No edit permissions for मराठी

TEXT 20

iti guhya-tamaṁ śāstram
idam uktaṁ mayānagha
etad buddhvā buddhimān syāt
kṛta-kṛtyaś ca bhārata

इति—याप्रमाणे;गुह्य-तमम्—परमगुह्य;शास्त्रम्-शास्त्र; इदम्—हे;उक्तम्-प्रकट केले, मया-मी; अनघ—हे निष्पाप अर्जुना; एतत्—हे; बुद्ध्वा—जाणुन; बुद्धि-मान्—बुद्धिमान; स्यात्— मनुष्य होतो; कृत-कृत्य:-आपल्या प्रयत्नांमध्ये कृतार्थ किंवा परमसिद्ध; च-आणि; भारत-हे भारत.

हे निष्पाप अर्जुना! हा वैदिक शास्त्रांचा परमगुह्य गाभा आहे आणि तो आता मी तुला प्रकट केला आहे. जो कोणी हे जाणेल तो बुद्धिमान होतो आणि त्याच्या प्रयत्नांद्वारे सिद्ध होतो.

तात्पर्य: भगवंत या श्लोकात स्पष्टपणे सांगतात की, हे तत्व सर्व शास्त्रांचे सार आहे आणि भगवंतांनी ज्या यथार्थ रूपामध्ये ते प्रदान केले आहे त्याच रूपात ते मनुष्याने जाणले पाहिजे. अशा रीतीने मनुष्य बुद्धिमान आणि दिव्य ज्ञानामध्ये परिपूर्ण होईल. दुस-या शब्दांत सांगावयाचे तर, भगवंतांचे हे तत्वज्ञान जाणल्याने आणि त्यांच्या दिव्य सेवेमध्ये संलग्न झाल्याने सर्वजण प्राकृतिक गुणांच्या सर्व विकारांतून मुक्त होऊ शकतात. भक्तियोग हा आध्यात्मिक ज्ञानाचा मार्ग आहे. जेथे भक्तियोग आहे तेथे भौतिक विकार असू शकत नाहीत. भगवद्भक्ती आणि भगवंत यांचे स्वरूप आध्यात्मिक असल्याकारणाने ते एकसमानच आहेत. भक्ती ही भगवंतांच्या अंतरंगा शक्तीच्या आधिपत्याखाली केली जाते. भगवंतांना सूर्य आणि अज्ञानाला अंधकार म्हटले जाते. जेथे सूर्य आहे तेथे अंधकार राहू शकत नाही. म्हणून जेथे प्रमाणित आध्यात्मिक गुरूच्या योग्य मार्गदर्शनाखाली भक्ती केली जाते तेथे लेशमात्रही अज्ञान असू शकत नाही.

          शुद्ध आणि बुद्धिमान होण्यासाठी सर्वांनी कृष्णभावनेचा स्वीकार करून भक्तीमध्ये संलग्न झाले पाहिजे. जोपर्यंत मनुष्य श्रीकृष्णांच्या या ज्ञानाप्रत उन्नत होऊन भक्तीमध्ये संलग्न होत नाही तोपर्यंत सामान्य मनुष्यांच्या गणनेमध्ये तो कितीही बुद्धिमान असला तरी, तो ख-या अर्थाने बुद्धिमान असू शकत नाही.

          अर्जुनाला संबोधलेला अनघ हा शब्द महत्वपूर्ण आहे. अनघा अर्थात, निष्पाप. सर्व पापांतून मुक्त झाल्याविना श्रीकृष्णांचे ज्ञान होणे अत्यंत कठीण आहे. मनुष्याने सर्व पापांतून, सर्व विकारांतून मुक्त झाले पाहिजे तरच तो श्रीकृष्णांना जाणू शकतो. परंतु भक्ती ही इतकी विशुद्ध आणि सामथ्र्यशाली आहे की, भक्तीमध्ये संलग्न झालेला मनुष्य आपोआपच अनघावस्थेची प्राप्ती करतो.

          शुद्ध भक्तांच्या संगामध्ये पूर्णपणे कृष्णभावनामय होऊन भक्ती करीत असताना मनुष्याने काही विशिष्ट गोष्टींचा समूळ विनाश करून त्यावर विजय मिळविणे आवश्यक आहे. सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे मनुष्याने अंत:करणाच्या दुबळेपणावर मात केली पाहिजे. मनुष्याचे सर्वप्रथम अध:पतन हे भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याच्या इच्छेमुळे होते. यामुळे तो भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेचा त्याग करतो. अंत:करणाचा दुसरा दुबळेपणा म्हणजे मनुष्याची भौतिक प्रकृतीवर स्वामित्व गाजविण्याची प्रवृत्ती वाढली की, पदार्थामध्ये आणि पदार्थाचा संग्रह करण्यामध्ये तो आसक्त होतो. भौतिक अस्तित्वाच्या समस्या या अंत:करणाच्या दुबळेपणामुळे निर्माण होतात. या अध्यायातील पहिले पाच श्लोक अंतःकरणाच्या दुबळेपणातून मुक्त होण्याच्या विधींचे वर्णन करतात आणि उर्वरित अध्यायामध्ये, सहाव्यापासून ते शेवटच्या श्लोकापर्यंत पुरुषोत्तम योगाचे वर्णन करण्यात आले आहे.

या प्रकारे भगवद्‌गीतेच्या ‘पुरुषोत्तमयोग’ या पंधराव्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.

« Previous