No edit permissions for मराठी

TEXT 55

śrī-bhagavān uvāca
prajahāti yadā kāmān
sarvān pārtha mano-gatān
ātmany evātmanā tuṣṭaḥ
sthita-prajñas tadocyate

श्री-भगवान उवाच - श्रीभगवान म्हणाले; प्रजहाति- त्याग करतो; यदा-जेव्हा; कामान्-इंद्रियतृप्तीच्या इच्छांचा; सर्वान्-सर्व प्रकारच्या; पार्थ-हे पार्थ; मन:-गतान्- मानसिक तर्कवितर्क: आत्मनि-आत्म्याच्या विशुद्ध अवस्थेत; एव- निश्चितपणे; आत्मना-पवित्र किंवा शुद्ध मनाने; तुष्ट:- तृप्त, समाधानी; स्थित-प्रज्ञ:- दिव्यावस्थेत स्थित झालेला; तदा-त्या वेळी; उच्यते- म्हटले आहे.

श्रीभगवान म्हणाले: हे पार्थ! मानसिक तर्कवितर्कामुळे उत्पन्न झालेल्या इंद्रियतृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा मनुष्य जेव्हा त्याग करतो आणि याप्रमाणे त्याचे शुद्ध झालेले मन जेव्हा केवळ आत्म्यामध्येच संतुष्ट होते तेव्हा तो स्थितप्रज्ञ अर्थात, विशुद्ध दिव्यावस्थेत स्थित झाला आहे असे म्हटले जाते.

तात्पर्य: श्रीमद्भागवत स्पष्टपणे सांगते की, जो पूर्णपणे कृष्णभावनायुक्त किंवा भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये आहे त्याच्यामध्ये, महान ऋषींकडे आढळणारे सर्व गुण असतात. परंतु जो याप्रकारे स्थितप्रज्ञ नाही त्याच्याकडे कोणतेही चांगले गुण नाहीत. कारण तो निश्चितपणे स्वत:च्या मानसिक तर्कवितर्काचा आश्रय घेत असतो. म्हणून येथे उचितपणे म्हटले आहे की, मानसिक तर्कवितर्काने निर्माण झालेल्या सर्व प्रकारच्या इंद्रियतृप्तीच्या इच्छांचा मनुष्याने त्याग करणे अत्यावश्यक आहे. इंद्रियांच्या अशा इच्छा कृत्रिम रीतीने थांबविता येत नाहीत, पण कृष्णभावनेमध्ये निमग्न झाल्याने आपोआपच सर्व इंद्रियांच्या इच्छा विशेष प्रयत्नाशिवाय कमी होतात. म्हणून मनुष्याने कोणतीही आशंका न बाळगता कृष्णभावनेमध्ये संलग्न होणे आवश्यक आहे. कारण अशी भक्तिपूर्ण सेवा त्याला तात्काळ स्थितप्रज्ञ होण्यास मदत करते. महात्मा हा निरंतर स्वत:मध्येच संतुष्ट राहतो. कारण आपण भगवंतांचे सनातन सेवक आहोत हे त्याने निश्चितपणे जाणलेले असते. अशा स्थितप्रज्ञ व्यक्तीला तुच्छ भौतिकेपासून निर्माण होणऱ्या इंद्रियकामाना नसतात, किंबहूना तो आपल्या भगवंतांची नित्य सेवा करण्याच्या स्वाभाविक स्थितीमध्येच सतत आनंदी राहतो.

« Previous Next »