TEXTS 8-9
naiva kiñcit karomīti
yukto manyeta tattva-vit
paśyañ śṛṇvan spṛśañ jighrann
aśnan gacchan svapañ śvasan
pralapan visṛjan gṛhṇann
unmiṣan nimiṣann api
indriyāṇīndriyārtheṣu
vartanta iti dhārayan
न-कधीच नाही; एव-निश्चितच; किञ्चित-काहीही; करोमि-मी करतो; इति-याप्रमाणे; युक्त:-दिव्य भावनायुक्त; मन्येत-मानतो; तत्व-वित्-तत्व जाणणारा; पश्यन्-पाहताना; श्रृण्वन्-ऐकताना; स्पृशन्-स्पर्श करताना; जिघ्रन्-वास घेताना; अश्नन्-खाताना; गच्छन्-जाताना; स्वपन्-स्वप्न पाहताना; श्वसन्-श्वास घेताना; प्रलपन्-बोलताना; विसृजन-सोडताना; गृह्णन्-स्वीकार करताना; उन्मिषन्-उघडताना; निमिषन्-बंद करताना; अपि-तरीही; इन्द्रियाणि-इंद्रियांना; इन्द्रिय-अर्थेषु-इंद्रियतृप्तीमध्ये; वर्तन्ते-ते याप्रमाणे युक्त असताना; इति-याप्रमाणे; धारयन्-असे समजून.
दिव्य भावनायुक्त मनुष्य जरी पाहात असला, ऐकत असला, स्पर्श करीत असला, वास घेत असला, खात असला, हालचाल करीत असला, झोपत असला आणि श्वसन करीत असला तरी त्याला आपल्या ठायी नेहमी माहीत असते की वस्तुत: आपण काहीच करीत नाही. कारण बोलताना, उत्सर्जन करताना, स्वीकार करताना किंवा डोळ्यांची उघडझाप करताना, तो नेहमी जाणतो की केवळ भौतिक इंद्रिये आपपल्या विषयांमध्ये संलग्न आहेत आणि तो स्वत: त्यांच्यापासून अलिप्त आहे.
तात्पर्य: कृष्णभवनाभावित मनुष्याचे जीवन विशुद्ध असते आणि म्हणून तात्कालिक आणि दूरवर्ती आशा कर्ता, कर्म अधिष्ठान, प्रयत्न आणि दैव या पाच कारणांवर अवलंबून असणाऱ्या कर्माशी त्याला काहीच कर्तव्य नसते. कारण तो श्रीकृष्णांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये युक्त असतो. जरी तो आपल्या शरीर आणि इंद्रियांद्वारे कार्य करीत असल्याचे दिसले तरी त्याला आपल्या वास्तविक स्वरुपाची, आध्यात्मिक सेवेची नेहमी जाणीव असते. भौतिक भावनेमध्ये, इंद्रिये इंद्रियतृप्ती करण्यामध्ये मग्न असतात; परंतु कृष्णभावनेमध्ये इंद्रिये श्रीकृष्णांची इंद्रिये संतुष्ट करण्यामध्ये मग्न असतात. म्हणून कृष्णभावनाभावित मनुष्य जरी इंद्रियजन्य भौतिक कार्य करीत असल्याचे दिसला तरी तो सदैव मुक्तच असतो. पाहणे आणि ऐकणे हे ज्ञानेंद्रियांचे कार्य आहे, तर चालणे, बोलणे, उत्सर्जन करणे इत्यादी कर्मेंद्रियांचे कार्य आहे. कृष्णभवानाभावित व्यक्ती इंद्रियांच्या काऱ्यापासून कधीच प्रभावीत होत नाही. तो भगवत्सेवेव्यतिरिक्त इतर कोणतेही कार्य करू शकत नाही, कारण तो जाणतो की, आपण भगवंतांचे नित्य दास आहोत.