No edit permissions for मराठी

TEXT 28

aśraddhayā hutaṁ dattaṁ
tapas taptaṁ kṛtaṁ ca yat
asad ity ucyate pārtha
na ca tat pretya no iha

अश्रद्धया-श्रद्धेविना; हुतम्-हवन; दत्तम्-दान; तपः-तप; तप्तम्-संपत्र; कृतम्-केलेले; च-सुद्धा; यत्-जे; असत्-असत् किंवा मिथ्या; इति-याप्रमाणे; उच्यते-म्हटले जाते; पार्थ-हे पार्थ;-कधीच नाही; -सुद्धा; तत्-ते; प्रेत्य-मृत्यूनंतर; न उ-तसेच; इह-या जीवनात.

परमेश्वरावरील श्रद्धेविना यज्ञ, दान किंवा तप म्हणून जे काही केले जाते, ते अनित्यच होय. अशा कर्माला'असत्'म्हटले जाते आणि ते या जन्मी तसेच पुढील जन्मीसुद्धा व्यर्थच ठरते.

तात्पर्य: दिव्य उद्दिष्टावाचून जे काही केले जाते, मग ते यज्ञ, दान अथवा तप असो ते सर्व काही व्यर्थच असते. म्हणून या श्लोकात म्हटले आहे की, अशी असत् कमें निंद्य आहेत. कृष्णभावनाभावित होऊन सर्व कमें परब्रह्माप्रीत्यर्थ केली पाहिजेत. अशा श्रद्धेविना आणि योग्य मार्गदर्शनावाचून कोणतीही फलप्राप्ती होऊ शकत नाही. सर्व वेदांमध्ये भगवंतांवरील श्रद्धेचे प्रतिपादन करण्यात आले आहे. सर्व वैदिक उपदेशांचे अंतिम लक्ष्य म्हणजे श्रीकृष्णांना जाणणे हेच आहे आणि या तत्वाचे पालन केल्यावाचून कोणालाही यशप्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून प्रमाणित आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभापासूनच कृष्णभावनाभावित होऊन कर्म करणे हा सर्वोत्तम मार्ग होय. अशा पद्धतीने सर्व काही यशस्वी होते.

          बद्धावस्थेत लोक हे देवतांच्या, भूतांच्या किंवा कुबेरासारख्या यक्षादीकांच्या उपासनेकडे आकर्षिले जातात. सत्त्वगुण हा रजोगुण आणि तमोगुणापेक्षा अधिक चांगला आहे; परंतु जो साक्षात कृष्णभावनेचा अंगीकार करतो तो या प्राकृतिक गुणांच्या अतीत होतो. क्रमिक उन्नतीचा विधी जरी उपलब्ध असला तरी मनुष्याने शुद्ध भक्तांच्या संगतीमध्ये साक्षात कृष्णभावनेचा स्वीकार केला तर तोच सर्वोत्तम मार्ग होय आणि याच मार्गाचे या अध्यायामध्ये प्रतिपादन करण्यात आले आहे. याप्रमाणे यश:प्राप्ती करण्यासाठी मनुष्याने सर्वप्रथम योग्य प्रमाणित आध्यात्मिक गुरूंचा शोध करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण प्राप्त केले पाहिजे. त्या वेळी त्याला भगवंतांवरील श्रद्धेची प्राप्ती होऊ शकते. ती श्रद्धा जेव्हा कालांतराने परिपक्व होते तेव्हा तिला भगवत्प्रेम असे म्हणतात. हे भगवत्प्रेम म्हणजेच जीवांचे परमलक्ष्य आहे. यास्तव मनुष्याने साक्षात कृष्णभावनेचाच स्वीकार केला पाहिजे. सतराव्या अध्यायाचा हाच संदेश आहे.

या प्रकारे भगवद्‌गीतेच्या ‘श्रद्धात्रयविभाग योग’ या सतराव्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.

« Previous