No edit permissions for मराठी

TEXT 42

atha vā yoginām eva
kule bhavati dhīmatām
etad dhi durlabha-taraṁ
loke janma yad īdṛśam

अथ वा- अथवा; योगिनाम्-विद्वान योग्यांच्या; एव-खचितच; कुले-कुळामध्ये; भवति-जन्म घेतो; धी-मताम्-जे अत्यंत बुद्धिमान आहेत त्यांच्या; एतत्-हे; हि-खचितच; दुर्लभःतरम्-अत्यंत दुर्लभ; लोके-या जगात; जन्म-जन्म; यत्-जे; ईदृशम्-अशा प्रकारचा

अथवा (दीर्घकाळ योगाभ्यास केल्यानंतर अपयशी ठरलेला) तो, अत्यंत बुद्धिमान योगी व्यक्तींच्या कुळात जन्म घेतो. खरोखर अशा प्रकारचा जन्म या लोकी अत्यंत दुर्लभ आहे.

तात्पर्य: अत्यंत बुद्धिमान योग्यांच्या कुळात झालेल्या जन्माची या ठिकाणी प्रशंसा करण्यात आली आहे. कारण अशा कुळामध्ये जन्मलेल्या बालकाला त्याच्या बालपणापासूनच आध्यात्मिक प्रोत्साहन मिळते. विशेषत: आचार्य किंवा गोस्वामींच्या कुळात अशी परिस्थिती असते. अशी कुळे प्रशिक्षण आणि परंपरेमुळे अत्यंत बुद्धिमान आणि भक्तिभावित असतात म्हणून ते आध्यात्मिक गुरू होतात. भारतामध्ये अशी अनेक आचार्य कुळे आहेत, परंतु अपुरे प्रशिक्षण आणि अपुरी विद्या यामुळे त्यांचा आता र्हास झाला आहे. भगवंतांच्या कृपेमुळे अशी अनेक कुळे आहेत, की ज्यांच्यात पिढ्यानुपिढ्या योगी जन्मास येतात. अशा कुटुंबामध्ये जन्म प्राप्त होणे ही निश्चितच भाग्याची गोष्ट आहे. सौभाग्याने भगवंतांच्या कृपेमुळे आमचे आध्यात्मिक गुरू ॐ विष्णुपाद श्री श्रीमद्भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज आणि आस्मादिकांना भगवत् कृपेने अशा थोर कुटुंबामध्ये जन्म घेण्याची संधी मिळाली आणि आम्हा दोघांनाही बालपणापासूनच भगवद्-भक्तीचे शिक्षण मिळाले. नंतर दिव्य परंपरेच्या योजनेनुसार आम्हा दोघांची भेट झाली.

« Previous Next »