TEXT 5
yajña-dāna-tapaḥ-karma
na tyājyaṁ kāryam eva tat
yajño dānaṁ tapaś caiva
pāvanāni manīṣiṇām
यज्ञ-यज्ञ; दान-दान; तपः-आणि तप; कर्म-कर्म; न-कधीही नाही; त्याज्यम्-त्याग करणे; कार्यम्-केले पाहिजे; एव-खचित; तत्-ते; यज्ञः-यज्ञ; दानम्-दान; तपः-तप; च-आणि; एव-निश्चितपणे; पावनानि-पवित्र करणारी; मनीषिणाम्-महात्म्यांकरिता देखील.
यज्ञ, दान, तप या स्वरूपाच्या कर्माचा त्याग करू नये. ती कर्मे केलीच पाहिजेत. यज्ञ, दान आणि तप ही तर महात्म्यांनादेखील पवित्र करतात.
तात्पर्य: योगिजनांनी मानवसमाजाच्या प्रगतीकरिता कर्मे केली पाहिजेत. मनुष्याची आध्यात्मिक जीवनात प्रगती व्हावी याकरिता अनेक संस्कार सांगण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, विवाह समारंभ हा या यज्ञांपैकी एक यज्ञ समजला जातो व त्याला विवाह-यज्ञ असे म्हणतात. ज्याने आपल्या कौटुंबिक संबंधाचा त्याग करून संन्यासाश्रम स्वीकारला आहे अशा मनुष्याने विवाहसमारंभाला उत्तेजन द्यावे का? भगवंत येथे म्हणतात की, मानवाच्या कल्याणाकरिता असणा-या कोणत्याही यज्ञाचा कधीही त्याग करू नये. आध्यात्मिक प्रगतीकरिता मनुष्याचे मन संयमित आणि शांत व्हावे हा विवाह-यज्ञाचा उद्देश आहे. संन्याशांनी सुद्धा बहुतेक लोकांकरिता अशा विवाह-यज्ञाची शिफारस केली पाहिजे. संन्याशांनी स्वत: स्त्रीसंग कधीही करता कामा नये; परंतु याचा असा कधीच अर्थ होत नाही की, जीवनाच्या निम्न स्तरावरील मनुष्य किंवा एका युवकाने विवाह-समारंभात पत्नीचा स्वीकार करू नये. सर्व यज्ञ भगवत्प्राप्तीकरिता केले पाहिजेत. म्हणून निम्नस्तरावर असताना त्यांचा त्याग करणे उचित नसते. त्याचप्रमाणे दान हे हृदयाच्या शुद्धीकरिता दिले जाते. पूर्वी सांगितल्याप्रमाणे, जर सुपात्र मनुष्याला दान दिले तर त्यायोगे आध्यात्मिक जीवनात प्रगती होते.