TEXT 2
śrī-bhagavān uvāca
sannyāsaḥ karma-yogaś ca
niḥśreyasa-karāv ubhau
tayos tu karma-sannyāsāt
karma-yogo viśiṣyate
श्री-भगवान उवाच-श्रीभगवान म्हणाले; सन्न्यास:- कर्मांचा संन्यास; कर्म-योग:- भक्तियुक्त कर्म; च-सुद्धा; नि-श्रेयस-करौ- मुक्तिपथावर नेणारे; उभौ-दोन्ही; तयो:- दोहोपैकी; तु-परंतु; कर्म-सन्न्यासात्-सकाम कर्माच्या संन्यासाच्या तुलनेत; कर्म-योग:- भक्तियुक्त कर्म; विशिष्यते-अधिक चांगले आहे.
श्रीभगवान म्हणाले:कर्माचा सन्यास आणि भक्तिभावित कर्म दोन्हीही मुक्ती देण्यास चांगले आहेत, परंतु या दोहोंपैकी भक्तियुक्त कर्म हे कर्मसंन्यासापेक्षाही उत्तम आहे.
तात्पर्य: सकाम कर्मे (इंद्रियतृप्तीसाठी केली जाणारी कर्मे) सांसरिक बंधनास कारणीभूत होतात. जोपर्यंत मनुष्य शारीरिक सुखाचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने कर्म करीत राहतो तोपर्यंत त्याला विविध प्रकारच्या शरीरांमध्ये निश्चितपणे देहांतर करावेच लागते. यामुळे त्याचे भौतिक बंधन सतत चालू असते. श्रीमद्भागवतात (5.5.4-6) या विधानाची पुष्टी पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे.
नूनं प्रमत्त: कुरुते विकर्म यदिन्द्रियप्रीतय आपृणोति।
न साधु मन्ये यत आत्मनोऽयमसन्नपि क्लेशद आस देह:।
पराभवस्तावदबोधजातो यावन्न जिज्ञासत आत्मतत्त्वम्।
यावत्क्रियास्तावादिदं मनो वै कर्मात्मकं येन शरीरबन्ध:॥
एवं मन: कर्मवशं प्रयुंक्ते अविद्ययात्मन्युपधीयमाने ।
प्रीतिर्न यावन्मयि वासुदेवे च मुच्यते देहयोगेन तावत् ॥
‘‘लोक इंद्रियतृप्ती करण्यासाठी वेडे झाले आहेत आणि त्यांना माहीत नाही की, आपले दु:खमय वर्तमान शरीर म्हणजे आपल्या गतकाळातील सकाम कर्माचा परिणाम आहे. जरी हे शरीर तात्पुरते असले तरी ते मनुष्याला अनेक प्रकारे क्लेश देतच असते. म्हणून इंद्रियतृप्त्यर्थ कर्म करणे योग्य नाही. जोपर्यंत मनुष्य आपल्या मूळ स्वरुपाबद्दल जिज्ञासा करीत नाही तोपर्यंत त्याचे जीवन असफलच समजले जाते. त्याला जोपर्यंत आपल्या मूळ स्वरुपाचे ज्ञान होत नाही तोपर्यंत इंद्रियतृप्तीसाठी सकाम कर्म करावेच लागते आणि जोपर्यंत तो इंद्रियतृप्तीच्या भावनेमध्येच रत आहे तोपर्यंत त्याला एका देहामधून दुसऱ्या देहामध्ये देहांतर करणे भागच असते. जरी मनुष्याचे मन सकाम कर्मामध्ये गुंतलेले असले आणि अज्ञानाने प्रभावित असले तरी त्याने श्रीवासुदेवांच्या भक्तीविषयी आपले प्रेम विकसित केल पाहिजे. असे केल्यानेच त्याला भौतिक अस्तित्वाच्या बंधनातून मुक्त होण्याची संधी प्राप्त होऊ शकेल.’’
त्यामुळेच केवळ ज्ञान (म्हणजेच आपण हे भौतिक शरीर नसून आत्मा आहोत) मुक्ती प्राप्त करण्यासाठी पुरेसे नाही. आत्मस्तरावर कर्म करणे आवश्यक आहे, नाही तर भवबंधनातून मुक्ती मिळू शकत नाही. परंतु कृष्णभावनाभावित कर्म हे सकाम कर्माप्रमाणे नाही. पूर्ण ज्ञानयुक्त होऊन केलेल्या कर्माने वास्तविक ज्ञानप्राप्तीमध्ये प्रगती होते. कृष्णभावनेशिवाय, केवळ सकाम कर्मापासून संन्यास घेतल्याने बद्ध जीवाचे हृदय वास्तविकपणे शुद्ध होऊ शकत नाही. जोपर्यंत त्याचे हृदय शुद्ध होत नाही तोपर्यंत त्याला फलाशेनेच कर्म करावे लागते, परंतु कृष्णभावनाभावित कर्म हे मनुष्याला आपोआपच साकाम कर्माच्या परिणामापासून मुक्त होण्यास साहाय्य करते, जेणेकरून त्याला पुन्हा भौतिक स्तरावर कर्म करावे लागत नाही. म्हणून कृष्णभावनाभावित कर्म हे नेहमी कर्मसंन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण कर्मसंन्यासामध्ये पतन होण्याचा धोका असतो. श्रील रूप गोस्वामींनी आपल्या भक्तिरसामृतसिंधूमध्ये (1.2.258) सांगितल्याप्रमाणे कृष्णभावनारहित संन्यास हा अपूर्णच असतो.
प्रापञ्चिकतया बुद्धया हरिसम्बन्धिवस्तुन:।
मुमुक्षुभि: परित्यागो वैराग्यं फल्गु कथ्यते॥
‘‘मुक्ती प्राप्त करण्यासाठी उत्सुक असणारा मनुष्य, भगवंतांशी संबंधित वस्तूंचा भौतिक समजून त्याग करतो तेव्हा त्याच्या वैराग्याला अपूर्ण वैराग्य म्हटले जाते.’’ तेव्हा भगवंतच अस्तित्वातील प्रत्येक वस्तूचे स्वामी आहेत आणि मनुष्याने कोणत्याही गोष्टीवर आपल्या मालकीचा दावा करू नये, हे ज्ञान एखाद्याला होते तेव्हाच त्याचे वैराग्य परिपूर्ण होऊ शकते. मनुष्याने जाणले पाहिजे की, हे ज्ञान एखाद्याला होते तेव्हाच त्याचे वैराग्य परिपूर्ण होऊ शकते. मनुष्याने जाणले पाहिजे की, वस्तुत: कोणतीही वस्तू आपल्या मालकीची नाही, तर मग संन्यासाचा प्रश्न येतोच कुठे? जो मनुष्य जाणतो की, सर्व काही श्रीकृष्णांच्या मालकीचे आहे तो खऱ्या अर्थाने नेहमी संन्यासावस्थेत स्थित आहे. ज्याअर्थी प्रत्येक गोष्ट श्रीकृष्णांची आहे त्याअर्थी प्रत्येक गोष्टीचा उपयोग त्यांच्या सेवेमध्येच केला पाहिजे. कृष्णभावनायुक्त असा हा कर्मांचा परिपूर्ण प्रकार, मायावादी पंथातील संन्याशाने केलेल्या कृत्रिम संन्यासापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे.