No edit permissions for मराठी

TEXT 13

cātur-varṇyaṁ mayā sṛṣṭaṁ
guṇa-karma-vibhāgaśaḥ
tasya kartāram api māṁ
viddhy akartāram avyayam

चातु:वर्ण्यम्-मानवी समाजाचे चार विभाग; मया-माझ्याकडून; सृष्टम्-उत्पन्न करण्यात आले; गुण-गुणाच्या; कर्म- आणि कर्म; विभागश:- गुण आणि कर्म यांच्यानुसार; तस्य-त्याचा; कर्तारम्-जनक, पिता किंवा कर्ता; अपि-जरी; माम्-मला; विद्धि-तू जाण; अकर्तारम्-अकर्ता म्हणून ; अव्ययम्-अपरिवर्तनीय.

भौतिक प्रकृतीचे तीन गुण आणि त्यांना अनुरुप अशा कर्माला अनुसरुन मी मानवी समाजाचे चार विभाग निर्माण केले आहेत आणि तू जाणले पाहिजे की, जरी मी या व्यवस्थेचा कर्ता असलो तरीही मी अव्ययी असल्यामुळे अकर्ताच आहे.

तात्पर्य: प्रत्येक गोष्टींचे सृष्टा भगवंत आहेत. सर्व गोष्टींचा त्यांच्यापासून उगम होतो, सर्व गोष्टींचे पालन त्यांच्याकडून होते आणि प्रलयानंतर सर्व गोष्टी त्यांच्यामध्येच सामावल्या जातात. म्हणूनच भगवंत, सामाजिक व्यवस्थेच्या चार वर्णांचे उत्पत्तीकर्ता आहेत. चार वर्णांचा आरंभ बुद्धिमान मनुष्यांच्या विभागपासून होतो आणि या वर्गाला पारिभाषिक शब्दात ब्राह्मण म्हटले जाते, कारण ते सत्वगुणामध्ये स्थित असतात. त्यानंतरचा वर्ग हा प्रशासकीय वर्ग आहे व त्यांना पारिभाषिक शब्दात क्षत्रिय म्हटले जाते, कारण ते  रजोगुणामध्ये स्थित असतात. व्यापारी लोक, ज्यांना वैश्य म्हटले जाते ते रजोगुण आणि तमोगुण यांच्या मिश्रणामध्ये स्थित असतात आणि शूद्र किंवा कामगार वर्ग हा तमोगुणामध्ये स्थित असतो. भगवान श्रीकृष्णांनी जरी समाजव्यवस्थेच्या चार वर्णांची निर्मिती केली असली तरी ते यांपैकी कोणत्याही वर्णामध्ये येत नाहीत. कारण बद्ध जीवांच्या एका वर्गाने बनलेल्या मानवसमाजातील बद्ध जीवाप्रमाणे भगवान श्रीकृष्ण नाहीत. मानवी समाज हा इतर पशूसमाजाप्रमाणेच आहे; परंतु मनुष्यांना पशू स्तरावरून उन्नत करण्यासाठी उपर्युक्त वर्णाची निर्मिती भगवंतांद्वारे करण्यात आली आहे, जेणेकरून कृष्णभावनेचा पद्धतशीर विकास होऊ शकेल. एखाद्या विशिष्ट मनुष्याची कर्म करण्याची प्रवृत्ती ही त्याने प्राप्त केलेल्या गुणांनुसार ठरविली जाते. भौतिक प्रकृतीच्या विविध गुणांना अनुसरुन असणाऱ्या अशा जीवनाच्या लक्षणांचे वर्णन, या ग्रंथाच्या अठराव्या अध्यायामध्ये करण्यात आले आहे. कृष्णभावनाभावित मनुष्य हा ब्राह्मणांहून श्रेष्ठ असतो. जरी गुणांनी ब्राह्मण असलेल्या व्यक्तीला ब्रह्म किंवा परम सत्याबद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे तरी त्यांच्यापैकी बरेचजण भगवान श्रीकृष्णांच्या केवळ निर्विशेष ब्रह्मज्योतीचाच आश्रय घेतात; पण जो ब्राह्मणांच्या मर्यादित ज्ञानापलीकडे जातो आणि पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचे ज्ञान प्राप्त करतो, तो कृष्णभावनाभावित मनुष्य किंवा दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे तर, वैष्णव बनतो. कृष्णभावनेमध्ये, श्रीकृष्णांची सर्व विविध विस्तारित रूपे उदा. राम, नृसिंह, वराह इत्यादी यांचे ज्ञान समाविष्ट असते. ज्याप्रमाणे श्रीकृष्ण हे मानवी समाजाच्या या चार वर्णांच्या पलीकडे आहेत त्याचप्रमाणे कृष्णभावनाभावित मनुष्यही मानवी समाजाच्या सर्व विभागांच्या अतीत असतो, मग ते विभाग जातीजमाती, राष्ट्र किंवा योनींचे असोत.

« Previous Next »