No edit permissions for मराठी

TEXT 10

vīta-rāga-bhaya-krodhā
man-mayā mām upāśritāḥ
bahavo jñāna-tapasā
pūtā mad-bhāvam āgatāḥ

वीत-मुक्त झालेला;राग-आसक्ती; भय-भय; क्रोधा-आणि क्रोध; मत्-मया-पूर्णपणे माझ्यामध्ये; माम्-माझ्यामध्ये; उपाश्रिता:- पूर्णपणे स्थित झालेले किंवा आश्रित झालेले; बहव:- अनेक; ज्ञान-ज्ञानाच्या; तपसा-तपाद्वारे; पूता:- शुद्ध होऊन; मत्-भावम्-माझ्याविषयी दिव्यप्रेम; आगता:- प्राप्त केले.

आसक्ती, भय आणि क्रोध यांतून मुक्त झालेले, पूर्णपणे मत्परायण झालेले आणि माझा आश्रय ग्रहण करणारे गतकाळातील अनेकानेक मनुष्य माझ्याविषयीच्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत आणि याप्रमाणे त्या सर्वांना माझ्याविषयीच्या दिव्य प्रेमाची प्राप्ती झाली आहे.

तात्पर्य: पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे जो मनुष्य अत्यंत विषयाग्रस्त झालेला आहे त्याला परम सत्याचे वैयक्तिक स्वरुप जाणणे अतिशय दुस्तर आहे. सामान्यत: जे लोक देहात्मबुद्धीमध्ये आसक्त आहेत ते इतके विषयासक्तीमध्ये मग्न असतात की, त्यांना परम सत्यही साकार असू शकते याचे ज्ञान होणे जवळजवळ अशक्य असते. अशा जडवादी लोकांना सच्चिदानंद शरीराची कल्पनाही करता येणे अशक्य आहे. भौतिकदृष्ट्या शरीर हे विनाशी,पूर्णपणे अज्ञानमय आणि पूर्णपणे दु:खमय आहे. म्हणून सामान्यत: लोकांना जेव्हा परम सत्याच्या साकार रूपाबद्दल सांगितले जाते तेव्हा त्यांच्या मनात हीच शारीरिक संकल्पना घर करून बसलेली असते. अशा भौतिकवादी मनुष्यांसाठी प्राकृत सृष्टीचे महाकाय विराट रूपच सर्वश्रेष्ठ असते. यामुळेच ते लोक परम सत्याला निर्विशेष किंवा निराकार समजतात आणि ते अत्यंत विषयासक्त असल्यामुळे, भौतिक जगतातून मुक्त झाल्यावर, जीवाचे मूळ स्वरूप कायम राहते हा विचारच त्यांना भयावह वाटतो. जेव्हा त्यांना सांगितले जाते की, आध्यात्मिक जीवनही व्यक्तिगत आणि साकार आहे तेव्हा ते लोक पुन्हा शरीर धारण करण्याच्या कल्पनेने भयभीत होतात आणि यामुळे स्वाभाविकत:च ते निर्विशेष शून्यामध्ये विलीन होणे पसंत करतात. सामान्यपणे असे लोक जीवाची तुलना समुद्रातील बुडबुड्यांशी करतात, कारण असे बुडबुडे पुन्हा समुद्रातच विलीन होतात. साकार व्यक्तिमत्वारहित प्राप्त होणारी ही आध्यात्मिक जीवनातील परिपूर्ण आणि परमोच्च स्थिती आहे असे त्यांना वाटते. खरे तर, आध्यात्मिक जीवनाचे परिपूर्ण ज्ञान नसणारी ही जीवनाची एक प्रकारची भयावह अवस्था आहे. याव्यतिरिक्त असे अनेक लोक आहेत की, जे आध्यात्मिक जीवन मुळीच जाणत नाहीत. अनेक प्रकारचे सिद्धांत आणि विविध प्रकारच्या तत्वज्ञानांमधील विसंगतीमुळेच गोंधळून गेलेले ते लोक निराश किंवा क्रोधित होतात आणि मूर्खपणाने निष्कर्ष काढतात की, असे कोणतेही तत्व नाही की जे सर्व कारणांचे कारण आहे आणि सरतेशेवटी सर्व काही शून्यच आहे. असे लोक जीवनाच्या विकृत अवस्थेत असतात. काही लोक अत्यंत विषयासक्त असल्यामुळे आध्यात्मिक जीवनाकडे लक्ष देत नाहीत, काही लोकांना परम सत्यामध्ये विलीन होण्याची इच्छा असते. तर निराशेमुळे सर्व प्रकारच्या  आध्यात्मिक ज्ञानाचा तिटकारा आलेले लोक कोणत्याही गोष्टीवर विश्‍वास ठेवीत नाहीत. या शेवटच्या श्रेणीतील लोक कोणत्या तरी नशेच्या आहारी जातात आणि काही वेळा या लोकांच्या मतिविभ्रमालाच आध्यात्मिक दृष्टी मानली जाते. आध्यात्मिक जीवनाकडे दुर्लक्ष, वैयक्तिक आध्यात्मिक स्वरुपाचे भय आणि जीवनातील असफलतेमुळे निर्माण होणारी शून्यवादी कल्पना या भौतिक जगाच्या तिन्ही प्रकारच्या आसक्तींमधून मनुष्याने मुक्त होणे अत्यावश्यक आहे. या जीवनाच्या भौतिक संकल्पनेच्या तीन स्तरांमधून मुक्त होण्यासाठी मनुष्याने अधिकृत आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली भगवंतांचा पूर्ण आश्रय घेतला पाहिजे आणि भक्तिमय जीवनाच्या नियम आणि विधिविधांनाचे पालन केले पाहिजे. भक्तिमय जीवनाच्या अंतिम स्तराला ‘भाव’ अथवा ‘भगवंतांचे दिव्य प्रेम’ असे म्हटले जाते.

भक्तिरसामृतसिंधूनुसार भक्तीचे विज्ञान पुढीलप्रमाणे आहे. (1.4.15-16):

आदौ श्रद्धा तत: साधुसंगोऽथ भजनक्रिया
ततोऽनर्थनिवृत्ति: स्यात्ततो निष्ठा रूचिस्तत:।

अथासक्तिस्ततो भावस्तत: पे्रमाभ्युदञ्चति।
साधकानामंय प्रेम्ण: प्रादुर्भावे भवेत्क्रम:॥

     ‘‘प्रारंभी मनुष्याला आत्मसाक्षात्काराची इच्छा असणे आवश्यक आहे. यामुळे आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत व्यक्तीच्या सत्संगामध्ये जाण्याचा प्रयत्न करण्याच्या अवस्थेप्रत तो येईल. पुढील अवस्थेत त्याला उन्नत आध्यात्मिक गुरुद्वारे दीक्षा प्राप्त होते आणि त्यांचया आज्ञेनुसार नवसाधक भक्तिपूर्ण सेवेचा आरंभ करतो. आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली भक्तिपूर्ण सेवा केल्याने तो सर्व प्रकारच्या भौतिक आसक्तीतीतून मुक्त होतो. आत्मसाक्षात्कारामध्ये रूची निर्माण होते. या रुचीमुळे मनुष्याची कृष्णभावनेतील आसक्ती वृद्धिंगत होते आणि रूची परिपक्व झाल्यावर भाव किंवा भगवंतांच्या दिव्य प्रेमातील प्राथमिक स्तरामध्ये रूपांतरित होते. भगवंतांबद्दलचा या वास्तविक प्रेमालाच प्रेम किंवा जीवनाचा परमोच्च परिपूर्ण स्तर असहे म्हटले जाते. ‘‘प्रेम या स्तरावर मनुष्य दिव्य प्रेममयी भगवत्सेवेमध्ये सतत रममाण झालेला असतो. म्हणून प्रमाणित आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनानुसार केलेल्या भक्तिपूर्ण सेवेच्या क्रमिक पद्धतीद्वारे, मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक आसक्तीतून मुक्त होऊन, स्वत:च्या वैयक्तिक आध्यात्मिक स्वरूपाच्या भयापासून आणि निराशेमुळे उत्पन्न झालेल्या शून्यवादापासून मुक्त होऊन जीवनाच्या परमोच्च स्तराची प्राप्ती करतो. त्यानंतर अंतत: त्याला भगवद्धामाची प्राप्ती होते.

« Previous Next »