No edit permissions for मराठी

TEXT 29

āścarya-vat paśyati kaścid enam
āścarya-vad vadati tathaiva cānyaḥ
āścarya-vac cainam anyaḥ śṛṇoti
śrutvāpy enaṁ veda na caiva kaścit

आश्चर्य-वत् -आश्‍चर्यकारक; पश्यति- पाहतो; कश्चित् - कोणी; एनम् - या आत्म्याला; आश्चर्य-वत् -विस्मयकारक; वदति-बोलतात; तथा - ज्याप्रमाणे ; एव-निश्चितपणे; -सुद्धा; अन्य:- दुसरा; आश्चर्य-वत् - विस्मयकारक; - सुद्धा; एनम्- या आत्म्याला; अन्य: - दुसरा; श्रृणोति-ऐकतो; श्रृत्वा- ऐकल्यानंतर; अपि- सुद्धा ; एनम् - या आत्म्याला; वेद - जाणतो; -कधीही नाही; - आणि; एव-निश्चित; कश्चित्-कोणीही

कोणी या आत्म्याकडे विस्मयकारक म्हणून पाहतात, कोणी याचे वर्णन अद्भुत म्हणून करतात आणि कोणी याच्याबद्दल आश्चर्यकारक म्हणून ऐकतात. पंरतु दुसरे असे आहे की, जे त्याच्याबद्दल ऐकल्यावरही त्याला मुळीच जाणू शकत नाहीत.

तात्पर्य : गीतोपनिषद हे मुख्यत: उपनिषदातील सिद्धांतावर आधारित असल्यामुळे याच प्रकारचा श्‍लोक कठोपनिषदातही (1.2.7) आढळतो यात आश्‍चर्य नाही.

श्रवणयापि बहुभिर्योन लभ्य: श्रृण्वन्तोऽपि बहवो यं न विद्यु:।
आश्चर्यो वक्ता कुशलोऽस्य लब्धा आश्चर्योऽस्य ज्ञाता कुशलानुशिष्ट:॥

     एका महाकाय जनावराच्या शरीरात, एखाद्या प्रचंड वटवृक्षात आणि एक इंच जागेत असणाऱ्या कोट्यावधी जीवजंतूंमध्येही आत्मा असणे ही गोष्ट निश्चितच आश्‍चर्यकारक आहे. आदिजीव ब्रह्मदेवाला ज्ञान देणाऱ्या सर्वश्रेष्ठ प्रमाणित ज्ञानाधिकारी भगवंतांनी जरी या आत्म्याचे वर्णन केले तरी अल्पज्ञ आणि अतपस्वी लोक अणुरुप आध्यात्मिक स्फुलिंगाचे विस्मयकारक गुण समजू शकत नाहीत. पदार्थाबद्दलच्या स्थूल जडवादी संकल्पनेमुळे या युगातील बहुतेक लोक, हा सूक्ष्म कण एकाच वेळी महान आणि सूक्ष्म कसा असू शकतो हे समजू शकत नाहीत. वास्तविक आत्म्याच्या स्वरुपामुळे किंवा वर्णनामुळे लोक त्याच्याकडे आश्‍चर्यकारक म्हणून पाहतात. भौतिक शक्तीने मोहित झाल्यामुळे ते इंद्रियतृप्तीमध्ये इतके मग्न असतात की, आत्मज्ञानप्राप्तीसाठी त्यांच्याकडे अत्यंत अल्पवेळ असतो. जीवनार्थ संघर्षामध्ये आत्मज्ञानविरहीत सर्व कार्ये व्यर्थ ठरतात ही वस्तुस्थिती आहे. भौतिक दु:खातून सुटण्यासाठी मनुष्याने आत्म्याचा विचार करणे आवश्यक आहे याची कदाचित लोकांना कल्पनाही नाही.

     आत्म्याबद्दल श्रवण करण्यासाठी इच्छुक असणारे काही लोक सत्संगामध्ये प्रवचन ऐकतही असतील, परंतु काही वेळा अज्ञानवश, आत्मा आणि परमात्मा यांच्या परिमाणातील भेद न जाणता ते एकच आहेत या समजुतीद्वारे त्यांची दिशाभूल केली जाते. परमात्म्याचे स्वरूप, आत्म्याचे स्वरुप, त्यांचे कार्य तसेच त्यांचा एकमेकातील संबंध आणि इतर बारीक मोठे तपशील याचे पूर्ण ज्ञान असणारी व्यक्ती आढळणे अत्यंत कठीण आहे. आत्मज्ञानामुळे होणारा वास्तविक लाभ आणि आत्म्याचे स्वरुप विविध मार्गाने समजावून सांगू शकणारा मनुष्य सापडणे हे त्यापेक्षाही दुस्तर आहे; पण जर कोणत्याही प्रकारे एखादा आत्मज्ञान जाणू शकला तर त्याचे जीवन सफल होते.

     आत्म्यासंबंधीचे ज्ञान जाणण्याचा अत्यंत सोपा मार्ग म्हणजे सर्वश्रेष्ठ प्रमाणित अधिकारी भगवान श्रीकृष्ण यांनी भगवद्गीतेत सांगितलेल्या उपदेशाचा इतर सिद्धांतामुळे विचलित न होता स्वीकार करणे, श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम श्रीभगवान म्हणून स्वीकार करण्यापूर्वी मनुष्याने या जन्मात किंवा पूर्वजन्मात महान अशी तपस्या आणि त्याग करणे अत्यावश्यक आहे. परंतु श्रीकृष्णांना याप्रमाणे जाणणे केवळ शुद्ध भक्तांच्या अहैतुकी कृपेनेच शक्य आहे आणि अन्य कोणत्याही उपायाने नाही.

« Previous Next »