TEXT 33
śreyān dravya-mayād yajñāj
jñāna-yajñaḥ paran-tapa
sarvaṁ karmākhilaṁ pārtha
jñāne parisamāpyate
श्रेयान्-श्रेष्ठतर; द्रव्य-मयात्-द्रव्याचा; यज्ञात्-यज्ञापेक्षा; ज्ञान-यज्ञ:-ज्ञानयज्ञ; परन्तप-हे अरिमर्दना अर्जुना; सर्वम्- सर्व; कर्म-कर्म; अखिलम्-सर्व; पार्थ-हे पृथापुत्रा; ज्ञाने-ज्ञानामध्ये; परिसमाप्यते-पर्यवसान होते.
हे परंतप! केवळ द्रव्ययज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. अंतत: हे पार्थ! सर्व कर्मयज्ञांचे पर्यवसान दिव्य ज्ञानामध्ये होते.
तात्पर्य: परिपूर्ण ज्ञानावस्थेची प्राप्ती करणे, त्यानंतर सांसारिक दु:खांतून मुक्तता प्राप्त करणे आणि अंती भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये (कृष्णभावना) रममाण होणे, हा वेदांचा मुख्य उद्देश आहे. तरीही या सर्व विविध यज्ञकर्मांविषयी एक रहस्य आहे आणि मनुष्याने हे रहस्य जाणणे आवश्यक आहे. यज्ञकर्त्याच्या विशिष्ट श्रद्धेनुसार यज्ञ कधी कधी विविध प्रकारची रुपे धारण करतात. जेव्हा मनुष्याची श्रद्धा दिव्य ज्ञानाने युक्त होते तेवहा त्या यज्ञकर्त्याला, अशा दिव्य ज्ञानाशिवाय केवळ द्रव्यांचा यज्ञ करणाऱ्या यज्ञकर्त्यापेक्षा अधिक प्रगत समजले पाहिजे. कारण ज्ञानप्राप्ती झाल्याविना यज्ञ हे भौतिक स्तरावरच राहतात आणि त्यापासून कोणतीही आध्यात्मिक लाभप्राप्ती होत नाही. वास्तविक ज्ञानाची परिणती, दिव्य ज्ञानाच्या अत्युच्च स्तरामध्ये म्हणजेच कृष्णभावनेमध्ये होते. उन्नत, दिव्य ज्ञानप्राप्तीविना यज्ञ म्हणजे केवळ भौतिक कर्मेच होत. तरीही, जेव्हा हे यज्ञ दिव्य ज्ञानाच्या स्तराप्रत उन्नत केले जातात तेव्हा अशा सर्व यज्ञकर्मांना आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते. चेतनेमधील भिन्नतेवरून कधी कधी यज्ञकर्मांना कर्मकांड (सकाम कर्मे) म्हटले जाते तर कधी कधी ज्ञानकांड (सत्य शोधार्थ ज्ञान) असे म्हटले जाते. ज्या यज्ञाचा शेवट ज्ञानप्राप्तीत होतो तोच यज्ञ अधिक श्रेष्ठ होय.