No edit permissions for मराठी

TEXT 51

karma-jaṁ buddhi-yuktā hi
phalaṁ tyaktvā manīṣiṇaḥ
janma-bandha-vinirmuktāḥ
padaṁ gacchanty anāmayam

कर्म-जम्- सकाम कर्मामुळे; बुद्धि-युक्ता:-भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होऊन; हि-निश्चितपणे; फलम्-फळ; त्यक्त्वा- त्याग करून; मनीषिण:- महान ऋषिमुनी किंवा भक्त; जन्म-बन्ध- जन्ममृत्यूच्या बंधनातून; विनिर्मुक्ता: - मुक्त झालेले; पदम् - पद अथवा स्थान; गच्छन्ति- ते पोहोचतात; अनामयम्- दु:खरहित.

याप्रमाणे भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होऊन महान ऋषिमुनी अथवा भक्तगण भौतिक जगातील कर्मफलातून मुक्त होतात. अशा रीतीने ते जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होतात आणि सर्व दु:खांच्या पलीकडील स्थानाची (भवगद्धामाची) प्राप्ती करतात.

तात्पर्य : भौतिक क्लेश नसलेल्या ठिकाणी मुक्त जीव वास करतात. श्रीमद्भागवत (10.14.58)

समाश्रिता ये पदपवल्लवप्लवं महत्पदं पुण्ययशो मुरारे:।
भवाम्बुधिर्वत्सपदं परं पदं पदं पदं यद्विपदां न तेषाम् ॥

     ‘‘जो परमेश्वर व्यक्त सृष्टीचा आश्रय आहे आणि जो मुकुंद म्हणजेच मुक्तिदाता म्हणून प्रसिद्ध आहे त्या भगवंतांच्या चरणकमलरूपी नावेचा ज्याने आश्रय ग्रहण केला आहे त्याला हा भवसागर वासराच्या खुराच्या ठशात मावणाऱ्या पाण्यासमान वाटतो. ज्या ठिकाणी पदोपदी संकटेच आहेत असे ठिकाण प्राप्त करणे हे त्याचे ध्यय नसून परम् किंवा भौतिक क्लेषविरहित स्थान किंवा वैकुंठ प्राप्ती हेच त्याचे ध्येय असते.’’

     अज्ञानवश मनुष्य जाणत नाही की, भौतिक जग हे पदोपदी संकटांनी भरलेले आहे व अत्यंत क्लेषदायक आहे. केवळ अज्ञानामुळेच अल्पबुद्धी लोक हे सकाम कर्मे करून परिस्थितीशी जमवून घेण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना वाटते की, त्यापासून प्राप्त होणाऱ्या फलामुळे ते सुखी होतील. विश्‍वामध्ये कुठेही आणि कोणत्याही प्रकारचे शरीर क्लेषविरहीत जीवन देऊन शकत नाही हे त्यांना माहीत नसते. जन्म-मृत्यू-जरा आणि व्याधी ही जीवनाची दु:खे भौतिक जगतात सर्वत्र आढळतात; परंतु भगवंतांचा सनातन सेवक म्हणून जो स्वत:चे स्वरुप जाणतो आणि याप्रमाणे भगवंतांच्याही स्वरुपाचे ज्याला ज्ञान होते, तो स्वत:ला पुरुषोत्तम श्रीभगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये संलग्न करतो. त्यामुळे स्वाभाविकत:च तो भौतिक क्लेशदायी जीवन आणि काळ व मृत्यू यांचा यत्ंकिचितही प्रभाव नसणाऱ्या वैकुंठलोकात प्रवेश करण्यास पात्र बनतो. स्वत:ची मूळ स्वरुपस्थिती जाणणे म्हणजेच भगवंतांचे दिव्य स्वरुपही जाणणे होय. जो चुकीने जाणतो की, आत्म्याचे आणि भगवंतांचे स्वरुप हे एकाच स्तरावरचे आहे तो अंधकारात आहे असे जाणावे आणि त्यामुळेच तो भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होऊ शकत नाही. असा मनुष्य स्वत:च भगवंत बनतो आणि याप्रकारे जन्म -मृत्यूच्या चक्रात पडण्याचा मार्ग स्वत:च मोकळा करतो. तथापि, जो जाणतो की, भगवंतांची सेवा करणे ही आपली स्वरूप-स्थिती आहे, तो स्वत:ला भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न करतो आणि तात्काळ  वैकुंठलोकात प्रवेश करण्यास पात्र होतो. भगवंतांची सेवा म्हणून केलेले कर्म म्हणजेच कर्मयोग किंवा बुद्धियोग होय किंवा स्पष्ट शब्दांत सांगावयाचे तर, हीच भगवद्भक्ती होय.

« Previous Next »