TEXT 24
acchedyo ’yam adāhyo ’yam
akledyo ’śoṣya eva ca
nityaḥ sarva-gataḥ sthāṇur
acalo ’yaṁ sanātanaḥ
अच्छेद्य:- न तुटणारा; अयम्- हा आत्मा; अदाह्य:- न जळणारा; अयम्-हा आत्मा; अक्लेद्य:- अविद्राव्य किंवा न विरघळणारा; अशोष्य:- न सुकणारा; एव-निश्चित; च-आणि; नित्य:-शाश्वत; सर्व-गत:-सर्वव्यापी; स्थाणु:- न बदलणारा; अचल:-निश्चल; अयम्-हा आत्मा; सनातन:-शाश्वत तसचा राहणारा.
हा आत्मा अविद्राव्य व न तुटणारा आहे आणि त्याला सुकविणे किंवा जाळणेही शक्य नाही. हा नेहमी टिकणारा, सर्वव्यापी, अपरिवर्तनीय, निश्चल आणि नित्य सारखाच राहणारा आहे.
तात्पर्य: अणुरुप आत्म्याचे हे सर्व गुणधर्म निश्चितपणे सिद्ध करतात, की जीवात्मा हा परमात्म्याचा नित्य अणुरुप अंश असतो आणि त्यात काहीही बदल न होता तो नित्य अणुरुप अंशच राहतो. याबाबतीत अद्वैत सिद्धांत लागू करणे फार कठीण आहे. कारण स्वतंत्र जीवात्मा कधीच एकजिनसी होऊ शकत नाही. भौतिक दोषांपासून मुक्त झाल्यावर अणुरुप आत्मा भगवंतांच्या दिव्य तेजोमय किरणांमध्ये आध्यात्मिक स्फुलिंग म्हणून राहू शकतो; परंतु जे बुद्धिमान जीवात्मे असतात ते भगवंतांच्या सान्निध्यात राहण्यासाठी आध्यात्मिक लोकांमध्ये प्रवेश करतात.
सर्वगत: (सर्वव्यापी) हा शब्द महत्वपूर्ण आहे. कारण भगवंतांच्या संपूर्ण सृष्टीमध्ये जीवात्मे आहेत. ही गोष्ट नि:संशय आहे. ते भूमीवर, पाण्यामध्ये, हवेमध्ये, पृथ्वीच्या पोटात आणि अग्नीमध्येही राहतात. अग्नीमध्ये जीवात्म्यांचे निर्जीवीकरण होते हा सिद्धांत मान्य करता येत नाही. या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, आत्मा हा अग्नीद्वारे जाळला जात नाही. म्हणून ही गोष्ट नि:संशय आहे की, सूर्यग्रहावरही तेथे राहण्यास योग्य अशी शरीरे असलेले जीवात्मे आहेत. जर सूर्यगोलावर वस्ती नसती तर सर्वगत: हा शब्द अर्थहीन झाला असता.