No edit permissions for मराठी

TEXT 28

dravya-yajñās tapo-yajñā
yoga-yajñās tathāpare
svādhyāya-jñāna-yajñāś ca
yatayaḥ saṁśita-vratāḥ

द्रव्य-यज्ञा:- स्वत:कडील वस्तूंचा यज्ञ करणे; तप:-यज्ञा:-तपोरूप यज्ञ; योग-यज्ञा:-अष्टांगयोगरुपी यज्ञ; तथा-याप्रमाणे; अपरे-इतर; स्वाध्याय-वेदाध्ययनरुपी यज्ञ; ज्ञान-यज्ञा:- दिव्य ज्ञानामधील प्रगतीकरिता यज्ञ; -सुद्धा; यतय:- प्रबुद्ध व्यक्ती; संशित-व्रता:- कठोर व्रत धारण करणारे.

काहीजण कठोर व्रत धारण करून, काहीजण आपल्याकडील द्रव्यांचा यज्ञ करून, काहीजण खडतर तपस्या करून, काहीजण अष्टांगयोग पद्धतीचे आचरण करून किंवा काही दिव्य ज्ञानामध्ये प्रगत होण्यासाठी वेदाध्ययन करून प्रबुद्ध होतात.

तात्पर्य: या यज्ञांचे विविध विभागांमध्ये वर्गीकरण करता येते. विविध प्रकारचे दान करून काही लोक आपल्याकडील संपत्तीचा यज्ञ करतात. भारतामध्ये धनाढ्य व्यापारीवर्ग किंव राजघराण्यातील लोक विविध प्रकारच्या धर्मार्थ संस्था उघडतात. उदा. धर्मशाळा, अन्नक्षेत्र, अतिथिगृह, अनाथालय आणि विद्यापीठ इतर देशांतही अनेक इस्पितळे, वृद्धाश्रम आणि तत्सम धर्मादाय संस्था आहेत, ज्या अन्नवाटप, गरिबांना शिक्षण आणि मोफत वैद्यकीय मदत देण्याच्या उद्देशाने स्थापिलेल्या आहेत. दान देण्याच्या या सर्व कार्यांना द्रव्यमय यज्ञ असे म्हणतात. काही लोक जीवनातील उन्नतावस्था प्राप्त करण्यासाठी किंवा ब्रह्मांडातील उच्चतर ग्रहलोकांप्रत उन्नत होण्यासाठी स्वेच्छेने अनेक प्रकारच्या तपस्या करतात. उदाहरणार्थ, चंद्रायण आणि चुतर्मास्य. या पद्धतींमध्ये विशिष्ट नियमांनुसार खडतर व्रतांचे जीवनामध्ये आचरण करावे लागते. चातुर्मास्य व्रताचे आचरण करणारा (जुलै ते ऑक्टोबर) वर्षातील चार महिन्यांमध्ये केशकर्तन करीत नाही, विशिष्ट अन्नपदार्थ ग्रहण करीत नाही, दिवसातून दोन वेळा अन्नग्रहण करीत नाही किंवा घर सोडून जात नाही. जीवनातील सुखांच्या अशा यज्ञाला तपोमय-यज्ञ म्हटले जाते. इतर असेही लोक आहेत, जे पतंजली योगपद्धती (ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्यासाठी) किंवा हठयोग अथवा अष्टांगयोग (विशिष्ट सिद्धी प्राप्त करण्यासाठी) इत्यादी योगपद्धतींचे आचरण करतात. काही लोक पवित्र तीर्थस्थळांना  भेट देण्यासाठी तीर्थाटन करतात. या सर्व आचरण क्रियांना योगयज्ञ, अर्थात भौतिक जगामध्ये विशिष्ट सिद्धींप्रीत्यर्थ केलेला यज्ञ असे म्हणतात. अन्य लोक आहेत, जे निरनिराळ्या वैदिक शास्त्रांचे, विशेषकरून उपनिषद आणि वेदान्तसूत्र किंव सांख्य तत्वज्ञान, अध्ययन करण्यामध्ये संलग्न होतात. या सर्व क्रियांना स्वाध्याय यज्ञ किंवा अध्यायनरुपी यज्ञ म्हटले जाते. हे सर्व योगी निष्ठेने विविध प्रकारचे यज्ञ करण्यामध्ये मग्न असतात आणि जीवनातील उन्नतावस्थेच्या शोधात असतात. पण कृष्णभावना ही या सर्वांपासून भिन्न आहे, कारण कृष्णभावनेमध्ये प्रत्यक्ष भगवंतांची सेवा केली जाते. वर उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रकारच्या यज्ञाद्वारे कृष्णभावनेची प्राप्ती करता येत नाही. कृष्णभावना केवळ भगवंत आणि त्यांच्या प्रमाणित भक्ताच्या कृपेद्वारेच प्राप्त करता येते. म्हणून कृष्णभावना ही दिव्य आहे.

« Previous Next »