No edit permissions for मराठी

TEXT 35

yaj jñātvā na punar moham
evaṁ yāsyasi pāṇḍava
yena bhūtāny aśeṣāṇi
drakṣyasy ātmany atho mayi

यत्-जे; ज्ञात्वा-जाणल्याने; -कधीच नाही; पुन: पुन्हा; मोहम्-मोहाला; एवम्-याप्रमाणे; यास्यसि-प्राप्त होशील; पाण्डव-हे पांडुपुत्रा; येन-ज्यायोगे; भूतानि-प्राणिमात्र; अशेषाणि-सर्व; द्रक्ष्यसि-तू पाहशील; आत्मनि-परमात्म्यामध्ये; अथ - किंवा दुसऱ्या शब्दांत; मयि-माझ्यामध्ये.

आत्मसाक्षात्कारी जीवांकडून वास्तविक ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर, तू पुन्हा मोहित होणार नाहीस, कारण या ज्ञानाद्वारे तू पाहशील की, सर्व प्राणिमात्र हे परमात्म्याचे अंश आहेत अर्थात ते माझेच आहेत.

तात्पर्य: आत्मसाक्षात्कारी किंवा वस्तूंचे यथार्थ स्वरुप जाणणाऱ्या व्यक्तीकडून ज्ञानप्राप्ती केल्यामुळे, सर्व प्राणिमात्र हे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचे अंश आहेत हे मनुष्य जाणतो. श्रीकृष्णांपासून भिन्न अस्तित्व असल्याची जाणीव म्हणजेच माया होय. (मा-नाही; या-ही) काही लोकांना वाटते की, आपल्याला श्रीकृष्णांशी काहीच कर्तव्य नाही, श्रीकृष्ण हे केवळ एक ऐतिहासिक महापुरुष आहेत आणि निर्विशेष ब्रह्म हेच परमतत्व आहे. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे निर्विशेष ब्रह्म म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे तेज होय. श्रीकृष्ण हे भगवान या नात्याने सर्व गोष्टींचे मूळ कारण आहेत. ब्रह्मसंहितेत स्पष्टपणे संागण्यात आले आहे की, पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे कारण आहेत. लक्षावधी अवतार म्हणजे त्यांची विविध केवळ विस्तारित रूपेच आहेत. त्याचप्रमाणे जीवही त्यांचे अंश आहेत. मायावादी तत्वज्ञान्यांना चुकीने वाटते की, भगवान श्रीकृष्णांना अनेक विस्तारित रूपांमध्ये ते आपले स्वतंत्र अस्तित्वही गमावतात. या विचाराचे स्वरूप भौतिक आहे. भौतिक जगतात आपल्याला अनुभव आहे की, जेव्हा एखाद्या गोष्टीचे तुकड्यामध्ये विभाजन केले जाते तेव्हा त्या गोष्टीचे मूळ स्वरूप नष्ट होते; परंतु मायावादी लोक जाणत नाहीत की ‘परमतत्व’ म्हणजे, एक अधिक एक बरोबर एकच होय आणि एक उणे एक म्हणजेही एकच होय. परमधामामधील प्रत्येक गोष्टीचे स्वरूप हेच आहे.

     आपल्याला ब्रह्मविद्येचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे आपण आता मायेने आच्छादित झालो आहोत आणि म्हणून आपल्याला वाटते की, आपण श्रीकृष्णांपासून भिन्न आहोत. जरी आपण श्रीकृष्णांचे भिन्न अंश असलो तरी त्यांच्यापासून सर्वथा कधीच भिन्न असू शकत नाही. जीवामध्ये असणारा शारीरिक भेद म्हणजे माया किंवा अवास्तविकता आहे. आपण सर्वजण श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी आहोत. केवळ मायेमुळेच अर्जुनाला वाटले की, आपल्या नातलगांशी असणारे आपले अनित्य शारीरिक संबंध हे भगवान श्रीकृष्णांशी असणाऱ्या शाश्वत आध्यात्मिक संबंधापेक्षा महत्वपूर्ण आहेत. संपूर्ण गीतेची शिकवण हीचे आहे की, जीव हा श्रीकृष्णांचा नित्य सेवक असल्यामुळे त्याला श्रीकृष्णांपासून वेगळे करता येत नाही आणि श्रीकृष्णांपासून आपण भिन्न आहोत या जीवाच्या भावनेलाच ‘माया’ म्हटले जाते. जीव हे भगवंतांचे अंश असल्यामुळे त्यांना विशिष्ट प्रयोजनाची पूर्ती करावयाची असते. अनादी कालापासून त्यांना या प्रयोजनाची विस्मरण झाल्यामुळे ते मनुष्य, पशू, देवता इत्यादी विविध प्रकारच्या शरीरांमध्ये बद्ध झाले आहेत. अशी शारीरिक भिन्नता ही भगवंतांच्या दिव्य सेवेच्या विस्मरणामुळे होते, पण जेव्हा मनुष्य, कृष्णभावनेद्वारे भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये संलग्न होतो तेव्हा तात्काळ या मायेतून त्याची मुक्तता होते. असे विशुद्ध ज्ञान तो केवळ अधिकृत आध्यात्मिक गुरुकडून प्राप्त करू शकतो आणि त्यायोगे जीव आणि श्रीकृष्ण एकच आहेत हा भ्रम टाळू शकतो. परिपूर्ण ज्ञान म्हणजे हे जाणणे होय, की परमात्मा श्रीकृष्ण हेच सर्व जीवांचे परम आश्रयदाते आहेत आणि त्यांच्या आश्रयाचा त्याग केल्याने जीव हे भौतिक शक्तीद्वारे मोहित होतात, कारण त्यांना वाटते की आपण स्वतंत्र आहोत. याप्रमाणे निरनिराळ्या प्रकारच्या भौतिक गोष्टींशी तादात्मय केल्याने जीवांना श्रीकृष्णांचे विस्मरण होते. तरीही जेव्हा असे मोहित जीव कृष्णभावनेमध्ये स्थित होतात तेव्हा जाणले पाहिजे की, ते मुक्तिपथावर आहेत. याला श्रीमद्भागवतात (2.10.6) पुष्टी देण्यात आली आहे. मुक्तिर्हित्वान्यथारुंप स्वरूपेण व्यवस्थिति:- मुक्ती म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा नित्य दास म्हणून आपल्या मूळ स्वरूपामध्ये (कृष्णभावनेमध्ये) स्थित होणे होय.

« Previous Next »