No edit permissions for मराठी

TEXT 15

yaṁ hi na vyathayanty ete
puruṣaṁ puruṣarṣabha
sama-duḥkha-sukhaṁ dhīraṁ
so ’mṛtatvāya kalpate

यम्- ज्याला; हि-निश्चित; -कधीच नाही; व्यथयन्ति- व्यथित होणे किंवा विचलित होणे; एते-या सर्व; पुरुषम् - पुरुषाला; पुरुष -ऋषभ-हे पुरुषश्रेष्ठा; सम- अविचल किंवा समान; दु: -दु:खामध्ये; सुखम् -सुखामध्ये; धीरम्-धीर, विवेकी; :-तो; अमृतत्वाय-मुक्तीसाठी; कल्पते-योग्य होतो.

हे पुरुषश्रेष्ठा अर्जुना! जो मनुष्य सुख आणि दु: यांनी विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो तो मोक्षप्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य आहे.

तात्पर्य: आध्यात्मिक साक्षात्कारामधील उच्चतर अवस्थेची प्राप्ती करण्याच्या निश्‍चयात जो दृढ आहे आणि सुखदु:खाचे आघात जो समभावाने सहन करतो तो खचितच मोक्षप्राप्तीस पात्र आहे. वर्णाश्रमसंस्थेमध्ये, जी चौथी अवस्था; संन्यासाश्रम आहे ती अत्यंत खडतर अवस्था आहे, पण जो आपले जीवन परिपूर्ण करण्याबद्दल प्रामाणिक आहे तो सर्व अडचणींना न जुमानता संन्यासाश्रम स्वीकारतो. कौटुंबिक नाते तोडल्यामुळे आणि पत्नी व मुलेबाळे यांच्या संपर्काचा त्याग करण्यामुळे साधारणपणे अडचणी उद्भवतात. परंतु जर कोणी अशा अडचणी सहन करण्यास समर्थ असेल तर निश्चितपणे आत्मसाक्षात्काराच्या मार्गात तो पूर्णत्व प्राप्त करतो. त्याचप्रमाणे जरी आपल्या कुटुंबीयांशी किंवा प्रियजंनाशी लढणे कठीण असले तरी अर्जुनाने आपल्या क्षत्रिय धर्माच्या कर्तव्यपालनात चिकाटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असा त्याला उपदेश देण्यात आला आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी वयाच्या चोविसाव्या वर्षीच संन्यास ग्रहण केला आणि त्यांच्यावर अवलंबून असणारी त्यांची तरूण पत्नी आणि वृद्ध माता यांची देखभाल करण्यास कोणीच नव्हते. तरीसुद्धा उच्चतर हेतूप्रीत्यर्थ त्यांनी संन्यास घेतला व ते आपल्या श्रेष्ठ अशा कर्तव्यपालनात दृढ होते. भौतिक बंधनातून मुक्ती प्राप्त करण्याचा तोच एकमात्र मार्ग आहे.

« Previous Next »