No edit permissions for मराठी

TEXT 29

apāne juhvati prāṇaṁ
prāṇe ’pānaṁ tathāpare
prāṇāpāna-gatī ruddhvā
prāṇāyāma-parāyaṇāḥ
apare niyatāhārāḥ
prāṇān prāṇeṣu juhvati

अपाने-अधोगमन करणाऱ्या अपान वायूत; जुह्वति-अर्पण करतात; प्राणम्-बाहेरच्या दिशेने कार्य करणारा प्राणवायू; प्राणे-प्राणवायूमध्ये; अपानम्-अधोगामी अपान वायू; तथा-त्याचप्रमाणे; अपरे-इतर; प्राण-बाहेरच्या दिशेने कार्य करणाऱ्या प्राणवायूचे; अपान- आणि अधोगामी अपानवायू; गती-गती; रुद्ध्वा-रोखून किंवा वश करून; प्राण-आयाम-सर्व प्राण निरोधाने झालेली समाधी, प्राणायाम; परायणा:- याप्रमाणे परायण झालेले; अपरे-इतर; नियत-संयमित केल्यावर; आहारा:-आहार; प्राणान्-प्राणवायू; प्राणेषु-प्राणवायूमध्ये; जुह्वति- यज्ञ करतात किंवा हवन करतात.

याव्यतिरिक्त इतरही लोक आहेत, जे समाधिस्थ राहण्याकरिता प्राणायाम पद्धतीचा अवलंब करतात. ते प्राणवायूची अपान वायूमध्ये आणि अपान वायूची प्राणवायूमध्ये आहुती देतात आणि शेवटी संपूर्ण श्‍वासोच्छावास थांबवून समाधी अवस्थेत राहतात. अन्य लोक आहार नियमन करून प्राणवायूच प्राणवायूमध्ये यज्ञ म्हणून अर्पण करतात.

तात्पर्य: श्वसनप्रक्रिया नियंत्रित करण्याच्या या योगपद्धतीला प्राणायाम असे म्हटले जाते आणि आरंभी हठयोगामध्ये विविध आसानांद्वारे प्राणायामाचा उपयोग केला जातो. या सर्व प्रक्रिया इंद्रिये संयमित करण्यासाठी आणि आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये प्रगती करण्यासाठी आहेत. प्राणायामामध्ये शरीरातील वायू नियंत्रित केले जातात ज्यामुळे त्यांचे मार्गक्रमण विरुद्ध दिशेने करता यावे. अपान वायू अधोगमन करतो आणि प्राणवायू उर्ध्वगमन करतो. प्राणायाम योगी या वायूंचे विरुद्ध दिशेने मार्गक्रमण करवितो आणि दोन्ही वायूंचे समत्व ‘पूरक’ मध्ये साधतो. प्राणवायू अपान वायूमध्ये अर्पण करणे (उच्छ्वास आत येणाऱ्या श्‍वासामध्ये अर्पण करणे) या क्रियेला‘रेचक’ म्हटले जाते. जेव्हा दोन्ही वायूंचे प्रवाह पूर्णपणे थांबले जातात तेव्हा मनुष्य ‘कुंभक योग’ यामध्ये स्थित असल्याचे म्हटले जाते. कुंभक योगाच्या आचरणामुळे आध्यात्मिक साक्षात्कारप्राप्तीसाठी मनुष्य आपली आयुर्मर्यादा वाढवू शकतो. बुद्धिमान योगी दुसऱ्या जीवनाची प्रतीक्षा न करता एकाच जीवनकालामध्ये पूर्णता प्राप्त करण्यामध्ये इच्छुक असतो. कारण, कुंभक योगाच्या आचरणामुळे योगी आपले आयुष्य अनेकानेक वर्षांनी वृद्धिंगत करतात. परंतु कृष्णभावनाभावित मनुष्य, भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये नित्य स्थित असल्यामुळे, त्याची इंद्रिये आपोआपच नियंत्रित होतात. त्याची इंद्रिये नेहमी भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न असल्यामुळे ती इतरत्र रत होण्याची शक्यताच नसते. म्हणून जीवनाच्या अंती तो स्वाभाविकत:च भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य धामामध्ये प्रवेशित होतो, यामुळे तो दीर्घायुषी होण्याचा प्रयत्न करीत नाही. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे (14.26) तो तात्काळ मुक्तीच्या स्तरापर्यंत उन्नत होतो.

मां च योऽव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते।
स गुणान्समतीत्यैतान् ब्रह्मभूयाय कल्पते ॥

     ‘‘भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये जो संलग्न होतो, तो प्रकृतीच्या गुणांच्या पलीकडे जातो आणि तात्काळ ब्रह्म-स्तरापर्यंत उन्नत होतो.’’ कृष्णभावनाभावित मनुष्य दिव्य स्तरापासूनच प्रारंभ करतो आणि नित्य त्याच भावनेमध्ये स्थित राहतो. म्हणून त्या स्तरापासून त्याचे पतन होण्याची शक्यता नसते. शेवटी तो भगवद्धामात प्रवेश करतो. भगवंतांना अर्पण केलेले अन्न किंवा कृष्णप्रसाद ग्रहण केल्याने आहरनियमन आपोआपच होते. इंद्रियानिग्रह करण्यासाठी आहार नियमन अत्यंत साहाय्यकारक ठरते आणि इंद्रियसंयम केल्याविना भौतिक जंजाळातून मुक्त होण्याची शक्यता नाही.

« Previous Next »