No edit permissions for मराठी

TEXT 14

na māṁ karmāṇi limpanti
na me karma-phale spṛhā
iti māṁ yo ’bhijānāti
karmabhir na sa badhyate

 -कधीच नाही; माम्-मला; कर्माणि-सर्व प्रकारचे कर्म; लिम्पन्ति-बद्ध करते; -तसेच नाही; मे-माझे; कर्म-फले-सकाम कार्मामध्ये; स्पृहा- आकांक्षा; इति-याप्रमाणे; माम्-मला; य:- जो; अभिजानाति-जाणतो; कर्मभि:-अशा कर्मफलांनी; -कधीच नाही; स:- तो; बध्यते- बद्ध होतो.

कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही तसेच मला कर्मफलाची आकांक्षाही नाही. जो माझ्याबद्दलचे हे सत्य जाणतो तो सुद्धा कर्मफलांनी बद्ध होत नाही.

तात्पर्य: भौतिक जगतातही घटनाबद्ध नियम आहेत आणि या नियमांद्वारे आपल्याला कळून येते की, राजा कोणताही प्रमाद करू शकत नाही किंवा तो राष्ट्रनियमांच्या अधीन नाही. त्याचप्रमाणे भगवंत जरी भौतिक जगताचे सृष्टा असले तरी ते भौतिक जगताच्या कार्यामुळे प्रभावित होत नाहीत. ते सृष्टीची निर्मिती करून सृष्टीपासून अलिप्त राहतात तर प्राकृतिक साधनांवर स्वामित्व गाजविण्याच्या आपल्या प्रवृत्तीमुळे जीव हे भौतिक कार्याच्या कर्मफलातच गुंतून राहतात. एखाद्या संस्थेचा मालक आपल्या कर्मचार्‍यांच्या योग्य अथवा अयोग्य कार्याला जबाबदार नसून, कर्मचारी हे स्वत:च जबाबदार असतात. जीव आपल्या इंद्रियतृप्तीच्या विशिष्ट कार्यांमध्ये मग्न असतात आणि ही कार्ये भगवंतांनी नेमलेली नसतात. अधिकाधिक इंद्रियतृप्तीसाठी जीव या जगतातील कर्मांमध्ये मग्न असतात आणि त्यांना मृत्यूनंतर स्वर्गीय सुखाची अभिलाषा असते. भगवंत स्वत:मध्येच पूर्ण असल्यामुळे त्यांना तथाकथित स्वर्गीय सुखाचे मुळीच आकर्षण नसते. स्वर्गलोकातील देवदेवता म्हणजे भगवंतांनी आपल्या सेवेमध्ये नेमलेले सेवक आहेत. कर्मचारी ज्याप्रमाणे खालच्या प्रतीच्या सुखाची अपेक्षा करतात त्याप्रमाणे मालक काही खालच्या प्रतीच्या सुखाची अपेक्षा करू शकत नाही. भगवंत हे भौतिक कर्म आणि कर्मफलांपासून अलिप्त आहेत. उदाहरणार्थ पावसाशिवाय जरी विविध प्रकारच्या वनस्पती वाढण्याची शक्यता नसली तरी पृथ्वीवर उगवणाऱ्या विविध प्रकारच्या वनस्पतींसाठी पाऊस जबाबदार नसतो. या वस्तुस्थितीची पुष्टी वैदिक स्मृतीमध्ये पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे.

निमित्तमात्रमेवासौ सृज्यांना सर्गकर्मणि।
प्रधानकारणीभूता यतो वै सृज्यशक्तय:॥

     ‘‘भौतिक सृष्टीमध्ये भगवंत हेच परम कारण आहेत. निमित्तमात्र कारण म्हणजे ही भौतिक प्रकृती आहे. ज्याद्वारे प्रकट विश्व  दृष्टिगोचर झाले आहे.’’ सृष्ट प्राणिमात्र विविध प्रकारचे आहेत. उदा. देवता, मनुष्य प्राणी आणि निम्न स्तरावरील पशू इत्यादी हे सर्व आपल्या गतकाळातील बऱ्यावाईट कर्मफलांच्या अधीन आहेत. अशा कार्यांसाठी भगवंत केवळ योग्य त्या सुविधा आणि प्रकृतीच्या गुणांचे नियम उपलब्ध करून देतात; पण भगवंत त्यांच्या भूतकाळातील किंवा वर्तमान काळातील कर्मांना जबाबदार नसतात. वेदान्तसूत्रामध्ये (2.1.34) याला पुष्टी देण्यात आली आहे. वैशम्यनैर्घृण्ये न सापेक्षत्वात् - भगवंत कोणत्याही जीवाबद्दल कधीही पक्षपाती नसतात. जीव स्वत:च्या कर्मासाठी स्वत:च जबाबदार असतात. भगवंत त्यांना भौतिक प्रकृती म्हणजेच बहिरंगा शक्तीच्या माध्यमाद्वारे केवळ सुविधा उपलब्ध करून देतात. ज्याला या कर्माच्या नियमांची गहनता पूणपणे ज्ञात आहे, तो आपल्या कर्मफलांनी बद्ध होत नाही. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे तर, जो मनुष्य भगवंतांच्या या दिव्य स्वरुपाला जाणतो तो कृष्णभावनेतील अनुभवी मनुष्य होय आणि याप्रमाणे तो कर्माच्या नियमांनी कधीही बद्ध होत नाही. जो भगवंतांचे दिव्य स्वरूप जाणत नाही आणि विचार करतो की, सामान्य मनुष्याप्रमाणेच भगवंतांचे कर्मही सकाम कर्मच आहे. तो निश्‍चितपणे स्वत:च सकाम कर्मफलामध्ये गुंतून पडतो, परंतु जो परम सत्याला जाणतो तो कृष्णभावनेत स्थिर झालेला मुक्त जीव होय.

« Previous Next »