TEXT 20
karmaṇaiva hi saṁsiddhim
āsthitā janakādayaḥ
loka-saṅgraham evāpi
sampaśyan kartum arhasi
कर्मणा-कर्माद्वारे; एव-सुद्धा; हि-निश्चितच; संसिद्धिम्-सिद्धीमध्ये; आस्थिता:-स्थित झालेले; जनक-आदय:- जनक आणि इतर राजे; लोक-सङ्ग्रहम्-सामान्य लोक; एव अपि- सुद्धा; सम्पश्यन्-विचार करून; कर्तुम्-करण्यासाठी; अर्हसि-तू योग्य आहेस.
जनक आदी राजांनी केवळ नियत कर्मे करून सिद्धी प्राप्त केली. म्हणून एकंदर सामान्य लोकांना शिकविण्याकरिता तू आपले कर्म केले पाहिजे.
तात्पर्य: जनकासारखे सर्व राजे आत्मसाक्षात्कारी होते म्हणून वेदोक्त कर्मांचे पालन करण्याचे त्यांना बंधन नव्हते. तरीसुद्धा सामान्य लोकांना केवळ उदाहरण घालून देण्याकरिता त्यांनी सर्व विहित कर्मांचे आचरण केले. जनक राजा हे सीतादेवीचे पिता आणि भगवान श्रीरामांचे सासरे होते. भगवंतांचे महान भक्त असल्यामुळे ते दिव्य आध्यात्मिक स्थितीत स्थित होते; पंरतु ते मिथिलेचे (भारतातील बिहार प्रांताचा एक विभाग) राजा असल्यामुळे त्यांना आपल्या प्रजेला विहित कर्म कसे करावे याचे शिक्षण द्यावयाचे होते. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा नित्य सखा अर्जुन यांना कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये लढण्याची आवश्यकता नव्हती, पण त्यांनी युद्ध केलेच, कारण त्यांना सामान्य लोकांना हेच शिकवायचे होते की, ज्या ठिकाणी चांगला प्रतिवाद विफल होतो तेव्हा हिंसेचीही आवश्यकता असते. कुरुक्षेत्राच्या युद्धापूर्वी स्वत: भगवंतांनीही युद्ध टाळण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न केले होते, पण विपक्ष युद्ध करण्यासाठी निश्चयी होता. यास्तव अशा योग्य कारणासाठी युद्धाची आवश्यकता असतेच. कृष्णभावनेमध्ये स्थित असलेल्या व्यक्तीला जरी या जगाबद्दल यक्तिंचितही आस्था नसली तरी तो लोकांनी कसे जीवन जगावे आणि कसे कर्म करावे हे त्यांना शिकविण्यासाठी कर्म करतो. कृष्णभावनेतील अनुभवी व्यक्ती असे आचरण करू शकते की, त्यामुळे इतर सर्वजण त्याचे अनुसरण करतात. याचेच वर्णन पुढील श्लोकात करण्यात आले आहे.