No edit permissions for मराठी

TEXT 66

sarva-dharmān parityajya
mām ekaṁ śaraṇaṁ vraja
ahaṁ tvāṁ sarva-pāpebhyo
mokṣayiṣyāmi mā śucaḥ

सर्व-धर्मान्-सर्व प्रकारच्या धर्माचा; परित्यज्य-त्याग करून; माम्-मला; एकम्-केवळ; शरणम्—शरण; व्रज—जा; अहम्—मी; त्वाम्—तुला; सर्व—सर्व; पापेभ्यः—पापांपासून; मोक्षयिष्यमि-मुक्त करीन; मा-करू नकोस; शुचः-चिंता.

सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कर आणि केवळ मलाच शरण ये. मी तुला सर्व पांपापासून मुक्त करीन. तू भयभीत होऊ नकोस.

तात्पर्य: भगवान श्रीकृष्णांनी परब्रह्माचे ज्ञान, परमात्म्याचे ज्ञान, वर्णाश्रम पद्धतीचे ज्ञान, संन्यासाश्रमाचे ज्ञान, निरासक्तीचे, मन आणि इंद्रियसंयमनाचे, ध्यानाचे इत्यादी नाना प्रकारच्या ज्ञानाचे, धर्मपद्धतींचे वर्णन केले आहे. त्यांनी विविध प्रकारच्या धर्माचे अनेक प्रकारे वर्णन केले आहे. आता भगवद्गीतेचे सार सांगताना भगवंत अर्जुनाला सांगतात की, त्यांनी आतापर्यंत वर्णन केलेल्या सर्व पद्धतींचा त्याग करावा आणि केवळ मला शरण यावे. अशा शरणागतीमुळे अर्जुनाचे सर्व पापांपासून रक्षण होईल, कारण भगवंत स्वतः त्याला तसे वचन देत आहेत.

          आठव्या अध्यायात सांगितले होते की, जो सर्व पापांपासून मुक्त झाला आहे तोच केवळ श्रीकृष्णांचे पूजन करू शकतो. यावरून कोणाला असे वाटेल की, सर्व पापांपासून मुक्त झाल्यावाचून मनुष्य शरणागतीचा अंगीकार करू शकत नाही. अशा शंकांचे निरसन करण्यासाठीच या ठिकाणी म्हटले आहे की, मनुष्य जरी सर्व पापांपासून मुक्त झालेला नसला तरी केवळ श्रीकृष्णांना शरण गेल्यामुळे तो आपोआपच सर्व पापांतून मुक्त होतो. पापांपासून मुक्त होण्यासाठी खडतर प्रयास करण्याची मुळीच आवश्यकता नाही. श्रीकृष्ण हे सर्व जीवांचे सर्वश्रेष्ठ रक्षणकर्ता आहेत हे जाणून त्यांना नि:संशयपणे शरण गेले पाहिजे. श्रद्धा आणि प्रेमाने त्यांना शरण जाणे आवश्यक आहे.

श्रीकृष्णांना शरण जाण्याच्या विधीचे वर्णन हरिभक्तिविलास (११.६७६) मध्ये करण्यात आले आहे,

आनुकूल्यस्य सङ्‌कल्प: प्रातिकूल्यस्य वर्जनम्‌ ।
रक्षिष्यतीति विश्र्वासो गोप्तृत्वे वरणं तथा।
आत्मनिक्षेप कार्पण्ये षड्विधा शरणागति:।।

भक्तियोगाच्या पद्धतीनुसार, जी धर्मतत्वे मनुष्याला अखेरीस भगवद्भक्ती प्राप्त करण्यास साहाय्य करतात त्याच धर्मतत्त्वांचा त्याने स्वीकार करावा. वर्णाश्रम व्यवस्थेतील आपल्या स्थितीनुसार मनुष्य विशिष्ट प्रकारचे विहित कर्म करीत असेल, परंतु अशा कर्तव्यपालनाने तो जर कृष्णभावनेप्रत येत नसेल तर त्याची सर्व कर्म व्यर्थच आहेत. जी गोष्ट आपल्याला कृष्णभावनेच्या परिपूर्ण स्तरापर्यंत नेत नाही ती गोष्ट आपण टाळली पाहिजे. सर्व परिस्थितीत श्रीकृष्ण आपले संकटापासून रक्षण करतील हा दृढ विश्वास मनुष्याला असला पाहिजे. आपले प्राणधारण कसे करता येईल याची चिंता मनुष्याने करण्याची आवश्यकता नाही. श्रीकृष्णच त्याकडे लक्ष देतील. त्याने सदैव आपल्याला असाहाय्य मानून श्रीकृष्णांनाच आपल्या जीवनातील प्रगतीचा आधार मानले पाहिजे. जेव्हा मनुष्य गंभीरपणे पूर्णपणे कृष्णभावनामय होऊन भगवद्भक्तीमध्ये संलग्न होतो तेव्हा तो तात्काळ भौतिक प्रकृतीच्या सर्व कल्मषांतून मुक्त होतो. धर्माचे अनेक विधी आहेत आणि ज्ञान, ध्यानयोग इत्यादी शुद्धीकरण करण्याचे अनेक मार्ग आहेत; परंतु जो श्रीकृष्णांना शरण जातो त्याला या पद्धतींचे अनुसरण करण्याची मुळीच आवश्यकता नाही. केवळ श्रीकृष्णांना शरण जाण्याचे मनुष्याला अनावश्यक कालापव्यय वाचतो. अशा रीतीने मनुष्य तात्काळ आपली प्रगती करून सर्व पापांतून मुक्त होऊ शकतो.

          श्रीकृष्णांच्या सुंदर रूपाकडे पाहून त्यांच्याकडे आकृष्ट झाले पाहिजे. ते सर्वाकर्षक असल्यामुळे त्यांचे नाव कृष्ण आहे. जो मनुष्य श्रीकृष्णांच्या सुंदर, सर्वशक्तिमान रूपाद्वारे आकर्षित होतो तो भाग्यवान होय. विविध प्रकारचे योगी असतात, काहीजण निर्विशेष ब्रह्मामध्ये आसक्त असतात, काहीजण परमात्म्याद्वारे आकर्षित होतात इत्यादी. तथापि, जो कोणी भगवंतांच्या साकार रूपाद्वारे आकर्षित होतो आणि विशेषतः जो साक्षात् भगवान श्रीकृष्णांकडे आकर्षित होतो तो परिपूर्ण योगी होय. दुस-या शब्दांत सांगावयाचे तर, पूर्ण भावनेद्वारे कृष्णभक्ती करणे हेच ज्ञानाचे परम गोपनीय सार होय आणि संपूर्ण भगवद्गीतेचेही हेच सार आहे. कर्मयोगी, ज्ञानयोगी, अष्टांगयोगी आणि भक्त या सर्वानाच योगी म्हटले जाते, परंतु जो शुद्ध भक्त आहे तो सर्वोत्तम आहे. या श्लोकामध्ये योजिलेले मा शुच: भयभीत होऊ नको, चिंता करू नको, संकोच करू नको, हे विशिष्ट शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहेत. मनुष्याने सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कसा करावा व केवळ श्रीकृष्णांना शरण कसे जावे याबद्दल एखादा गोंधळून जाऊ शकेल, परंतु अशी चिंता व्यर्थ आहे.

« Previous Next »