No edit permissions for मराठी

TEXT 8

jñāna-vijñāna-tṛptātmā
kūṭa-stho vijitendriyaḥ
yukta ity ucyate yogī
sama-loṣṭrāśma-kāñcanaḥ

 ज्ञान-अर्जित ज्ञान; विज्ञान-आणि अनुभूत किंवा साक्षात्कारी ज्ञान; तृप्त-तृप्त; आत्मा-आत्मा; कूट-स्थ:- अध्यात्मामध्ये; विजित -इन्द्रिय:- इंद्रियांना संयमित केलेला; युक्त:- आत्मसाक्षात्कारासाठी योग्य; इति-याप्रमाणे; उच्यते-म्हटले जाते; योगी-योगी; सम-समदृष्टी असलेला; लोष्ट-लहान दगड; अश्म-दगड; काञ्चन-सोने.

मनुष्य जेव्हा अर्जित ज्ञान आणि साक्षात्कारायोगे पूर्णपणे तृप्त होतो तेव्हा तो योगी किंवा आत्मसाक्षात्कारामध्ये स्थित झाला असे म्हटले जाते. असा मनुष्य अध्यात्मात स्थित आणि आत्मसंयमी असतो. तो गारेचे खडे, दगड, सोने इत्यादी सर्व काही समदृष्टीने पाहतो.

तात्पर्य: परम सत्याच्या अनुभूतीशिवाय पुस्तकी ज्ञान हे निरुपयोगी आहे. याबद्दल पुढीलप्रमाणे सांगण्यात आले आहे.

अत:श्रीकृष्णनामादि न भवेद् ग्राह्यमिन्द्रियै:।
सेवोन्मुखे हि जिह्वादौ स्वयमेव स्फुरत्यद:॥

     ‘‘आपल्या भौतिकदृष्ट्या दूषित इंद्रियांद्वारे श्रीकृष्णांच्या नाम, रुप, गुण आणि दिव्य लीलांचे दिव्य स्वरुप कोणीही जाणू शकत नाही. केवळ, दिव्य भगवत्सेवेद्वारे मनुष्य जेव्हा आध्यात्मिक दृष्ट्या परिपक्व होतो तेव्हा त्याला भगवंतांच्या दिव्य नाम, रुप, गुण आणि लीला प्रकट होतात.’’ (भक्तिसामृतसिंधू 1.2.234)

     ही भगवद्गीता म्हणजे कृष्णभावनेचे विज्ञान आहे. केवळ सांसरिक पांडित्याद्वारे कोणीही कृष्णभावनाभावित होऊ शकत नाही. शुद्ध भावनायुक्त व्यक्तीचा सत्संग होण्याइतपत मनुष्याला भाग्यवान असावे लागते. श्रीकृष्णांच्या कृपेमुळे कृष्णभावनाभावित मनुष्याला साक्षात्कारी ज्ञान असते, कारण तो विशुद्ध भक्तिपूर्ण सेवेने तृप्त झालेला असतो. साक्षात्कारी किंवा अनुभूत ज्ञानाद्वारे परिपूर्णतेला प्राप्त होते. दिव्य ज्ञानाच्या आधारे मनुष्य आपल्या श्रद्धेमध्ये दृढ राहू शकतो. परंतु केवळ पुस्तकी ज्ञानाने तो सहजपणे मोहित होऊ शकतो आणि वरकरणी विरोधाभासामुळे गोंधळून जाऊ शकतो. आत्मसाक्षात्कारी जीव हा वास्तविकपणे आत्मसंयमी असतो, कारण तो श्रीकृष्णांना शरण गेलेला असतो. तो दिव्य असतो, कारण त्याला सांसरिक पांडित्याशी मुळीच कर्तव्य नसते. सांसरिक विद्वत्ता आणि मानसिक तर्कवाद जरी इतरांना सोन्याप्रमाणे भासत असले तरी त्याच्या लेखी मात्र त्यांना खडे किंवा दगडापेक्षा अधिक मूल्य नसते.

« Previous Next »