No edit permissions for मराठी

TEXT 9

yajñārthāt karmaṇo ’nyatra
loko ’yaṁ karma-bandhanaḥ
tad-arthaṁ karma kaunteya
mukta-saṅgaḥ samācara

यज्ञ-अर्थात्- केवळ यज्ञासाठी किंवा श्रीविष्णूंसाठी; कर्मण:- कर्मापेक्षा; अन्यत्र - नाही तर; लोक:-जग; अयम्-या; कर्म-बन्धन:- कर्मबंधन; तत्-त्यांचे; अर्थम्-त्यांच्यासाठी; कर्म-कर्म; कौन्तेय- हे कौंतेय; मुक्त-सङ्ग:-संगातून मुक्त; समाचार-उत्तम रीतीने कर.

श्रीविष्णूंप्रीत्यर्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे नाही तर कर्म हे या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. म्हणून हे कौंतेया! तू आपल्या नियत कर्मांचे पालन श्रीविष्णूंच्या संतोषार्थ कर आणि या प्रकारे तू नेहमी कर्मबंधनातून मुक्त राहशील.

ताप्तर्य: केवळ शरीराच्या निर्वाहाकरिता देखील मनुष्याला कर्म करावे लागत असल्याने विशिष्ट सामाजिक स्थिती आणि गुणवत्ता यांच्या विहित कर्मांची रचना अशी आहे की, ज्यामुळे तो हेतूही साध्य होतो. यज्ञ म्हणजे भगवान श्रीविष्णू आहेत. सर्व यज्ञकर्मेही श्रीविष्णूंच्या संतोषाप्रीत्यर्थच असतात. वेद सांगतात की यज्ञो वै विष्णु: दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे तर, मनुष्याने यज्ञ किंवा प्रत्यक्षपणे भगवान विष्णूंची सेवा केल्याने एकच उद्देश सिद्ध होतो. म्हणून या श्लोकात सांगितल्याप्रमाणे कृष्णभावना हे यज्ञकर्मच आहे. श्रीविष्णूना संतुष्ट करणे हेच वर्णाश्रमाधर्माचे ध्येय आहे. वर्णाश्रमाचारवता पुरुषेण पर: पुमान् विष्णुराराध्यते (विष्णुपुराण 3.8.8.)

     म्हणून मनुष्याने श्रीविष्णूंच्या संतोषाप्रीत्यर्थ कर्म केले पाहिजे. या भौतिक जगात केलेले इतर कोणतेही कर्म बंधनासच कारणीभूत ठरते कारण चांगल्या व वाईट, दोन्ही प्रकारच्या कर्मांना आपापली फळे असतात. त्यामुळे कोणतेही कर्म मनुष्याला बद्ध करते. म्हणून मनुष्याने श्रीकृष्णांना (विष्णू) संतुष्ट करण्यासाठी कृष्णभावनाभावित कर्म करणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे कर्म करणारा  मुक्तावस्थेतच असतो. कर्म करण्याची हीच महान कला आहे; पंरतु आरंभी या मार्गामध्ये अंत्यंत निपुण मार्गदर्शनाची आवश्यकता असते. म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या भक्ताच्या निपुण मार्गदर्शनाखाली किंवा साक्षात भगवान श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष आदेशानुसार (ज्यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनाला कर्म करण्याची संधी मिळाली) मनुष्याने परिश्रमपूर्वक दक्षतेने कर्म केले पाहिजे. इंद्रियतृप्तीसाठी काहीही न करता सर्व काही केवळ श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरिताच केले पाहिजे. असे आचरण मनुष्याचे केवळ कर्मबंधनापासून रक्षण करते असे नव्हे तर त्यामुळे त्याची यथावकाश भगवंताच्या दिव्य प्रेममयी सेवेप्रती उन्नती होते. केवळ अशा सेवेमुळे भगवद्‌धर्माची प्राप्ती होऊ शकते.

« Previous Next »