No edit permissions for मराठी

TEXT 29

bhoktāraṁ yajña-tapasāṁ
sarva-loka-maheśvaram
suhṛdaṁ sarva-bhūtānāṁ
jñātvā māṁ śāntim ṛcchati

भोक्तारम्- भोक्ता; यज्ञ-यज्ञांचा; तपसाम्-आणि तपस्येचा; सर्व-लोक-सर्व ग्रहलोक आणि त्यांमधील देवदेवतांचा; महा-ईश्वरम्-परमपुरुष किंवा भगवंत; सु-हृदम्-हितकर्ता; सर्व-सर्वांचा; भूतानाम्-जीवांचा; ज्ञात्वा-याप्रमाणे जाणून; माम्-मला (भगवान श्रीकृष्णांना); शान्तिम्- भौतिक यातनांपासून मुक्ती; ऋच्छति-प्राप्त करतो.

मी सर्व यज्ञ आणि तपस्यांचा परमभोक्ता, सर्व ग्रहलोक आणि देवदेवतांचा परमेश्‍वर आणि मी सर्व जीवांचा हितकर्ता व सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणारा आहे, हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा, सांसरिक दु:खांपासून शांती प्राप्त करतो.

तात्पर्य: मायाशक्तीच्या कचाट्यात सापडलेले सर्व बद्ध जीव या भौतिक जगतात शांती प्राप्त करण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात; परंतु भगवद्गीतेच्या या श्‍लोकामध्ये वर्णिलेले शांतीचे सूत्र त्यांना माहित नाही. सर्वश्रेष्ठ शांतिसूत्र केवळ हेच आहे की, भगवान श्रीकृष्ण हे सर्व मानवी कार्यांचे भोक्ता आहेत. सर्व काही भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये अर्पण केले पाहिजे कारण ते सर्व ग्रहलोकांचे आणि त्यांमधील देवदेवतांचे अधिपती आहेत. त्यांच्याहून श्रेष्ठ कोणीही नाही. देवदेवतांमधील सर्वश्रेष्ठ ब्रह्मदेव आणि शंकर यांच्यापेक्षाही भगवंत श्रेष्ठ आहेत. वेदांमध्ये (श्वेताश्वतरोपनिषद 6.7) भगवंतांचे वर्णन तमीश्वराणां परम महेश्वरम् म्हणून करण्यात आले आहे. मायेच्या प्रभावाखाली जीव आपल्याला दृश्य असणाऱ्या सर्व गोष्टींचे भोक्ता बनण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु वस्तुत: ते भगवंतांच्या भौतिक शक्तीच्या वर्चस्वाखाली असतात. भगवंत हे प्रकृतीचे स्वामी आहेत अणि बद्ध जीव हे भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमांच्या अधीन आहेत. जोपर्यंत मनुष्य हे उघड सत्य जाणू शकत नाही तोपर्यंत त्याला या जगात व्यक्तिश: अथवा सामूहिकरित्या शांती प्राप्त करणे शक्य नाही. कृष्णभावनेचा हाच अर्थ आहे की, भगवान श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ अधिपती आहेत आणि मोठमोठ्या देवतांसहित सर्व जीव हे त्याच्या अंकित आहेत. मनुष्य, परिपूर्ण कृष्णभावनेमध्येच केवळ परमशांती प्राप्त करू शकतो.

हा पाचवा अध्याय म्हणजे कृष्णभावनेचे व्यावहारिक विश्‍लेषण आहे व त्याला सामान्यत: कर्मयोग म्हणून आणले जाते. कर्मयोग कसा मुक्तिदायक होऊ शकतो या मानसिक तर्कवादाच्या प्रश्‍नाचे उत्तर या ठिकाणी देण्यात आले आहे. कृष्णभावनाभावित कर्म करणे म्हणजेच भगवंत हे सर्वांचे अधिपती आहेत या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करणे होय. असे कर्म हे दिव्य ज्ञानाहून भिन्न नाही. प्रत्यक्ष कृष्णभावना म्हणजे भक्तियोग आहे आणि ज्ञानयोग हा भक्तियोगाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. कृष्णभावना म्हणजे स्वत:च्या परम सत्याशी परिपूर्णता म्हणजेच श्रीकृष्णांचे किंवा पुरुषोत्तम श्रीभगवंतांचे संपूर्ण ज्ञान होय. विशुद्ध जीव हा भगवंतांचा अंश या नात्याने त्यांचा शाश्वत सेवक असतो. मायेवर प्रभुत्व गाजविण्याच्या इच्छेमुळे तो मायेच्या संपर्कामध्ये येतो आणि हीच गोष्ट त्याच्या अनेक दु:खास कारणीभूत असते. जोपर्यंत तो भौतिक प्रकृतीशी संबंधित आहे तोपर्यंत त्याला आपल्या भौतिक गरजा भागविण्यासाठी कर्म करावेच लागते. तथापि, भौतिक प्रकृतीच्या आधिपत्याखाली असतानाही, कृष्णभावना त्याला आध्यात्मिक जीवनाप्रत उन्नत करते. कारण कृष्णभावना म्हणजे भौतिक जगतामध्ये, साधनेद्वारे आध्यात्मिक अस्तित्वासाठी जागृती करणे होय. जितक्या प्रमाणात मनुष्य प्रगती करतो तितक्या प्रमाणात तो भौतिक प्रवृत्तींच्या तावडीतून सुटतो. भगवंत कोणाच्याही बाबतीत पक्षपात करीत नाहीत. सर्व काही मनुष्याच्या कृष्णभावनेतील कर्तव्यांच्या व्यावहारिक आचरणावर अवलंबून असते आणि यापासूनच त्याला सर्व प्रकारे इंद्रिये संयमित करण्यास आणि काम आणि क्रोधावर विजय मिळविण्यास मदत होते. उपरोक्त विकारांना नियंत्रित करून जो कृष्णभावनेमध्ये दृढ राहतो, तो वास्तविकपणे दिव्य स्थिती किंवा ब्रह्म-निर्वाणामध्ये राहतो. अष्टांगयोगाचे कृष्णभावनेमध्ये आपोआपच आचरण होते. कारण यामध्ये अंतिम हेतू साध्य होतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारण, ध्यान आणि समाधी यांच्या आचरणाने यथावकाश उन्नतावस्था प्राप्त होते, परंतु भक्तियोगातील पूर्णतेची ही केवळ पूर्वतयारी आहे आणि भक्तीपूर्ण सेवा हीच मानवजातीला शांती प्रदान करू शकते. हीच जीवनाची परमोच्च संसिद्धी आहे.

     या प्रकारे भगवद्गीतेच्या ‘कर्मसंन्यासयोग’ या पाचव्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.

« Previous