No edit permissions for मराठी

TEXT 4

arjuna uvāca
aparaṁ bhavato janma
paraṁ janma vivasvataḥ
katham etad vijānīyāṁ
tvam ādau proktavān iti

 अर्जुन:उवाच - अर्जुन म्हणाला; अपरम्-कनिष्ठ किंवा अलीकडच्या काळातला; भवत:- तुमचा; जन्म- जन्म; परम्-ज्येष्ठ; जन्म-जन्म; विवस्वत:- सूर्यदेवाचा; कथम्-कसे; एतत्-हे; विजनीयाम्-मी जाणावे; त्वम्-तुम्ही; आदौ-प्रारंभी; प्रोक्तवान्-सांगितला; इति- याप्रमाणे.

अर्जुन म्हणाला: सूर्यदेव विवस्वान हा जन्माने तुमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे. म्हणून प्रारंभी तुम्ही या विज्ञानाचा उपदेश त्याला सांगितला, हे मी कसे जाणावे?

तात्पर्य: अर्जुन हा भगवंतांच्या दृढ भक्त आहे. तर मग त्याचा श्रीकृष्णांच्या शब्दावर विश्‍वास कसा बसू शकला नाही? वस्तुस्थिती ही आहे की, अर्जुन स्वत:साठी विचारणा करीत नसून ज्यांचा भगवंतांवर विश्‍वास नाही तसेच श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम श्रीभगवान म्हणून स्वीकार केला पाहिजे ही गोष्ट ज्यांना आवडत नाही त्या असुरांसाठी करीत आहे. श्रीकृष्ण किंवा पुरुषोत्तम श्रीभगवान यांची जणू काही स्वत:ला जाणीव नसल्याप्रमाणेच तो केवळ अशा लोकांसाठी या मुद्यावर प्रश्‍न करीत आहे. दहाव्या अध्यायावरून स्पष्ट होईल की, श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम श्रीभगवान आहेत, सर्व गोष्टीचे मूळ उगमस्थान आहेत आणि अध्यात्मातील अंतिम तत्त्व आहेत हे अर्जुनाला निश्‍चितपणे ज्ञात होते. अर्थात, श्रीकृष्ण या पृथ्वीवर देवकीपुत्र म्हणून अवतीर्ण झाले होते. श्रीकृष्ण हे तेच पुरुषोत्तम श्रीभगवान आदी, शाश्वत पुरुष कसे होते हे एखाद्या साधारण मनुष्याला समजणे अत्यंत कठीण आहे. म्हणून हा मुद्दा स्पष्ट करण्याकरिता अर्जुनाने हा प्रश्‍न श्रीकृष्णांसमोर मांडला, जेणेकरून श्रीकृष्ण स्वत: अधिकारवाणीने बोलू शकतील. श्रीकृष्ण सर्वोच्च अधिकारी आहेत हे संपूर्ण जगताने आताच नव्हे तर अनादी काळापासून मान्य केले आहे; पण केवळ असुरच त्यांचा स्वीकार करीत नाहीत. असे असले तरी, सर्वांनी श्रीकृष्णांचा सर्वोच्च अधिकारी पुरुष म्हणून स्वीकार केल्यामुळे अर्जुनाने त्यांच्यासमोर हा प्रश्‍न उपस्थित केला, जेणेकरून साक्षात श्रीकृष्णच स्वत:चे वर्णन असुरांनी करण्यापूर्वीच करू शकतील, कारण असुर हे त्यांना स्वत:ला तसेच त्याच्या अनुयायांना समजता येईल अशा प्रकारे श्रीकृष्णांना विकृत स्वरुपात प्रस्तुत करतात. यास्तव प्रत्येकाने स्वत:च्या हितासाठीच श्रीकृष्णांचे विज्ञान जाणणे अत्यावश्यक आहे, म्हणून जेव्हा श्रीकृष्ण हे स्वत:च स्वत:बद्दल बोलतात तेव्हा ते साऱ्या लोकांसाठी मंगलदायक आहे. स्वत:श्रीकृष्णांनी केलेले विश्‍लेषण असुरांना विचित्र वाटू शकते. कारण असुर नेहमी श्रीकृष्णांना आपल्या दृष्टिकोनातूनच जाणत असतात. पण जे भक्त आहेत ते, जेव्हा श्रीकृष्ण स्वत:च स्वत:संबंधी निरुपण करतात तेव्हा त्यांच्या निरुपणाचे अंत:करणपूर्वक स्वागत करतात. श्रीकृष्णांच्या प्रमाणित वचनाचें, भक्त नेहमी पूजन करतात. कारण ते श्रीकृष्णांबद्दल अधिकाधिक जाणण्यासाठी सदैव उत्सुक असतात. श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजणारे नास्तिक लोकही या प्रकारे जाणू शकतील की, श्रीकृष्ण हे महापुरुष आहेत, त्यांचे स्वरुप सच्चिदानंद विग्रह आणि आनंदमयी, शाश्वत आहे, ते दिव्य आहेत, प्राकृतिक गुणांच्या अतीत आहेत आणि देश व काल यांच्या प्रभावाच्या पलीकडे आहेत. अर्जुनासारख्या श्रीकृष्णांच्या भक्ताला निश्‍चितपणे श्रीकृष्णांच्या दिव्य स्थितीसंबंधी मुळीच संशय नसतो. अर्जुनाने श्रीकृष्णांसमोर असा प्रश्‍न उपस्थित करणे म्हणजे केवळ साधारण मनुष्याप्रमाणेच प्राकृतिक गुणांनी श्रीकृष्णही प्रभावित होतात असे मानणाऱ्या लोकांच्या नास्तिकवादी प्रवृत्तीला एका भक्ताने आव्हान देण्याचा प्रयत्नच आहे.

« Previous Next »