TEXT 32
ātmaupamyena sarvatra
samaṁ paśyati yo ’rjuna
sukhaṁ vā yadi vā duḥkhaṁ
sa yogī paramo mataḥ
आत्म-आपल्या स्वतःच्या; औपम्येन-तुलनेने; सर्वत्र-सर्वत्र; समम्-समदृष्टीने; पश्यतिपाहतो; यः-जो; अर्जुन-हे अर्जुन; सुखम्-सुख, वा-किंवा; यदि-जरी; वा-अथवा, दुःखम्—दुःख; सः—असा; योगी-योगी, परमः-परम, परिपूर्ण, मतः—मानला जातो.
हे अर्जुन! जो आपल्या स्वतःच्या तुलनेने, सर्व जीवांकडे त्यांच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये, वास्तविक समतेने पाहतो तोच परिपूर्ण योगी होय.
तात्पर्य: जो कृष्णभावनाभावित आहे तो परिपूर्ण योगी होय. त्याला आपल्या अनुभवाच्या आधारे सर्वांच्या सुखाची आणि दुःखाची जाणीव असते. जीवाच्या दु:खाचे कारण म्हणजे त्याला भगवंतांशी असलेल्या आपल्या संबंधाचे झालेले विस्मरण होय आणि सुखाचे कारण म्हणजे, श्रीकृष्ण हेच मनुष्याच्या सर्व कर्माचे परमभोक्ता आहेत, सर्व भूमी आणि लोकांचे अधिपती आहेत आणि सर्व जीवांचे प्रामाणिक हितचिंतक आहेत, हे जाणणे होय. परिपूर्ण योगी जाणतो की, प्राकृतिक गुणांमुळे बद्ध झालेला जीव हा, श्रीकृष्णांशी असलेल्या आपल्या संबंधाची विस्मृती झाल्यामुळे त्रिविध भौतिक तापांच्या अधीन होतो. कृष्णभावनाभावित असलेला मनुष्य हा सुखी असल्याकारणाने तो श्रीकृष्णांच्या ज्ञानाचा सर्वत्र प्रसार करण्याचा प्रयत्न करतो. परिपूर्ण योगी हा, कृष्णभावनाभावित होण्याच्या महत्वाचा सर्वत्र प्रसार करण्याचा प्रयत्न करीत असल्याने तो जगातील सर्वोत्तम परोपकारी आहे आणि तो भगवंतांचा अत्यंत प्रिय सेवक आहे. न च तस्मान् मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृतमः (भगवद्गीता १८६९). दुस-या शब्दांत सांगावयाचे तर, भगवंतांचा भक्त हा सदैव सर्व जीवांच्या कल्याणाकडे लक्ष देत असतो आणि या प्रकारे तो वास्तविकपणे प्रत्येकाचा मित्र आहे. तो सर्वोत्तम योगी आहे, कारण तो स्वत:च्या वैयक्तिक लाभासाठी योगसिद्धीची अभिलाषा करीत नाही तर तो इतरांच्या हिताकरिता प्रयत्नशील असतो. तो आपल्या बरोबरीच्या जीवांचा मत्सर करीत नाही. भगवंतांचा विशुद्ध भक्त आणि केवळ आपल्या वैयक्तिक उन्नतीची कामना करणारा योगी, यांच्यामध्ये हाच फरक आहे. पूर्णरूपाने ध्यान करण्यासाठी एकांतवास स्वीकारलेला जो योगी असतो तो, प्रत्येक मनुष्याला कृष्णभावनाभावित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भक्ताइतपत परिपूर्ण असू शकत नाही.