No edit permissions for मराठी

TEXT 10

brahmaṇy ādhāya karmāṇi
saṅgaṁ tyaktvā karoti yaḥ
lipyate na sa pāpena
padma-patram ivāmbhasā

ब्रह्मणि-पुरुषोत्तम श्रीभगवंतांना; आधाय-समर्पित करून; कर्माणि-सर्व कर्मे; सङ्गम्-आसक्ती; त्यक्त्वा-त्याग करून; करोति-करतो; य:-जो; लिप्यते-प्रभावित होतो; न-कधीच नाही; स:-तो; पापेन-पापाने; पद्म-पत्रम्-कमळाचे पान; इव-प्रमाणे; अम्भसा-पाण्याने.

जो व्यक्ती, कर्मफल भगवंतांना समर्पित करून आसक्ती न ठेवता आपले कर्म करतो, तो, कमलपत्र ज्याप्रमाणे पाण्याने स्पर्शिले जात नाही, त्याप्रमाणे पापकर्मांने प्रभावित होत नाही.

तात्पर्य: या ठिकाणी ब्रह्मणि म्हणजेच कृष्णभावना होय. भौतिक जगत म्हणजे तीन प्राकृतिक गुणांचे एकत्रित प्रकटीकरण होय आणि याला परिभाषिक शब्दात प्रधान म्हटले जाते. वेदमंत्र सर्वम् ह्येतद्ब्रह्म (माण्डूक्य उपनिषद 2) तस्माद एतद्ब्रह्म नामरुपमन्नं च जायचते (मुण्डक) उपनिषद् 1.2.10) आणि भगवद्गीतेतील (14.3) मम योनिर्महद्ब्रह्म विधाने दर्शवितात की, भौतिक जगातील सर्व गोष्टी म्हणजे ब्रह्माची अभिव्यक्ती आहे आणि परिणाम किंवा कार्ये जरी भिन्न प्रकारे प्रकट झाली तरी ती कारणापासून अभिन्नच आहेत. ‘ईशोपनिषद’ मध्ये सांगण्यात आले आहे की, प्रत्येक गोष्ट ही परब्रह्म किंवा श्रीकृष्णांशी संबंधित आहे आणि म्हणून केवळ तेच प्रत्येक गोष्टीचे स्वामी आहेत. जो पूर्णतया जाणतो की, सर्व गोष्टी श्रीकृष्णांच्या मालकीच्या आहेत व तेच सर्व गोष्टीचे अधिपती आहेत आणि म्हणून सर्व गोष्टींचा भगवत्सेवेमध्ये उपयोग केला पाहिजे, त्याला पुण्य अथवा पापमय कर्मफलांशी स्वाभाविकत:च काही कर्तव्य राहत नाही. विशिष्ट प्रकारचे कर्म करण्याकरिता मनुष्याला भगवंतांनी प्रदान केलेल्या शरीराचाही कृष्णभावनेमध्ये उपयोग करता येतो. ज्याप्रमाणे कमलपत्र पाण्यात राहूनही ओले होत नाही त्याचप्रमाणे हे शरीरही पाकर्मांच्या कल्मषांच्या अतीतच राहते. भगवद्गीतेमध्येही (3.30) भगवंत सांगतात की मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्त - सर्व कर्मे मला (श्रीकृष्णांना) समर्पित कर. एकंदरीत निष्कर्ष असा की, जो मनुष्य, कृष्णभावनारहित आहे तो भौतिक शरीर आणि इंद्रिये यांच्या संकल्पनेवर आधारित कर्म करतो. परंतु कृष्णभावनाभावित मनुष्य आपले शरीर म्हणजे श्रीकृष्णांची संपत्ती असल्यामुळे ते श्रीकृष्णांच्या सेवेमध्येच उपयोगात आणले पाहिजे, या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करतो.

« Previous Next »