No edit permissions for मराठी

TEXT 26

na buddhi-bhedaṁ janayed
ajñānāṁ karma-saṅginām
joṣayet sarva-karmāṇi
vidvān yuktaḥ samācaran

-नाही; बुद्धि-भेदम्-बुद्धीचे विचलन; जनयेत्-त्याने करावे; अज्ञानाम्-अज्ञानी लोकांच्या; कर्म-सङ्गिनाम्-सकाम कर्मामध्ये आसक्त असलेल्या; जोषयेत्-नियुक्त किंवा नियोजित करावी; सर्व-सर्व; कर्माणि-कर्मे; विद्वान्-ज्ञानी किंवा विद्वान व्यक्ती; युक्त:- युक्त, व्यस्त; समाचरन्-आचरण करून

नियत कर्मांच्या फलामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्याचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्म थांबविण्यास प्रेरित करू नये. याउलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना (कृष्णभावनेच्या यथावकाश विकासासाठी) सर्व प्रकारच्या कार्यांमध्ये युक्त करावे.

तात्पर्य: वेदैश्च सर्वैरहमेव वेद्य:- हाच सर्व वैदिक कर्मकांडांचा अंतिम उद्देश आहे. सर्व कर्मकांडे सर्व प्रकारचे यज्ञ, भौतिक कार्याविषयीच्या संपूर्ण मार्गदर्शनासहित जे काही वेदांमध्ये आहे त्यांचा सर्वांचा उद्देश, जीवनाचे अंतिम ध्येय भगवान श्रीकृष्ण यांना जाणून घेणे हा आहे. बद्ध जीव इंद्रियतृप्तीच्या पलीकडे काहीच जाणीत नसल्यामुळे ते त्याच उद्देशाने वेदाध्ययन करतात, परंतु वैदिक  कर्मकांडांद्वारे, नियमित इंद्रियतृप्ती आणि सकाम कर्मांमुळे मनुष्य क्रमश: कृष्णभावनेप्रत उन्नत होतो. म्हणून कृष्णभावनेतील आत्म-साक्षात्कारी मनुष्याने इतरांना त्यांच्या कर्मांपासून विचलित करू नये किंवा त्यांचा बुद्धिभेद करू नये, तर सर्व कर्मांचे फळ श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये कसे अर्पण करता येते हे त्याने आपल्या आचरणाद्वारे दाखवून द्यावे. कृष्णभावनाभावित विद्वान व्यक्तीने अशा प्रकारे आचरण करावे की, ज्याद्वारे इंद्रियतृप्तीकरिता कर्म करणारा अज्ञानी व्यक्ती कर्म कसे करावे आणि आचरण कसे करावे हे जाणू शकेल. जरी अज्ञानी मनुष्याच्या कर्मात व्यत्य आणावयाचा नसला तरी कृष्णभावनेमध्ये अल्प प्रगती केलला मनुष्य, वेदोक्त कर्मकांडांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष भगवंतांच्या सेवेत संलग्न होऊ शकतो. अशा भाग्यशाली मनुष्याला वैदिक कर्मकांडांचे पालन करण्याची आवश्यकता नाही. कारण विहित कर्मांचे पालन केल्यामुळे प्राप्त होणाऱ्या सर्व फळांची प्राप्ती त्याला प्रत्यक्ष कृष्णभावनेद्वारा होऊ शकते.

« Previous Next »