये स्थिर होतो. कृष्णभावनाभावित मनुष्यावर प्राकृतिक गुण आपला प्रभाव पाडू शकत नाहीत. यापूर्वीच सातव्या अध्यायात सांगितले आहे की, जो मनुष्य श्रीकृष्णांना शरण गेला आहे तो भौतिक प्रकृतीच्या कर्मातून मुक्त झाला आहे. म्हणून ज्याला यथार्थ वस्तुज्ञान झाले आहे, त्याच्यावरील भौतिक प्रकृतीचा प्रभाव हळूहळू नष्ट होतो.

« Previous Next »