TEXT 7
rajo rāgātmakaṁ viddhi
tṛṣṇā-saṅga-samudbhavam
tan nibadhnāti kaunteya
karma-saṅgena dehinam
रजः-रजोगुण; राग-आत्मकम्-काम किंवा इच्छेपासून उत्पन्न झालेला; विद्धि-जाण; तृष्णा-महत्त्वाकांक्षेने, सङ्ग—संग; समुद्भवम्—उत्पन्न झालेला; तत्—तो; निबध्नाति—बद्ध करतो; कौन्तेय-हे कोंतेया; कर्म-सज्ञेन-सकाम कर्माच्या संगाने; देहिनम्-देहधारी.
हे कोंतेया! असंख्य वासना आणि महत्त्वाकांक्षांमुळे रजोगुण उत्पन्न होतो आणि यामुळे देहधारी जीव सकाम कर्माशी बांधला जातो.
तात्पर्य: रजोगुणाचे लक्षण म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्यातील आकर्षण होय. स्त्रीला पुरुषाचे आणि पुरुषाला स्त्रीचे आकर्षण असते, यालाच रजोगुण म्हटले जाते आणि या गुणाच्या वृद्धीने मनुष्यामध्ये भौतिक उपभोग घेण्याची तीव्र आकांक्षा उत्पन्न होते. इंद्रियतृप्ती करण्याची इच्छा उत्पन्न होते. रजोगुणी मनुष्याला इंद्रियतृप्तीकरिता, समाज किंवा देशाकडून मान, प्रतिष्ठा प्राप्त करण्याची इच्छा असते आणि त्याला सुंदर पत्नी, घर, गोंडस मुले इत्यादी गोष्टींची इच्छा असते. हे सर्व रजोगुणामुळे घडते. जोपर्यंत मनुष्य या गोष्टींच्या मागे लागलेला असतो तोपर्यंत त्याला अतिशय कठीण परिश्रम करावे लागतात. यास्तव या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे की, असा मनुष्य कर्मफलांवर आसक्त होतो आणि म्हणून या कर्मामुळेच तो बद्ध होतो. आपल्या पत्नीला, मुलाबाळांना आणि समाजाला संतुष्ट ठेवण्यासाठी आणि आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी त्याला कर्म करावे लागते. म्हणूनच सर्व जग प्रायः रजोगुणीच असते. आधुनिक संस्कृती ही रजोगुणात प्रगत झाली आहे. पूर्वीच्या काळी सत्वगुणी अवस्था ही प्रगत मानली जात असे. सत्वगुणी मनुष्यांना जर मोक्षाची संधी नसेल तर रजोगुणामध्ये बद्ध झालेल्यांबद्दल काय बोलावे?