TEXT 6
na caitad vidmaḥ kataran no garīyo
yad vā jayema yadi vā no jayeyuḥ
yān eva hatvā na jijīviṣāmas
te ’vasthitāḥ pramukhe dhārtarāṣṭrāḥ
न- नाही; च -सुद्धा ; एतत् - हे; विद्म-आम्हाला माहीत आहे; कतरत्- कोणते; न:-आमच्यासाठी; गरीय:-श्रेयस्कर किंवा उत्तम; यत् वा- अथवा; जयेम-आम्ही जिंकू; यदि-जरी; वा-किंवा; न-आम्ही; जयेयु: - ते जिंकतील; यान्-ज्यांना; एव- खचितच; हत्वा- हत्या करून; न-कधीच नाही; जिजीविषाम:- आम्ही जगू इच्छितो; ते - ते सर्वजण; अवस्थिता:-उभे आहेत; प्रमुखे- सामोरे; धार्तराष्ट्रा:- धृतराष्ट्राचे पुत्र.
त्यांच्यावर विजय प्राप्त करणे की त्यांच्याकडून पराजित होणे या दोहोंपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे हे आम्हाला कळत नाही. जर आम्ही धृतराष्ट्रपुत्रांची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही. तरी देखील युद्धभूमीमध्ये ते आमच्या समोरच उभे आहेत.
तात्पर्य: जरी युद्ध करणे हे क्षत्रियांचे कर्तव्य असले तरी युद्ध करून अनावश्यक हिंसा करण्याचा धोका पत्करावा, की युद्धापेक्षा भिक्षा मागून जीवन कंठावे हे अर्जुनाला कळत नव्हते. युद्धामध्ये जर त्याने शत्रूवर विजय प्राप्त केला नाही तर भिक्षा मागणे हेच केवळ त्याच्या उदरनिर्वाहाचे साधन होते आणि विजयाचीही शाश्वती नव्हती, कारण दोन्हींपैकी कोणताही पक्ष विजयी होऊ शकतो. जरी विजयश्री हातात माळ घेऊन वाट पाहत असली आणि (आणि त्यांची बाजू समर्थनीयच होती) तरी जर धृतराष्ट्रपुत्रांचा युद्धात मृत्यू झाला, तर त्यांच अनुपस्थितीत जीवन कंठणे अत्यंत कठीण होते. अशा प्राप्त परिस्थितीत तो त्यांचा दुसऱ्या प्रकारचा पराभवच होता. अर्जुनाने विचारात घेतलेल्या या सर्व गोष्टी निश्चितपणे सिद्ध करतात की, तो भगवंतांचा केवळ महान भक्त नव्हता तर तो अत्यंत ज्ञानी होता आणि त्याचा आपल्या मनावर व इंद्रियांवर पूर्ण संयम होता. राजघराण्यात जन्मला असूनही त्याची भिक्षा मागून जीवन कंठण्याची इच्छा म्हणजे अनासक्तीचे आणखी एक लक्षण होय. हे सर्व गुण आणि भगवान श्रीकृष्ण (त्याचे आध्यात्मिक गुरु) यांच्या आज्ञेवरील त्याचा विश्वास दर्शवितो की, तो खऱ्या अर्थाने सद्गुणी होता. यावरून सिद्ध होते की, अर्जुन हा मोक्षप्राप्तीला सर्वथा योग्य होता. जोपर्यंत इंद्रियनिग्रह करता येत नाही तोपर्यंत उच्चतर अशा ज्ञानावस्थेची प्राप्ती होण्याची शक्यता नाही आणि ज्ञान व भक्तीशिवाय मोक्षप्राप्तीची शक्यता नाही. भौतिक संबंधाविषयी अर्जुनाला पुरेपूर जाण होती; परंतु त्यापेक्षा किती तरी अधिक पटीने हे सर्व आध्यात्मिक गुणविशेष त्याच्याकडे होते.