TEXT 62
tam eva śaraṇaṁ gaccha
sarva-bhāvena bhārata
tat-prasādāt parāṁ śāntiṁ
sthānaṁ prāpsyasi śāśvatam
तम्—त्याला; एव—निश्चितपणे, शरणम् गच्छ—शरण जा; सर्व-भावेन—सर्व प्रकारे; भारत— हे भारता; तत्-प्रसादात्—त्याच्या कृपेने; पराम्-परम; शान्तिम-शांती; स्थानम्-धाम; प्राप्स्यसि—तुला प्राप्त होईल; शाश्वतम्-शाश्वत.
हे भारता! पूर्णपणे त्याला शरण जा. त्याच्या कृपेने तुला दिव्य शांती आणि सनातन परमधामाची प्राप्ती होईल.
तात्पर्य: यास्तव सर्वांच्या हृदयात स्थित असलेल्या भगवंतांना जीवाने शरण गेले पाहिजे आणि यामुळे सर्व प्रकारच्या सांसारिक दु:खांतून त्याची मुक्तता होईल. अशा शरणागतीमुळे मनुष्याची याच जीवनामध्ये संकटमुक्तता होते, एवढेच नव्हे तर शेवटी त्याला भगवंतांची प्राप्तीसुद्धा होते. परम धामाचे वर्णन वेदांमध्ये (ऋग्वेद १.२२.२०) तद्विष्णो: परमं पदम् या शब्दांत करण्यात आले आहे. संपूर्ण सृष्टी म्हणजे परमेश्वराचेच राज्य असल्यामुळे सर्व प्राकृत गोष्टी या आध्यात्मिकच आहेत, परंतु परमं पदम् हे शब्द सनातन धामाचा निर्देश करतात. या सनातन धामालाच वैकुंठ असे म्हटले जाते.
भगवद्गीतेच्या पंधराव्या अध्यायात म्हटले आहे की, सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्ट:-भगवंत हे सर्वांच्या हृदयात स्थित आहेत. म्हणून या ठिकाणी सांगण्यात आलेला उपदेश की, मनुष्याने अंतर्यामी परमात्म्याला शरण जावे, म्हणजेच मनुष्याने भगवान श्रीकृष्णांना शरण जाणे होय. अर्जुनाने पूर्वीच श्रीकृष्णांचा भगवान म्हणून स्वीकार केला आहे. दहाव्या अध्यायामध्ये श्रीकृष्णांना परम ब्रह्म परम धाम या शब्दांमध्ये संबोधण्यात आले आहे. अर्जुनाने श्रीकृष्णांचा भगवान आणि सर्व जीवाचे परम धाम म्हणून स्वीकार केला आहे तो केवळ त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक अनुभवावरूनच नव्हे तर नारद, असित, देवल, व्यास, यासारख्या महान अधिकारी आचार्यांच्या प्रमाणाचीही त्याच्या स्वीकाराला पुष्टी आहे.