TEXT 18
yadā viniyataṁ cittam
ātmany evāvatiṣṭhate
nispṛhaḥ sarva-kāmebhyo
yukta ity ucyate tadā
यदा-जेव्हा; विनियतम्-विशिष्टपणे नियमित केलेले; चित्तम्-मन आणि मनाची कार्ये; आत्मनि-आध्यात्मामध्ये; एव-निश्चितपणे; अवतिष्ठते-स्थित होतो; निस्पृह:- आकांक्षारहित किंवा नि:स्पृह; सर्व-सर्व प्रकारच्या; कामेभ्य:-भौतिक इंद्रियतृप्ती; युक्त-योगामध्ये व्यवस्थितपणे स्थिर झालेला; इति-याप्रमाणे; उच्यते-म्हटला जातो; तदा-त्या वेळी.
योगाभ्यासद्वारे योगी जेव्हा आपली मानसिक कार्ये नियमित करतो आणि सर्व भौतिक आकांक्षापासून मुक्त होऊन अध्यात्मामध्ये स्थित होतो, तेव्हा तो यथायोग्यपणे योगयुक्त झाल्याचे म्हटले जाते.
तात्पर्य: योगी मनुष्य आणि साधारण मनुष्य यांच्या क्रियांमधील फरक हाच आहे की, योगी मनुष्य हा भौतिक वासनांमध्ये प्रमुख असणार्या काम वासनासहित इतर सर्व वासनांचे शमन करतो. परिपूर्ण योगी आपल्या मानसिक क्रियांमध्ये इतका नियमित असतो की, तो कोणत्याही भौतिक कामनेने विचलित होत नाही. श्रीमद्भागवतात सांगितल्याप्रमाणे (9.4.8-20) या पूर्णावस्थेची प्राप्ती कृष्णभावनाभावित मनुष्याला आपोआपच होते.
स वै मन: कृष्णभपदारविन्दयोर्वचांसि वैकुण्ठगुणानुवर्णने।
करौ हरेर्मन्दिरमार्जनादिषु श्रुतिं चकाराच्युतसत्कत्थोदये॥
मुकुन्दलिंगलालयदर्शने दृशौ तद्भृत्यगात्रस्पर्शेऽसंगमम् ।
घ्राणं च तत्पादसरोजसौरभे श्रीमत्तुलस्या रसनां तदर्पिते॥
पादौ हरे: क्षेत्रपदानुसर्पणे शिरो हृषीकेशपदाभिवंदने ।
कामं च दास्ये न तु कामकाम्यया यथोत्तमश्लोकजनाश्रया रति:॥
‘‘अंबरीष महाराज यांनी सर्वप्रथम आपले मन, भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांवर केंद्रित केले आणि त्यानंतर क्रमश: त्यांनी आपली वाचा, भगवंतांच्या दिव्य गुणांचे वर्णन करण्यामध्ये युक्त केली; आपले हात, भगवंतांच्या मंदिराचे मार्जन करण्यामध्ये युक्त केले; आपले कान, भगवत्-कथांच्या श्रवणामध्ये; आपले नेत्र, भगवंतांचे दिव्य रुप पाहण्यामध्ये; आपले शरीर, भक्तांच्या शरीरास स्पर्श करण्यामध्ये; आपली नासिका, भगवंतांना अर्पण केलेल्या कमळफुलांचा सुवास घेण्यामध्ये; आपली जिह्वा, भगवंतांच्या चरणकमलांवर अर्पण केलेल्या तुळसीपत्रांचे रसास्वादन करण्यामध्ये; आपले पाय, तीर्थक्षेत्रांना आणि भगवंतांच्या मंदिराला जाण्यामध्ये; आपले मस्तक, भगवंतांना अभिवंदन करण्यामध्ये आणि आपली इच्छा, भगवंताची इच्छापूर्ती करण्यामध्ये संलग्न केली. या सर्व दिव्य क्रिया शुद्ध भगवद्भक्तासाठी योग्यच आहेत.’’
निर्विशेषवादी अनुयायांसाठी या दिव्य अवस्थेचे वर्णन करता येणे शक्य नाही; परंतु महाराज अंबरीष यांच्या क्रियेच्या उपर्युक्त वर्णनावरून दिसून येते की, कृष्णभावनाभावित मनुष्यासाठी ही अवस्था अत्यंत व्यवहार्य आणि सहजसुलभ असते. जोपर्यंत भगवंतांच्या स्मरणाद्वारे मन भगवंतांच्या चरणकमलांवर स्थित केले जात नाही तोपर्यंत अशा दिव्य क्रियांमध्ये युक्त होणे अशक्य असते. म्हणून भगवद्भक्तीमध्ये या विहित क्रियांना अर्चन किंवा भगवद्सेवेमध्ये सर्व इंद्रियांना युक्त करणे असे म्हणतात. इंद्रिये आणि मनाला कार्यरत ठेवणे आवश्यक असते. केवळ निग्रह करणे व्यवहार्य नाही, म्हणून सर्वसामान्य लोकांना आणि विशेषकरून जे संन्यासाश्रमी नाहीत त्यांच्यासाठी वर सांगितल्याप्रमाणे, इंद्रियांना आणि मनाला दिव्य क्रियांमध्ये मग्न करणे ही दिव्यत्वाच्या प्राप्तीसाठी परिपूर्ण विधी आहे. या विधीलाच भगवद्गीतेमध्ये युक्त म्हणण्यात आले आहे.