TEXT 18
karmaṇy akarma yaḥ paśyed
akarmaṇi ca karma yaḥ
sa buddhimān manuṣyeṣu
sa yuktaḥ kṛtsna-karma-kṛt
कर्मणि- कर्मामध्ये; अकर्म-अकर्म; य:-जो; पश्यते-पाहतो; अकर्मणि-अकर्मामध्ये; च- सुद्धा; कर्म-कर्म; य:- जो; स:- तो; बुद्धि-मान्-बुद्धिमान आहे; मनुष्येषु-मनुष्य समाजात; स:- तो; युक्त:- दिव्य स्तरामध्ये स्थित आहे; कृत्स्न-कर्म-कृत्-जरी कर्मामध्ये मग्न असला तरी.
जो कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो तो बुद्धिमान मनुष्य होय आणि जरी तो सर्व प्रकारच्या कर्मांमध्ये मग्न असला तरी तो दिव्य स्तरावर स्थित आहे.
तात्पर्य: कृष्णभावनायुक्त कर्म करणारा मनुष्य स्वाभाविकपणे कर्मबंधनातून मुक्त असतो. तो आपली कर्मे श्रीकृष्णाप्रीत्यर्थ करीत असल्याकारणाने त्याला कर्मांच्या परिणामांपासून सुखदु:खे भोगावी लागत नाहीत. म्हणून श्रीकृष्णांप्रीत्यर्थ तो जरी सर्व प्रकारचे कर्म करण्यात मग्न असला तरी तो मानवसमाजातील बुद्धिमान मनुष्य आहे. अकर्म म्हणजे फलरहित कर्म होय. निर्विशेषवादी, भीतीमुळे सकाम कर्म थांबवितात जेणे करून कर्मफलामुळे आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर कोणताही अडथळा निर्माण होऊ नये. परंतु भगवंतांचे साकार रुप जाणणारा मनुष्य निश्चितपणे जाणतो की, आपले स्वरुप म्हणजे आपण भगवंताचे नित्य सेवक आहोत. त्यामुळे तो कृष्णभावनाभावित कर्मांमध्ये संलग्न राहतो. तो सर्व काही श्रीकृष्णांप्रीत्यर्थ करीत असल्याकरणाने अशा सेवेमुळे केवळ दिव्य आनंदाची प्राप्ती करीत असतो. जे या मार्गाचा अवलंब करीत आहेत ते इंद्रियतृप्तीच्या इच्छेपासून मुक्त असतात. श्रीकृष्णांची नित्य सेवा करण्याच्या जाणिवेमुळे मनुष्य सर्व प्रकारच्या कर्मबंधनातून मुक्त होतो.