No edit permissions for मराठी

TEXTS 27-28

sparśān kṛtvā bahir bāhyāṁś
cakṣuś caivāntare bhruvoḥ
prāṇāpānau samau kṛtvā
nāsābhyantara-cāriṇau

yatendriya-mano-buddhir
munir mokṣa-parāyaṇaḥ
vigatecchā-bhaya-krodho
yaḥ sadā mukta eva saḥ


स्पर्शान्-ध्वनी इत्यादी इंद्रिय विषय; कृत्वा-करून; बहि:- बाह्य; बाह्यान्-अनावश्यक; चक्षु:- नेत्र; -सुद्धा; एव-निश्‍चितच; अन्तरे-मध्यांत; भ्रुवो:- भुवया; प्राण-अपानौ-उर्ध्व आणि अधोगमन करणारे प्राण आणि अपान वायू; समौ-रोखून; कृत्वा-करून; नास-अभ्यन्तर-नासिकांमध्ये; चारिणौ-वहन करून; यत-संयमित; इन्द्रिय-इंद्रिये; मन-:- मन; बुद्धि:-बुद्धी; मुनि:-मुनी किंवा योगी; मोक्ष-मोक्ष; परायण:-परायण होऊन; विगत-रहित; इच्छा-इच्छा; भय-भय; क्रोध:- क्रोध; य:-जो मनुष्य; सदा-सदैव; मुक्त:- मुक्त; एव-निश्चितच; :- तो असतो.

सर्व बाह्य इंद्रियविषय रोखून दोन भुवयांमध्ये दृष्टी एकाग्र करून, नाकपुड्यांमध्ये प्राण आणि अपान वायूंना रोखून आणि याप्रमाणे मन, इंद्रिये आणि बुद्धी संयमित करून, मोक्षप्राप्तीचे ध्येय असणारा मुनी इच्छा, भय आणि क्रोधापासून मुक्त होतो. जो मनुष्य नित्य या अवस्थेत असतो तो निश्‍चितच मुक्त असतो.

तात्पर्य: कृष्णभावनेमध्ये संलग्न होऊन मनुष्य तात्काळ आपले आध्यात्मिक स्वरूप जाणू शकतो आणि त्यानंतर तो भक्तियोगाच्या माध्यमाने भगवंतांना जाणू शकतो. जेव्हा मनुष्य भगवद्भक्तीमध्ये उत्तम प्रकारे स्थित होतो तेव्हा तो दिव्य स्तराप्रत उन्नत होतो आणि यामुळे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये भगवंतांची उपस्थिती जाण्याइतपत पात्र बनू शकतो. या विशिष्ट स्थितीलाच ब्रह्म-निर्वाण किंवा ब्रह्मामधील मुक्ती असे म्हटले जाते.

     ब्रह्म-निर्वाणाच्या उपरोक्त तत्वांचे विवेचन करून झाल्यावर, भगवंत अर्जुनाला, ‘अष्टांगयोग’ या योगपद्धतीच्या आचरणाद्वारे  मनुष्य या अवस्थेप्रत कसा येऊ शकतो याचा उपदेश करतात. या अष्टांगयोगाची आठ अंगे आहेत व ती म्हणजे यम, नियम, आसन्, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही होत. सहाव्या अध्यायामध्ये योग विषयाचे विस्तृत स्पष्टीकरण करण्यात आले आहे आणि पाचव्या अध्यायाच्या शेवटी त्याचे केवळ प्राथमिक वर्णन करण्यात आले आहे. प्रत्याहार या योगपद्धतीद्वारे शब्द, स्पर्श, रूप, रस, आणि गंध या इंद्रियविषयांचा त्याग केला पाहिजे. त्यानंतर दोन भुवयांमध्ये दृष्टी एकत्रित करून, अर्धोन्मीलित नेत्रांनी नासिकाग्रावर ध्यान एकाग्र केले पाहिजे. नेत्र पूर्णपणे बंद करण्याचे काही लाभ होत नाही, कारण नेत्र पूर्णपणे बंद केल्यास निद्रावश होण्याचा संभव असतो. तसेच नेत्र संपूर्ण उघडे ठेवण्यानेही काही लाभ होत नाही कारण तसे केल्यास इंद्रियविषयांद्वारे मोहित होण्याची शक्यता असते. शरीरातील उर्ध्व आणि अधोगमन करणाऱ्या वायूंचे समत्व साधून नाकपुड्यांमध्ये श्‍वासोच्छवासाची हालचाल रोखली जाते. अशा योगाच्या आचरणाद्वारे मनुष्य इंद्रिये संयमित करू शकतो, बाह्य इंद्रियविषयांपासून अलिप्त राहू शकतो आणि याप्रमाणे तो ब्रह्म-निर्वाणासाठी स्वत:ची तयारी करतो.

     ही योगपद्धती मनुष्याला सर्व प्रकारच्या क्रोध आणि भयांपासून मुक्त होण्यास व त्यायोगे दिव्य स्थितीत, परमात्म्याच्या उपस्थितीचा अनुभव घेण्यास साहाय्य करते. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे तर, कृष्णभावनामृत ही योगपद्धतीच्या आचरणाची सहजसुलभ पद्धत आहे. याचे पुढील अध्यायामध्ये विस्तृत वर्णन करण्यात येईल. कृष्णभावनाभावित मनुष्य हा नित्य भक्तीपूर्ण सेवेमध्ये युक्त असल्याकारणाने, त्याची इंद्रिये इतर गोष्टींमध्ये रत होण्याचा धोका नसतो. इंद्रिये संयमित करण्याचा हा मार्ग अष्टांगयोगापेक्षा अधिक उत्तम आहे.

« Previous Next »