No edit permissions for मराठी

TEXT 10

yāta-yāmaṁ gata-rasaṁ
pūti paryuṣitaṁ ca yat
ucchiṣṭam api cāmedhyaṁ
bhojanaṁ tāmasa-priyam

यात-यामम्-भोजनापूर्वी तीन तास आधी शिजविलेले अन्न, गत-रसम्-रसहीन, पूति  - दुर्गांधीयुक्त; पर्युषितम्-नासलेले; -सुद्धा; यत्-जे; उच्छिष्टम्-इतरांनी खाऊन उरलेले, उष्टे; अपि-सुद्धा; -आणि; अमेध्यम्-अपवित्र किंवा अस्पृश्यः भोजनम्-भोजन; तामस-तमोगुणी मनुष्याला; प्रियम्—प्रिय.

तीन तासांपेक्षा अधिक काळापूर्वी शिजविलेले, बेचव, नासलेले, दुर्गंधीयुक्त, उष्टे आणि अपवित्र पदार्थांनी युक्त असे अन्न तमोगुणी लोकांना प्रिय असते.

तात्पर्य: आयुष्यवृद्धी करणे, मनःशुद्धी करणे आणि बलोवृद्धी करणे हाच अन्नाचा एकमेव उद्देश आहे. प्राचीन काळी महान ऋषींनी दुग्धपदार्थ, साखर, तांदूळ, गहू, फळफळावळे, भाजीपाला इत्यादी आरोग्यवर्धक आणि दीर्घायू देणा-या अन्नाची निवड केली. असे अन्नपदार्थ सत्वगुणी मनुष्यांना अत्यंत प्रिय असतात. भाजलेला मका, काकवी इत्यादी इतर अत्रपदार्थ जरी स्वादिष्ट नसले तरी दुधाबरोबर किंवा इतर अन्नपदार्थाबरोबर त्यांचे मिश्रण केल्यास तेही स्वादिष्ट बनू शकतात आणि मग ते सात्विक होतात. हे सर्व खाद्यपदार्थ नैसर्गिकरीत्याच पवित्र असतात. मद्य, मांस यांसारख्या अपवित्र पदार्थांपासून ते पूर्णतया भिन्न असतात. आठव्या श्लोकामध्ये उल्लेख केलेल्या स्निग्ध पदार्थाचा, हिंसा करून मिळविलेल्या जनावरांच्या चरबीशी काहीही संबंध नाही. हीच जनावरांची चरबी, दुधाच्या रूपामध्ये प्राप्त होते. दूध हे सर्व अन्नपदार्थांपैकी अत्यंत पौष्टिक आहे. दूध, लोणी, चका इत्यादी दुग्धपदार्थांपासून स्निग्धता प्राप्त होते व त्यामुळे निरपराध प्राण्यांची हिंसा करण्याची आवश्यकता राहात नाही. केवळ पाशवी मनोवृत्तीमुळेच प्राण्यांची हिंसा होत असते. दुधापासून चरबी प्राप्त करणे हीच सुसंस्कृत पद्धती आहे. हिंसा करणे हा नरपशूचा मार्ग आहे. डाळ, वाटाणे, गहू इत्यादी पदार्थांपासून विपुल प्रमाणात प्रथिने प्राप्त होतात.

          कडू अतिशय खारट, अतिउष्ण किंवा अतितिखट अशा राजसिक पदार्थामुळे उदरातील जाठररस कमी होतो व यामुळे पीडा व रोग निर्माण होतात. तमोगुणी आहार हा शिळा असतो.           तीन तासांपूर्वी शिजविलेला कोणताही पदार्थ तामसिक असतो (भगवंतांना अर्पण केलेल्या अन्नाव्यतिरिक्त). तामसिक अन्न हे नासलेले असल्यामुळे त्यामधून दुर्गधी येत असते. अशा अन्नाकडे तमोगुणी लोक आकर्षित होतात. परंतु सत्वगुणी लोकांना मात्र अशा अन्नाचा किळस येतो.

          सर्वप्रथम भगवंतांना अर्पिलेले किंवा साधुजनांनी, विशेषत: आध्यात्मिक गुरूंनी ग्रहण केलेले उष्टेच केवळ खाता येते अन्यथा उष्टे भोजन तमोगुणी समजले जाते आणि असे अन्न संसर्गदोष किंवा रोग पसरविते. तमोगुणी मनुष्यांसाठी असे अन्न जरी अतिशय स्वादिष्ट असले तरी सत्त्वगुणी मनुष्यांना असे अन्न आवडत नाही व ते अशा अन्नास स्पर्शही करीत नाहीत. सर्वोत्तम भोजन म्हणजे भगवत्प्रसाद होय. भगवद्गीतेत भगवंत सांगतात की, ते भाजीपाला, धान्य आणि दुधापासून बनलेले पदार्थ भक्तिभावाने अर्पण केल्यास स्वीकारतात. पत्र पुष्पं फलं तोयम्, अर्थात, भक्ती आणि प्रेम या दोन प्रमुख गोष्टींचाच भगवंत स्वीकार करतात. परंतु असाही उल्लेख आहे की, प्रसाद हा विशिष्ट पद्धतीने तयार केला पाहिजे. शास्त्रातील आदेशानुसार तयार केलेले व भगवंतांना अर्पण केलेले कोणतेही अन्न जरी अत्यंत शिळे असले तरी ते ग्रहण केलेच पाहिजे. कारण असा अन्नरूपी प्रसाद हा दिव्य असतो. म्हणून अत्राला निर्जंतुक, खाण्यास योग्य आणि रुचकर बनविण्यासाठी ते भगवंतांना अर्पण केले पाहिजे.

« Previous Next »