No edit permissions for मराठी

TEXT 16

dvāv imau puruṣau loke
kṣaraś cākṣara eva ca
kṣaraḥ sarvāṇi bhūtāni
kūṭa-stho ’kṣara ucyate

द्वौ-दोन; इमौ-हे; पूरुषौ-जीव; लोके-या जगतात; क्षर:-च्युत; -आणि; अक्षर:- अच्युत; एव-निश्चितपणे; -आणि; क्षर:-च्युत; सर्वाणिा-सर्व; भूतानि—जीव; कूटस्थ:-एकत्वामध्ये; अक्षरः-अच्युत; उच्यते-म्हटले जाते.

च्युत (क्षर) आणि अच्युत(अक्षर) असे जीवांचे दोन वर्ग आहेत. भौतिक जगतात सर्व जीव च्युत असतात आणि आध्यात्मिक जगतातील प्रत्येक जीवाला अच्युत म्हटले जाते

तात्पर्य: पूर्वीच सांगितल्याप्रमाणे भगवंतांनी व्यासदेव या अवताराद्वारे वेदान्त सूत्राचे संकलन केले आहे. या ठिकाणी भगवंत सारांशरूपाने वेदान्त सूत्राचे निरूपण करीत आहेत. ते म्हणतात की, असंख्य जीवांचे दोन वर्गामध्ये विभाजन करता येते, च्युत आणि अच्युत. जीव हे भगवंतांचे सनातन विभिन्नांश किंवा विभाजित अंश आहेत. जेव्हा ते भौतिक प्रकृतीच्या संपर्कात असतात तेव्हा त्यांना जीवभूत म्हटले जाते. या ठिकाणी योजिलेले संस्कृत शब्द क्षरः सर्वाणि भूतानी दर्शवितात की, ते च्युत आहेत. तथापि, जे भगवंतांशी एकरूप आहेत त्यांना अच्युत म्हटले जाते. या ठिकाणी, एकरूपता या शब्दाचा अर्थ जीवांना वैयक्तिक अस्तित्व नाही असा नव्हे, परंतु त्यांच्यामध्ये विसंवाद नाही. सृष्टीच्या प्रयोजनाच्या बाबतीत त्या सर्वांचे एकमत आहे. अर्थात, आध्यात्मिक जगतात, सृष्टी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, परंतु वेदान्तसूत्रामध्ये भगवंत हे सर्व प्रकटीकरणाचे स्रोत असल्याचे सांगितल्यामुळे ही संकल्पना स्पष्ट करण्यात आली आहे.

          भगवान श्रीकृष्णांच्या विधानानुसार जीवांचे दोन वर्ग आहेत. वेद या गोष्टीला प्रमाणित करतात म्हणून त्याविषयी काहीच संदेह नाही. पाच इंद्रिये आणि मनाशी संघर्ष करणा-या जीवांना भौतिक शरीरे असतात व ही शरीरे निरंतर बदलत असतात. जोपर्यंत जीव बद्धावस्थेमध्ये आहे तोपर्यंत पदार्थाशी संपर्क असल्यामुळे त्याचे शरीर बदलत असते. जड पदार्थांमध्ये परिवर्तन होत असते, म्हणून जीवही बदलल्याचे दिसते. तथापि, आध्यात्मिक जगतातील देह हा भौतिक तत्त्वांपासून बनलेला नसतो म्हणून तो विकारी नसतो. भौतिक जगतात जीवामध्ये जन्म, वाढ, उपस्थिती, जनन, क्षय तथा विनाश हे सहा विकार होतात. हे विकार भौतिक शरीराचे आहेत; परंतु आध्यात्मिक जगतात शरीर बदलत नाही. त्या ठिकाणी जन्म-मृत्यू-जरा-व्याधी काहीच नसते. तेथे सर्व काही एकत्वामध्येच स्थित असते. क्षरः सर्वाणि भूतानि-या भौतिक जगताच्या संपर्कात येणा-या आदिजीव ब्रह्मदेवापासून ते सूक्ष्म कीटकापर्यंत सर्वांचे शरीर बदलत असते, म्हणून ते सर्व च्युत आहेत. तथापि, आध्यात्मिक जगतात ते एकत्वामध्ये सदैव मुक्तच आहेत.

« Previous Next »