No edit permissions for मराठी

TEXT 48

yoga-sthaḥ kuru karmāṇi
saṅgaṁ tyaktvā dhanañ-jaya
siddhy-asiddhyoḥ samo bhūtvā
samatvaṁ yoga ucyate

योग-स्थ:- समभाव किंवा योगामध्ये स्थिर; कुरु - कर; कर्माणि-तुझे कर्म; सङ्गम -आसक्ती; त्यक्त्वा-त्याग करून; धनञ्जय- हे अर्जुन; सिद्धि-असिद्धयो:- यशापयशामध्ये; सम:- समभावाने; भूत्वा- होऊन; समत्वम्- समभाव; योग:- योग; उच्यते-म्हटले आहे.

हे अर्जुना! यश आणि अपयशाबद्दलच्या संपूर्ण आसक्तीचा त्याग करून समभावाने तुझे कर्म कर. अशा समभावालाच योग असे म्हटले जाते.

तात्पर्य: श्रीकृष्ण अर्जुनाला योगयुक्त कर्म करण्यास सांगतात. हा योग म्हणजे काय? योग म्हणजे सदैव चंचल असणाऱ्या इंद्रियांचे नियंत्रण करून परम तत्त्वावर मन एकाग्र करणे होय. परमतत्व म्हणजे कोण आहे? परमतत्व म्हणजेच श्रीभगवान आहेत आणि भगवंत स्वत: अर्जुनाला युद्ध करण्यास सांगत असल्यामुळे अर्जुनाला युद्धाच्या परिणामांशी काहीही कर्तव्य नाही. लाभ अथवा जय हा श्रीकृष्णांचा प्रश्‍न आहे. श्रीकृष्णांच्या आदेशानुसार अर्जुनाने कार्य करण्याचा त्याला सल्ला देण्यात आला आहे. श्रीकृष्णांच्या आज्ञेचे पालन करणे हाच वास्तविक ‘योग’ आहे आणि याचेच पालन कृष्णभावनामृत पद्धतीमध्ये केले जाते. कृष्णभावनामृताद्वारेच मनुष्य स्वामित्त्वाच्या भावनेचा त्याग करू शकतो. मनुष्याने श्रीकृष्णांचा सेवक किंवा श्रीकृष्णांच्या सेवकाचा सेवक बनणे अत्यावश्यक आहे. कृष्णभावनेमध्ये कर्म करण्याचा हाच एक योग्य मार्ग आहे आणि या मार्गाद्वारेच आपण योगयुक्त कर्म करू शकतो.

     अर्जुन हा क्षत्रिय आहे म्हणून तो वर्णाश्रमाधर्म संस्थेत सहभागी होत आहे. विष्णुपुरणामध्ये सांगण्यात आले आहे की, वर्णाश्रम धर्म पद्धतीचा संपूर्ण उद्देश श्रीविष्णूंना संतुष्ट करणे हा आहे. भौतिक जगातील नियमांप्रमाणे प्रत्येकजण स्वत: तृप्त होण्याचा प्रयत्न करीत असतो; परंतु वास्तविकपणे मनुष्याने स्वत:ची संतुष्टी न करता श्रीकृष्णांना संतुष्ट केले पाहिजे. म्हणून जोपर्यंत मनुष्य श्रीकृष्णांना संतुष्ट करीत नाही तोपर्यंत तो वर्णाश्रम धर्माच्या तत्त्वांचे पालन योग्य रीतीने करू शकत नाही. अप्रत्यक्षपणे, श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे कार्य करण्याचा सल्ला अर्जुनाला देण्यात आला आहे.

« Previous Next »