No edit permissions for मराठी

TEXT 11

ye yathā māṁ prapadyante
tāṁs tathaiva bhajāmy aham
mama vartmānuvartante
manuṣyāḥ pārtha sarvaśaḥ

 
ये-जे; यथा-ज्याप्रमाणे; माम्-मला; प्रपद्यन्ते-शरण येतात; तान्-त्यांना; तथा - त्याप्रमाणे; एव-निश्‍चितच; भजामि- फल देतो; अहम्-मी; मम-माझ्या; वर्त्म-मार्गाला; अनुवर्तन्ते- अनुसरतात; मनुष्य-सर्व मनुष्य; पार्थ-हे पार्थ; सर्वश:- सर्व प्रकारे.

जे ज्या भावाने मला शरण येतात, त्याला अनुरुप असे फळ मी त्यांना देतो. हे पार्थ! सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात.

तात्पर्य: प्रत्येक मनुष्य भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या विविध, प्रकट झालेल्या रूपांमध्ये शोध करीत असतो. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा आंशिक साक्षात्कार, त्यांच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये आणि परमाणूसहित सर्व गोष्टींमध्ये वास करणाऱ्या परमात्मा रूपामध्ये होतो, परंतु श्रीकृष्णांचा पूर्ण साक्षात्कार केवळ त्यांच्या अनन्य भक्तांनाच होतो. यामुळे श्रीकृष्णच प्रत्येकाच्या साक्षात्काराचे ध्येय आहे आणि याप्रमाणे ज्याची श्रीकृष्णांना प्राप्त करावयाची जशी इच्छा आहे त्याप्रमाणे तो मनुष्य संतुष्ट होत असतो. दिव्य आध्यात्मिक जगतातही, श्रीकृष्ण हे आपल्या अनन्य भक्ताच्या इच्छेनुसार दिव्य भावामध्येच आदानप्रदान करतात. एखाद्या भक्ताला श्रीकृष्ण आपले सर्वश्रेष्ठ एकमेव स्वामी असावेत अशी इच्छा असते, दुसऱ्याला ते आपले खास मित्र असावेत अशी इच्छा असते. आणखी दुसऱ्याला ते आपला पुत्र असावेत अशी इच्छा असते तर आणखी दुसऱ्याला ते आलपे प्रियकर असावेत अशी इच्छा असते. श्रीकृष्ण सर्व भक्तांना त्यांच्या आपल्यावरील प्रेमाच्या उत्कटतेनुसार अनुरुप असे फळ देतात. भौतिक जगतातही भावनांचे हेच आदानप्रदान चालते आणि भगवंतही त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या पूजकांच्या इच्छेनुसार त्यांना समान रीतीने फल प्रदान करतात. विशुद्ध भक्त या ठिकाणी तसेच दिव्य धामामध्येही भगवंतांशी वैयक्तिक सहवास करतात व साक्षात त्यांची सेवा करू शकतात आणि याप्रमाणे विशुद्ध भक्त भगवंतांच्या पे्रममयी सेवेद्वारे दिव्य आनंद प्राप्त करतात. जे निर्विशेषवादी आहेत आणि ज्यांना जीवाच्या स्वतंत्र अस्तित्वाचा विनाश करून आध्यात्मिकदृष्ट्या आत्महत्या करावयाची आहे त्यांनाही श्रीकृष्ण आपल्या तेजामध्ये (ब्रह्मज्योतीमध्ये) विलीन करून घेऊन साहाय्य करतात. असे निर्विशेषवादी हे भगवंतांच्या शाश्वत आनंदमयी स्वरुपाचा स्वीकार करीत नाहीत. म्हणून स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व गमविल्यामुळे ते भगवंतांच्या साक्षात दिव्य सेवेद्वारे प्राप्त होणाऱ्या आनंदाचे आस्वादन करू शकत नाहीत. त्यांच्यापैकी जे निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये दृढपणे स्थित झालेले नसतात ते आपल्या कर्म करण्याच्या सुप्त कामना व्यक्त करण्यासाठी पुन्हा भौतिक जगतात येतात. त्यांना आध्यात्मिक लोकामध्ये प्रवेश दिला जात नाही तर त्यांना पुन्हा प्राकृतिक लोकांमध्ये कर्म करण्याची संधी दिली जाते. जे सकाम कर्मी आहेत त्यांना भगवंत यज्ञेश्वर म्हणून त्यांच्या विहित कर्मांचे इच्छित फळ प्रदान करतात आणि जे योगी, सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांना सिद्धी प्रदान केल्या जातात. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे तर, प्रत्येकजण यशस्वी होण्यासाठी केवळ भगवंतांच्याच कृपेवर अवलंबून आहे आणि सर्व प्रकारचे आध्यात्मिक मार्ग म्हणजे एकाच मार्गावर असणाऱ्या यशाच्या विविध मर्यादा आहेत. म्हणून श्रीमद्भागवतात (2.3.10) सांगितल्याप्रमाणे, जोपर्यंत व्यक्ती कृष्णभावनेच्या परमोच्च परिपूर्ण अवस्थेप्रत येत नाही तोपर्यंत तिथे सर्वच प्रयत्न अपूर्ण राहतात.

अकाम: सर्वकामो वा मोक्षकाम उदारधी:।
तीव्रेण भक्तियोगेन यजेत पुरुषे परम् ॥

     ‘‘मनुष्य निष्काम असो (भक्ताप्रमाणे) किंवा सर्व सकाम कर्मफलांची इच्छा करणारा असो किंवा मुक्तीच्या प्रयत्नात असो, त्याने कृष्णभावनेत अंतिमत: परिणत होणारी पूर्णावस्था प्राप्त करण्याकरिता सर्व प्रकारे भगवंतांना शरण जाण्याची पराकाष्ठा केली पाहिजे.’’

« Previous Next »