No edit permissions for मराठी

TEXT 28

avyaktādīni bhūtāni
vyakta-madhyāni bhārata
avyakta-nidhanāny eva
tatra kā paridevanā

अव्यक्त-आदीनि- आरंभी अप्रकट; भूतानि- उत्पन्न झालेले सर्व जीव; व्यक्त - प्रकट, सृष्ट; मध्यानि-मध्ये; भारत- हे भरतवंशजा; अव्यक्त - अप्रकट; निधनानि - विनाश झाल्यावर; एव- हे सर्व त्याप्रमाणे आहे ; तत्र-म्हणून ; का- कसला; परिदेवना- शोक.

समस्त जीव प्रारंभी अव्यक्त असतात, मध्यावस्थेत व्यक्त असतात आणि विनाशानंतर पुन्हा अव्यक्त होतात. म्हणून शोक करण्याची काय आवश्यकता आहे?

तात्पर्य: आत्म्याच्या अस्तित्वावर विश्‍वास ठेवणारे आणि आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारे असे तत्ववेत्त्यांचे दोन वर्ग जरी मानले तरी, दोहोंच्या दृष्टीनेही शोक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आत्म्याच्या अस्तित्वावर विश्‍वान न ठेवणाऱ्याना वेदविद्येचे अनुयायची नास्तिक असे म्हणतात. तरीही केवळ वादविवादाकरिता हा नास्तिकवादी सिद्धांत आपण स्वीकारला तरी शोक करण्याचे काहीच कारण नाही. आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व सोडले तर भौतिक तत्त्वे ही सृष्टीच्या निर्मितीपूर्वी अप्रकटच राहतात. ज्याप्रमाणे आकाशातून वायू उत्पन्न होतो, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल आणि जलापासून पृथ्वी उत्पन्न होते त्याचप्रमाणे अव्यक्ताच्या या सूक्ष्मावस्थेतून व्यक्त अवस्था उत्पन्न होते. पृथ्वीपासून विविध प्रकारचे प्रकटीकरण होते. उदाहरणार्थ, पृथ्वीपासून प्रकट झालेली गगनचुंबी इमारत जेव्हा ती कोसळविली जाते तेव्हा तिची प्रकटावस्था पुन्हा अप्रकट होते आणि सरतेशेवटी तिचे रुपांतर कणांमध्ये होते. शक्तीच्या अविनाशत्वाच नियम (Law of conservation of energy) कायम राहतो. पण कालगतीला अनुसरुन पदार्थ प्रकट होतात आणि अप्रकट होतात हा फरक आहे. म्हणून प्रकटावस्था असो वा अप्रकटावस्थेतही पदार्थ नष्ट होत नाहीत. आरंभ आणि अंत या दोन्ही अवस्थेत तत्त्वे अव्यक्त राहतात. केवळ मध्यावस्थेत ती व्यक्त होतात आणि यामुळे कोणताही महत्वपूर्ण फरक पडत नाही.

     कालांतराने हे भौतिक शरीर नष्ट होते (अन्तवन्त इमे देहा:) पण आत्मा हा सनातन आहे. (नित्यस्योक्ता: शरीरिण:) भगवद्गीतेत सांगितलेल्या या वैदिक निष्कर्षाचा आपण स्वीकार केला तर आपण नेहमी ध्यानात ठेवले पाहिजे की, शरीर हे एखाद्या वस्त्राप्रमाणे आहे आणि म्हणून वस्त्र बदलण्याचे शोक करण्यात काय अर्थ आहे?सनातन आत्म्याच्या अस्तित्वात विचार केला तर या भौतिक शरीराला वास्तविक अस्तित्वच नाही. हे एका स्वप्नाप्रमाणे आहे. स्वप्नामध्ये आपल्याला वाटते की, आपण आकाशात उडत आहोत किंवा एखाद्या राजप्रमाणे रथामध्ये विराजमान आहोत. परंतु जेव्हा आपल्याला जाग येते तेव्हा आपण पाहतो की, आपण आकाशातही नाही किंवा रथामध्येही नाही. भौतिक शरीराला वास्तविक अस्तित्व नाही या आधारावर वैदिक ज्ञान आत्मसाक्षात्कार प्राप्तीला प्रोत्साहन देते. म्हणून मनुष्याचा विश्वास आत्म्याच्या अस्तित्वावर असो वा नसो, शरीराच्या विनाशाबद्दल शेाक करण्याचे काहीच कारण नाही.

« Previous Next »