No edit permissions for मराठी

TEXT 47

karmaṇy evādhikāras te
mā phaleṣu kadācana
mā karma-phala-hetur bhūr
mā te saṅgo ’stv akarmaṇi

कर्मणि-नियत कर्तव्यांमध्ये; एव-निश्चितपणे; अधिकार:- अधिकार; ते -तुझा; मा-कधीही नाही; फलेषु-कर्मफलांवर; कदाचन- कधीही किंवा केव्हाही; मा- कधीच नाही; कर्म-फल-कर्माच्या फलावर; हेतु:- कारण; भू:-होतास; मा-कधीच नाही; ते- तुझा; सङ्ग- आसक्ती; अस्तु-असावी; अकर्मणि-नियम कर्तव्य न करण्यामध्ये.

तुझे नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण कर्मफलांवर तुझा अधिकार नाही. तुझ्या कर्मफलास ते कारणीभूत आहेस असे कधीही समजू नकोस तसेच तुझे कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस.

तात्पर्य: या ठिकाणी कर्म, विकर्म आणि अकर्म या तीन गोष्टी विचारणीय आहेत. प्राप्त प्राकृतिक गुणांनुसार केलेले कार्य म्हणजे नियत कर्म (कर्म) होय. विकर्म म्हणजे शास्त्रांविरुद्ध केलेले कर्म होय आणि अकर्म म्हणजे स्वत:चे कर्म न करणे. भगवंतांनी अर्जुनाला निष्क्रिय न होता, कर्मफलेच्छारहित होऊन आपले विहित कर्म करण्याचा सल्ला दिला. जो आपल्या कर्मफलांवर आसक्त असतो तो आपल्या कर्मासही कारणीभूत असतो. अशा रीतीने तो या प्रकारच्या कर्माचा उपभोग घेतो किंवा त्यापासून दु:ख भोगतो.

     नियत कर्मांचा विचार केल्यास अशा प्रकारचे कर्म तीन प्रकारे विभाजित करता येते; नित्य कर्म, नैमित्तिक कर्म आणि सकाम कर्म. शास्त्रांच्या आदेशानुसार कर्तव्य म्हणून फलेच्छाविरहित केलेले कर्म सत्वगुणयुक्त कर्म असते. फलाची आशा ठेवून केलेले कर्म बंधनकारक ठरते. म्हणून असे कर्म अशुभ असते. स्वत:चे नियत कर्म करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे; पण त्याने फलावर आशा न ठेवता कर्म करणे आवश्यक आहे. असे निष्काम भावाने केलेले कर्म नि:संशयपणे मनुष्याला मोक्षमार्गावर घेऊन जाते.

     म्हणून भगवंतांनी अर्जुनाला फळाची आशा न धरता एक कर्तव्याची बाब समजून युद्ध करण्यास सांगितले. त्याने युद्धात भाग न घेणे ही आसक्तीचीची दुसरी बाजू आहे. सकारात्मक किंवा नकारात्मक, कोणत्याही प्रकारची आसक्ती ही बंधनासच कारणीभूत ठरते. निष्कर्म हे पापमय आहे. यास्तव कर्तव्य म्हणून युद्ध करणे हा अर्जुनासाठी एकमात्र मुक्तीचा शुभदायी मार्ग होता.

« Previous Next »