No edit permissions for मराठी

TEXT 34

tad viddhi praṇipātena
paripraśnena sevayā
upadekṣyanti te jñānaṁ
jñāninas tattva-darśinaḥ

तत्-विविध यज्ञांचे ते ज्ञान; विद्धि-जाणण्याचा प्रयत्न कर; प्रणिपातेन-आध्यात्मिक गुरुंकडे जाऊन; परिप्रश्‍नेन-नम्रतापूर्वक प्रश्‍न विचारुन; सेवया-सेवा करून; उपदेक्ष्यन्ति-ते दीक्षा देतील; ते-तुला; ज्ञानम्-ज्ञानामध्ये; ज्ञानिन:- आत्मसाक्षात्कारी; तत्व-सत्याचे; दर्शिन:- दर्शी.

आध्यात्मिक गुरुंकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्‍न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात. कारण त्यांनी तत्व जाणलेले असते.

तात्पर्य: आत्मसाक्षात्काराचा मार्ग नि:संशय कठीण आहे. म्हणून भगवंत आपल्याला त्यांच्यापासून प्रारंभ होणाऱ्या गुरुशिष्य परंपरेतील प्रमाणित आध्यात्मिक गुरुंना शरण जाण्याचा सल्ला देतात. गुरुशिष्य परंपरेच्या या तत्वाचे पालन केल्याशिवाय कोणीही प्रमाणित आध्यात्मिक गुरु बनू शकत नाही. भगवंत हे आद्य आध्यात्मिक गुरु आहेत आणि गुरुशिष्य परंपरेतील व्यक्ती हा भगवंतांचा संदेश आपल्या शिष्याला यथार्थ रूपात प्रदान करू शकतो. मूर्ख, दांभिक लोकांप्रमाणे कोणीही स्वनिर्मित मार्गाद्वारे आत्मसाक्षात्कारी होऊ शकत नाही. श्रीमद्भागवत सांगते की  (6.3.19) धर्मं तू साक्षात्भगवत्प्रणीतम - धर्ममार्ग साक्षात भगवंतांनी सांगितला आहे. म्हणून मानसिक तर्क किंवा शुष्क वादाच्या आधारे आपण योग्य मार्गांची प्राप्ती करू शकत नाही. तसेच ज्ञानग्रंथांच्या स्वतंत्र अध्ययनानेही मनुष्य आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही. ज्ञानप्राप्तीकरिता मनुष्याने प्रमाणित आध्यात्मिक गुरुंना शरण जाणे अत्यावश्यक आहे. अशा आध्यात्मिक गुरुंचा स्वीकार संपूर्ण शरणागतीने केला पाहिजे आणि मिथ्या अहंकार न ठेवता नम्र सेवकाप्रमाणे त्यांची सेवा केली पाहिजे. आत्मसाक्षात्कारी आध्यात्मिक गुरुंना प्रसन्न करणे हेच आध्यात्मिक जीवनातील प्रगतीचे रहस्य आहे. जिज्ञासा आणि नम्रता यांच्या योग्य संयोगाद्वारे आध्यात्मिक ज्ञानप्राप्ती होते. नम्रता आणि सेवेशिवाय विद्वान आध्यात्मिक गुरुंना प्रश्‍न विचारणे परिणामकारक ठरत नाही. मनुष्याने आध्यात्मिक गुरूच्या कसोटीस उतरले पाहिजे आणि जेव्हा ते शिष्याची प्रामाणिक इच्छा पाहतात तेव्हा आपोआपच त्याला वास्तविक आध्यात्मिक ज्ञान प्रदान करून कृतार्थ करतात. या श्‍लोकामध्ये अंधानुसरण आणि विवेकशून्य प्रश्‍न या दोन्ही गोष्टींना दोषास्पद ठरविले आहे. मनुष्याने आध्यात्मिक गुरुंकडून केवळ श्रवण करावे असे नाही तर त्याने नम्रता, सेवा आणि प्रश्‍नाद्वारे आध्यात्मिक गुरुंकडून ज्ञानबोध करून घेतला पाहिजे. प्रमाणित आध्यात्मिक गुरु स्वभावत:च शिष्याबद्दल अत्यंत दयाळू असतात. म्हणून शिष्य जेव्हा नम्र आणि सेवा करण्यास सदैव तत्पर असतो तेव्हा ज्ञान आणि प्रश्‍नांचे आदानप्रदान यांचा पूर्ण मेळ जमतो.

« Previous Next »