TEXT 41
prāpya puṇya-kṛtāṁ lokān
uṣitvā śāśvatīḥ samāḥ
śucīnāṁ śrīmatāṁ gehe
yoga-bhraṣṭo ’bhijāyate
प्राप्य-प्राप्त होऊन; पुण्य-कृताम्-जे पुण्यकर्म करतात त्यांच्या; लोकान्-लोक; उषित्वानिवास करून; शाश्वती:-अनेक; समाः-वर्षे; शुचीनाम्-पुण्यवान; श्री-मताम्-संपन्न किंवा वैभवशाली; गेहे-घरी; योग-भ्रष्ट:-आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरून भ्रष्ट झालेला; अभिजायते- जन्म घेतो.
योगभ्रष्ट योगी, पुण्यात्म्यांच्या लोकांमध्ये अनेकानेक वर्षे सुखोपभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो.
तात्पर्य: योगभ्रष्ट किंवा अयशस्वी योग्यांचे दोन वर्ग आहेत- १) एखादा मनुष्य अत्यल्प प्रगतीनंतर योगभ्रष्ट होतो. २) एखादा मनुष्य दीर्घकाळ योगाभ्यास केल्यानंतर योगभ्रष्ट होतो. जो योगी अल्पकाळ योगाभ्यास केल्यानंतर पतित होतो, तो पुण्यवान जीवांना प्रवेश दिल्या जाणा-या उच्चतर लोकामध्ये जातो. त्या ठिकाणी दीर्घकाळ जीवन व्यतीत केल्यावर त्याला पुन्हा या लोकात सात्विक ब्राह्मण वैष्णवांच्या किंवा श्रीमंत व्यापारी मनुष्याच्या घरी जन्म प्राप्त होतो.
या अध्यायाच्या अंतिम शलोकामध्ये सांगितल्याप्रमाणे योगाभ्यासाचे ध्येय म्हणजे कृष्णभावनेची परमसिद्धी प्राप्त करणे हे आहे. परंतु जे ही स्थिती प्राप्त होईपर्यंत टिकून राहू शकत नाहीत आणि जे भौतिक प्रलोभनांमुळे अपयशी होतात, त्यांना भगवत्कृपेने, आपल्या भौतिक प्रवृत्तींची पूर्ती करण्याची अनुमती दिली जाते आणि त्यानंतर त्यांना वैभवशाली जीवन जगण्याची संधी दिली जाते. ज्यांनी अशा कुटुंबामध्ये जन्म प्राप्त केला आहे त्यांनी परिपूर्ण कृष्णभावनेप्रत उन्नत होण्यासाठी या सुविधांचा उपयोग करून घेतला पाहिजे.