No edit permissions for मराठी

TEXT 3

śrī-bhagavān uvāca
loke ’smin dvi-vidhā niṣṭhā
purā proktā mayānagha
jñāna-yogena sāṅkhyānāṁ
karma-yogena yoginām

श्री-भगवान उवाच-श्रीभगवान म्हणाले; लोके- जगामध्ये; अस्मिन्-या; द्वि-विधा-दोन प्रकारचे; निष्ठा-निष्ठा किंवा विश्वास; पुरा- पूर्वी; प्रोक्ता-सांगितले गेले; मया-माझ्याद्वारे; अनघ-हे निष्पाप अर्जुना; ज्ञान-योगेन- ज्ञानयोगाने; साङ्ख्यानाम्- प्रायोगिक तत्वज्ञान्यांच्या; कर्म-योगेन- भक्तियोगाद्वारे; योगिनाम्-भक्तांच्या.

श्रीभगवान म्हणाले: हे निष्पाप अर्जुना! मी यापूर्वीच सांगितले आहे की, आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न करणाऱ्या मनुष्यांचे दोन वर्ग आहेत. काहीजणांचा तात्त्विक तर्काद्वारे अर्थात, ज्ञानयोगाद्वारे आणि इतरांचा भक्तिपूर्ण सेवेद्वारे आत्मसाक्षात्कारी होण्याकडे कल असतो.

तात्पर्य: दुसऱ्या अध्यायातील एकोणचाळिसाव्या श्लोकामध्ये, सांख्ययोग आणि कर्मयोग किंवा बुद्धियोग या दोन मार्गांचे वर्णन भगवंतांनी केले आहे आणि याच मार्गाचे अधिक स्पष्टीकरण भगवंतांनी या श्लोकामध्ये केले आहे. ज्या लोकांची तर्क करून प्रायोगिक ज्ञान आणि तत्वज्ञान यांच्या साहाय्याने सर्व ज्ञान प्राप्त करण्याचा प्रवृत्ती आहे त्यांच्यासाठी सांख्ययोग किंवा आत्मा आणि प्रकृतीच्या स्वरुपाचे पृथक्करणात्मक ज्ञान ही विषयवस्तू आहे. दुसऱ्या अध्यायातील एकसाष्टाव्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे मनुष्याचा दुसरा वर्ग हा कृष्णभावनाभावित कर्म करणार्‍यांचा आहे. एकोणचाळिसाव्य श्लोकातही भगवंतांनी सांगितले आहे की, बुद्धियोग किंवा कृष्णभावनेच्या तत्त्वानुसार कर्म केल्याने मनुष्याची कर्मबंधनातून सुटका होऊ शकते, तसेच या पद्धतीमध्ये काहीच दोष नाही. याच तत्त्वाचे अधिक स्पष्टीकरण एकसष्टाव्या श्लोकामध्येही असे करण्यात आले आहे की, हा बुद्धियोग म्हणजे पूणपणे परमेश्‍वरावर (श्रीकृष्णांवर) विसंबून राहणे आणि याप्रकारे सर्व इंद्रियांना सहजपणे संयमित केले जाऊ शकते. म्हणून ज्याप्रमाणे धर्म आणि तत्वज्ञान दोन्ही परस्परावलंबी आहेत त्याप्रमाणे दोन्ही प्रकारचे योगही परस्परपूरक आहेत. तत्वज्ञानविरहित धर्म म्हणजे केवळ भावना आहे किंवा कधीकधी धर्मांधता आहे आणि धर्मविरहित तत्वज्ञान म्हणजे केवळ मानिसक कल्पना आहे. अंतिम ध्येय हे श्रीकृष्णच आहेत कारण जे तत्वज्ञानी प्रामाणिकपणे परम सत्याच्या शोधात आहेत ते सुद्धा शेवटी कृष्णभावनेचीच प्राप्ती करतात आणि हे सुद्धा भगवद्गीतेत सांगण्यात आले आहे. ही संपूर्ण पद्धती म्हणजे परमात्म्याच्या संबंधात असणारी आत्म्याची मूळ स्वरूपस्थिती जाणणे हीच आहे. तार्किक तत्वज्ञान ही एक अप्रत्यक्ष पद्धत आहे, ज्याद्वारे मनुष्य यथावकाश कृष्णभावनेकडे येऊ शकतो आणि दुसरी पद्धती म्हणजे प्रत्यक्षपणे कृष्णभावनेमध्ये सर्व गोष्टी संबंधित पाहणे होय. या दोन्हीपैकी कृष्णभावनेचा मार्ग हा अधिक चांगला आहे कारण तत्वज्ञानात्मक प्रक्रियेने होणाऱ्या इंद्रियांच्या शुद्धीकरणावर हा मार्ग अवलंबून नाही. कृष्णभावना हीच मुळी स्वत: शुद्धीकरण करणारी प्रक्रिया आहे. प्रत्यक्ष भक्तिपूर्ण सेवेद्वारे ही सहज तसेच उदात्त आहे.

« Previous Next »