No edit permissions for मराठी

TEXT 19

yo mām evam asammūḍho
jānāti puruṣottamam
sa sarva-vid bhajati māṁ
sarva-bhāvena bhārata

यः-जो कोणी; माम्-मी; एवम्-याप्रमाणे; असम्मूढः-निःसंदेह; जानाति-जाणतो; पुरुषउत्तमम्-पुरुषोत्तम भगवान; सः-तो; सर्व-वित्-सर्वज्ञ; भजति-भक्तिपूर्ण सेवा करतो; माम्-मला; सर्व-भावेन-सर्व प्रकारे; भारत-हे भारत.

जो मला संशयरहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो तो सर्वज्ञ होय. म्हणून हे भारता! तो माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न होतो.

तात्पर्य: जीव आणि परम सत्य यांच्या स्वरूपाविषयी अनेक तात्विक तर्क आहेत. आता या श्लोकामध्ये भगवंत स्पष्टपणे सांगतात की, जो भगवान श्रीकृष्णांना पुरुषोत्तम म्हणून जाणतो तो वस्तुतः सर्वज्ञ आहे. जो अपूर्ण ज्ञानी आहे तो परम सत्याविषयी केवळ तर्कच करीत राहतो; परंतु परिपूर्ण ज्ञानी आपला मौल्यवान वेळ व्यर्थ न दवडता प्रत्यक्ष कृष्णभावनाभावित भगवद्भक्तीमध्ये संलग्न होतो. संपूर्ण भगवद्गीतेत याच तथ्यावर पदोपदी जोर देण्यात आला आहे. तरीही भगवद्गीतेवरील अनेक दुराग्रही भाष्यकार परम सत्य आणि जीव यांना सर्वच बाबतीत एकरूप असल्याचे मानतात.

     वैदिक ज्ञानाला श्रुति अर्थात, श्रवणाद्वारे ज्ञान प्राप्त करणे, असे म्हटले जाते. वास्तविकपणे मनुष्याने श्रीकृष्ण आणि त्यांच्या प्रतिनिधींसारख्या प्रमाणित व्यक्तींकडून वैदिक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. येथे भगवान श्रीकृष्णांनी फार चांगल्या रीतीने तत्वविवेचन केले आहे आणि मनुष्याने अशा अधिकृत पुरुषाकडून श्रवण केले पाहिजे. डुकराप्रमाणे केवळ श्रवण करणे पुरेसे नाही; मनुष्याने त्यांच्याकडून वास्तविक ज्ञान जाणून घेतले पाहिजे. केवळ शैक्षणिक पांडित्याद्वारे त्याने तर्क करू नये. विनम्र भावाने भगवद्गीतेद्वारे ऐकले पाहिजे की, सर्व जीव हे सदैव भगवंतांच्या अधीन असतात. जो कोणी हे जाणू शकतो तो, भगवान श्रीकृष्णांच्याच शब्दांत सांगावयाचे तर, वेदांचे प्रयोजन जाणतो आणि अन्य कोणीही नाही.

          भजति हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण  आहे. भजति हा शब्द अनेक ठिकाणी भगवत्सेवेच्या संदर्भात योजिलेला आहे. जर मनुष्य पूर्णपणे कृष्णभावनाभावित भगवद्भक्तीमध्ये संलग्न झालेला असेल तर त्याने संपूर्ण वैदिक ज्ञान प्राप्त केल्याचे जाणले पाहिजे. वैष्णव परंपरेमध्ये म्हटले आहे की, मनुष्य जर कृष्णभक्तीमध्ये संलग्न झालेला असेल तर परम सत्याला जाणण्यासाठी त्याने अन्य कोणत्याही आध्यात्मिक मार्गाचा अवलंब करण्याची आवश्यकता नाही. त्याने प्रयोजन गाठलेच आहे, कारण तो भगवद्भक्तीमध्ये संलग्न आहे. भगवंतांना जाणण्याच्या सर्व प्राथमिक मार्गाना त्याने पार केले आहे. तथापि, शेकडो-हजारो वर्षांपर्यंत तर्क करूनही जर मनुष्य, श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान असल्याचे जाणत नाही आणि त्यांना शरण जात नाही तर त्याने इतक्या जन्मांपर्यंत आणि वर्षांपर्यंत केलेला तर्क म्हणजे केवळ निरर्थक कालापव्ययच आहे.

« Previous Next »